आईनंतरचा विद्यार्थ्यांचा गुरू म्हणून शिक्षकांची ओळख आहे तर शाळा हे विद्यार्थ्यांचं दुसरं घर समजलं जातं. मात्र, काळाच्या ओघात व्यावसायिकतेमुळं शिक्षण संस्था या विद्यार्थी उत्पादनाचे कारखाने होऊ लागलेत. त्यामुळं व्यवसायाचे नियम आता या संस्थांनी राबवायला सुरू केले आहे, हे दुर्दैवानं म्हणावं लागेल.
मूलभूत गरज समजूनच सरकारनं शिक्षण हक्काचा कायदा केला. त्यातही आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण हे कमी पैशात उपलब्ध करून देणारे कायदेही केले. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं धक्कादायक वास्तवचं समोर आलंय. उल्हासनगरमध्ये गुरूनानक हायस्कूल ही नावाजलेली इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.
उल्हासनगर हे उपनगर तसं उच्च मध्यमवर्गियांचं समजलं जातं. इथं श्रमिक वर्ग आणि हातावर पोट असणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. आपल्या नशिबी आलेलं हे जिणं मुलांना भोगावं लागू नये, यामुळं श्रमिक वर्गातील पालकांनी आपल्या पाल्यांनागुरूनानक सारख्या नावाजलेल्या इंग्रजी शाळांमध्ये टाकलं.
उल्हासनगर कॅम्प 4 येथील गुरुनानक शाळेतील सुमारे १०० विद्यार्थ्यांना शाळेची मासिक फीस भरता आली नाही. त्यामुळं या शाळा व्यवस्थापनानं या विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानात बसवण्याची संतापजनक शिक्षा दिली. एवढ्यावरच न थांबता शाळेनं त्या मुलांची तोंडी परीक्षाही घेतली नाही. शाळेकडून वेगवेगळ्या उपक्रमांच्या नावाखाली फीस घेतली जाते. मात्र, प्रत्यक्षात ते उपक्रम राबवलेच जात नसल्याचंही काही पालकांनी सांगितलं. या घटनेचा मुलांच्या मानसिकतेवर तर परिणाम झालाच आहे, शिवाय त्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाचं काय, असा प्रश्न पालकांनी शाळेला विचारला. त्यावर शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा नायर यांनी पालकांसोबतच हुज्जत घालून त्यांना अरेरावी केली. तर काही पालकांनी अशा शिक्षा देण्याचे प्रकार गेल्या चार वर्षांपासून सुरू असल्याचं सांगितलं. वास्तविक फी भरली नाही म्हणून या शाळेने तर विद्यार्थ्याना वर्गाबाहेर बसवले. काही शाळांनी तर विद्यार्थ्यानी फी नाही भरली म्हणून पालकांच्या हातात दाखले दिल्याचे प्रकरण गेल्याच वर्षी कल्याण मध्ये घडले आहे. मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून अशा त्रस्त पालकांना मिळतं ते फक्त आश्वासन. दरम्यान, या पालकांनी मॅक्स महाराष्ट्रशी संपर्क साधल्यानंतर याप्रकरणी आम्ही शाळेच्या मुख्याध्यापक वीणा नायर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.