राज्यात खासगी सावकारीमुळे अनेक शेतकरी उध्वस्त झाले आहेत. त्यातच कर्जाचे पैसे चुकते केल्यानंतरही सावकार जमीन देत नसल्याने उद्विग्न झालेल्या शेतकरी कन्येने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले आहे.
राज्यात खासगी सावकारीचा फास अनेकांना गिळंकृत करत आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत. त्यातच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुनंदगाव येथील शेतकऱ्याने लेकीच्या लग्नासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज चुकते केल्यानंतरही सावकाराने गहाण ठेवलेली जमीन परत न केल्याने शेतकऱ्याच्या मुलीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे.
मुलीचे वडील शेखर सावंत यांना दोन मुली आणि दोन मुले आहेत. त्यामुळे मुलीच्या लग्नासाठी शेखर सावंत यांनी एका खासगी सावकाराकडून 8 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्जाची फेड करूनही सावकाराने जमीन परत देण्यास नकार दिला. त्यामुळे सावंत कुटूंबिय संकटात सापडले आहेत.
कोरोनाच्या संकटात शेखर सावंत यांच्या मुलीला पुण्याचे एक स्थळ आले. यावेळी त्यांच्याकडे पैशाची चणचण होती. त्यामुळे मुलगी शहरात दिली तर तिला शेतीतील कामे करावी लागणार नाहीत, असा विचार करून तिचे लग्न जमवले. लग्नासाठी 5 लाख रुपयांचा हुंडा दिला. लग्न धुमधडाक्यात झाले. मात्र लग्नानंतर अवघ्या दहा दिवसात तु माहेरून काय आणलं? अशी विचारणा करून हुंड्यासाठी मुलीला परत पाठवले. त्यातच लग्नासाठी बापाने जमीन गहाण टाकल्याचे मुलीला समजले. मात्र कर्जाचे पैसे घेऊन सावकाराकडे गेल्यानंतर सावकाराने जमीन देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री साहेब माझ्या वडिलांच्या गळ्याचा फाश थांबवा, असं म्हणत मुलीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले.
एकीकडे संसाराचा खेळखंडोबा झालाआणि दुसरीकडे बापाची जमीनही गेली. त्यामुळे मुलीला अश्रू आवरता आले नाहीत. त्यामुळे खासगी सावकाराच्या मुसक्या आवळून कायदेशीर शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास मोकळा करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्याच्या मुलीने व्यक्त केली आहे.