विकासाची दिशा दाखवणारा बरवडपाडा पॅटर्न..

पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा हे अतिदुर्गम आदीवासी बहुल दरी डोंगरात वसलेले जिल्ह्याचे शेवटचे टोक आणि विकासापासून कोसो दूर असलेले तालुके म्हणून ओळखले जातात, येथील आदिवासींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय, परंतु लोकांचा सहभाग इच्छा शक्ती स्थानिक पातळीवर प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असल्यास विकास कसा झपाट्याने होतोय ,यावर प्रकाशझोत टाकरणारा व सोयीसुविधा पासून वंचित असलेल्या गावपाड्याना विकासाची दिशा दाखवणारा बरवडपाडा पॅटर्न..

Update: 2022-02-02 11:35 GMT

पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा हे अतिदुर्गम आदीवासी बहुल दरी डोंगरात वसलेले जिल्ह्याचे शेवटचे टोक आणि विकासापासून कोसो दूर असलेले तालुके म्हणून ओळखले जातात, येथील आदिवासींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय, परंतु लोकांचा सहभाग इच्छा शक्ती स्थानिक पातळीवर प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असल्यास विकास कसा झपाट्याने होतोय ,यावर प्रकाशझोत टाकरणारा व सोयीसुविधा पासून वंचित असलेल्या गावपाड्याना विकासाची दिशा दाखवणारा बरवडपाडा पॅटर्न..



 


जव्हारपासून २७ किलोमीटर अंतरावर व दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या वेशीलगत असणाऱ्या संपूर्ण आदिवासी वस्ती असणारे बरवाडपाडा हे गाव 'हरित ग्राम' (ग्रीन व्हिलेज) बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेले हे गाव इतर गावांसाठी आपला आदर्श निर्माण करत आहे.

१९७४ साली स्थापन झालेल्या बरवाडपाडा ग्रामदान मंडळाच्या ४९ हेक्टर क्षेत्रामध्ये ११०० लोकसंख्या असून येथील प्रत्येक दोनशे आदिवासींच्या घरांमध्ये शौचालय आहे. गावातील स्वच्छता राखण्यासाठी महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण असून या गावाला २०१७-१८ या वर्षांत स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून सरकारचा पुरस्कार मिळाला होता. पुरस्काराच्या दहा लाख रुपयांचा रकमेतून गावातील खेतरीपाडा येथील ३५ घरांना नळजोडणी मिळण्यासाठी तीन लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.



 


या गावाला दरवर्षी येणाऱ्या सुमारे सव्वा ते दीड लाख रुपये वीज देयकाचा खर्च लक्षात घेऊन गावात ३.५ केविए क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यात आली. सौर ऊर्जेच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, व्यायामशाळा यासह २५ पथदिवे या अपारंपरिक ऊर्जा स्रोतावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर गावातील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चार महत्त्वपूर्ण नाक्यांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकदा चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या परिसरात अंधकार असताना हे गाव प्रकाशाने झगमगताना दिसून येते. आगामी काळात गावांमध्ये नव्याने चार नवीन सीसीटीव्ही व दहा पथदिवे बसवण्याची योजना आखण्यात येत आहे.



 


गावातील महिलांना पाणी आणण्यासाठी अडीच किलोमीटर अंतर कापावे लागते असे. माजी खासदार दिवंगत चिंतामण वनगा यांच्या खासदार निधीमधून एका विहिरीवर नळ पाणी योजना तयार करून गावाला सहजगत्या पाणी उपलब्ध करून दिले आहे. याखेरीज गावाच्या मध्यवर्ती भागात दहा हजार लिटर क्षमतेच्या पाच टाक्या सामाजिक संस्थेच्या मदतीने बसविण्यात आल्या असून ग्रामस्थांना या टाक्यांच्या माध्यमातून १०० मीटर अंतरावर २४ तास पाणी उपलब्ध होत आहे. गावात असणाऱ्या नळपाणी योजनेला लागणाऱ्या वीज प्रणालीला सौर ऊर्जा प्रणालीमध्ये परिवर्तित करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसहमतीने गावातील पदाधिकाऱ्यांची निवड होत असून ग्रामसभेमध्ये लोकसहभाग महत्त्वपूर्ण राहिला आहे. ग्रामसभेतील मतप्रवाह पाहून विकासाची दिशा ठरवली जात असल्याचे गावातील तरुण सरपंच अनिल मौळे यांचे म्हणणे आहे, तर गावाच्या विकासात व ग्रामपंचायतीतर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात तरुण व महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे ग्रामसेवक प्रशांत सोनेरी यांनी सांगितले. गावात २०१७ पासून प्लास्टिकबंदी यशस्वीपणे राबविण्यात येत असून गावातील स्वच्छता राखण्यासाठी लोकसहभागातून विशेष प्रयत्न केले जात आहे. २१ ऑगस्टपर्यंत या गावातील सर्व नागरिकांचा लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला असून करोनाच्या दोन संक्रमणाच्या काळात गावात फक्त एका व्यक्तीला करोनाची लागण झाली होती हेदेखील विशेष आहे. गावात अद्ययावत व्यायामशाळा तसेच डिजिटल अंगणवाडी व शाळा कार्यरत असून गावामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गावच्या प्रत्येक ग्रामसभेत बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात येत आहे.



 


गावातील सुविधा

२५ पथदिव्यांसह ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, व्यायामशाळा, नळपाणी योजनेतील विजेसाठी सौरऊर्जेचा वापर

चार महत्त्वपूर्ण नाक्यावर सीसीटीव्ही

दहा हजार लिटर क्षमतेच्या पाच टाक्यांतून पाणीपुरवठा,प्लास्टिकबंदी, डिजिटल शिक्षणव्यवस्था,

बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार,

शेअर बाजाराचे प्रशिक्षण, कृषिमाल विक्रीची समस्या, गावांमध्ये भात, नागली, उडीद, खुरासनी ही पिकं घेतली जात असली तरीही ग्रामस्थांना कृषिमाल विक्रीची समस्या भेडसावत आहे. गावातील महिला १६ बचत गटांमधून कार्यरत असून 'उमेद'च्या माध्यमातून एका वाहनाची खरेदी करण्यात आली आहे. येथील महिलांना स्वयंरोजगार निर्माण व्हावा, इतर रोजगाराचे प्रशिक्षण मिळावे किंवा येथील कृषिमालाच्या विक्रीसाठी योजना तयार करण्याची मागणी येथील ग्रामस्थांची आहे.

Full View

Tags:    

Similar News