बार्शीचे सीताफळ विकले जातय लंडनला..
सोलापूर जिल्हा शेतीच्या विविध प्रयोगांसाठी प्रसिध्द असून ऊस, डाळींब, ड्रगनफ्रुट आणि आता सीताफळाच्या शेतीमधेही नाविन्यप्रयोग होत आहेत.. पेटंट आणि निर्यातीपर्यंत पोचलेल्या सफरचंदाच्या प्रवासाचे साक्षीदार असलेले कसपटे कुटुंबाची यशोगाथा मांडली आहे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होत असून ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसट होत आहे.कारखान्याला ऊस पाठवून एफआरपीचे पैसे वेळेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन,मोर्चे काढले आहेत.ऊस कारखान्याला वेळेवर जात नाही व त्याचे पैसे लवकर मिळत नाहीत.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी इतर पिकांच्या लागवडीकडे वळला आहे.जिल्ह्यात सफरचंद,आद्रक,डाळींब,ड्रॅगन फ्रुट,सीताफळ या फळबागांची शेती बहरत आहे.
या फळबागांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.कमी पाण्याच्या वापराने भरघोस उत्पादन घेता येते हे अनेक फळबागायतदारानी दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करीत माळरानावर शेती फुलवली आहे.अशीच शेती बार्शी तालुक्यातील गोरमाळे या गावी येथील शेतकरी नवनाथ कसपटे यांनी पाण्याचे योग्य नियोजन करीत 40 एकर शेतीवर सीताफळाची बाग फुलवली आहे.सीताफळाच्या विक्रीतून या शेतकऱ्याला वर्षाकाठी लाखों रुपयांचा फायदा होत आहे.नवनाथ कसपटे यांच्या शेतातील सीताफळ लंडन येथील बाजारपेठेत 600 रुपये किलो दराने विकले गेले आहे.या शेतकऱ्यांने सीताफळाची NMK-1Golden ही जात विकसित केली असून तिला भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे.त्यांच्या नर्सरीत सीताफळाच्या अनेक व्हरायटी पहायला मिळतात.
द्राक्ष बाग काढून सीताफळाची बाग लावली
शेतकरी रवींद्र कसपटे यांनी बोलताना सांगितले की,आमच्याकडे सुरुवातीला 1984 साली वडिलांनी एक एकर द्राक्ष बाग लावली होती.द्राक्ष बागेचे क्षेत्र वाढत जाऊन 20 एकरपर्यंत गेले होते.काही वर्षे द्राक्ष एक्स्पोर्ट केल्यानंतर सिताफळाला अचानक भाव मिळाला.सिताफळाला भाव मिळू लागल्याने संपूर्ण द्राक्ष बाग काढून त्याठिकाणी 2010 साली सीताफळाच्या बागेची लागवड करण्यात आली.तर 2001 साली संशोधन केल्यानंतर आम्हाला सीताफळाची एनएमके गोल्डन ही जात सापडली.या व्हरायटीचा अभ्यास करून 2008 साली एनएमके गोल्डन या सीताफळाची लागवड केली.2016 साली एनएमके गोल्डन जातीच्या सीताफळाचे पेटंट मिळावे यासाठी अर्ज केला आणि 2019 साली भारत सरकारकडून पेटंट मिळाले.एनएमके गोल्डन सीताफळाचे रोप 2011 सालापासून शेतकऱ्यांना विकण्यास सुरू केले.सुरुवातीला 70 रुपयाला एक रोप विकले जात होते,पण आता 50 रुपयाला विकत आहोत.आता शासकीय किंमतीत शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करून दिली आहेत.
सीताफळाच्या एकरी बागेतून वर्षाकाठी 5 लाख रुपयांचे मिळते उत्पन्न
आम्ही वर्षाला 10 ते 15 लाख रुपयांची सीताफळाची रोपे विकत असून सिताफळाचे स्वतः उत्पन्न घेतो.आम्हाला एका एकरात वर्षाला 4 ते 5 लाखाचे उत्पन्न मिळते.सिताफळाचा प्लाट व जमीन चांगली असेल तर 6 ते 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.टनामध्ये उत्पन्न मोजले तर एकरी 8 ते 9 टन उत्पादन निघते.काही एकरमध्ये आम्ही 12 टनापर्यंत उत्पन्न घेतले आहे.सिताफळाचे वैशिष्ट्ये म्हणजे उन्हाळ्यात या फळबागेला पाणी लागत नाही.या पिकासाठी मजुरीचा खर्च कमी लागत असून बाग छाटणीच्या व फळ तोडीच्या कामाला मजूर लागतात.बागेचे अधूनमधून काम मशीनने करत असून फवारणी ट्रॅक्टरने करतो.त्यामुळे आम्हाला सीताफळाची शेती परवडते.सीताफळाच्या बागेला एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो आणि उत्पन्न 4 ते 5 लाखाचे मिळते.याच्यावर पडणारे रोग म्हणजे मिलिबग,थ्रिप्स आणि फळमाशी आहे. मिलीबग कीटक वातावरण बिघडले तर येतात.सीताफळावर फवारणी केल्यास हा रोग कंट्रोल होतो.पण फळमाशी या रोगासाठी 5 ते 6 स्प्रे घ्यावे लागतात.आठवड्याला 1 स्प्रे याप्रमाणे सहा आठवड्यात बाग संपून जाते.असे प्रगतशील शेतकरी रवींद्र कसपटे यांनी बोलताना सांगितले.
लंडन शहरात सीताफळ 600 रुपये किलो दराने विकले
सुरुवातीला आम्ही सीताफळ मुंबईच्या मार्केटला पाठवत होतो.त्यानंतर पुण्याच्या मार्केटला पाठवायला चालू केले. गेल्या तीन वर्षांपासून हैद्राबाद,कोलकता, बिहार,दिल्ली येथे सीताफळ विक्रीसाठी पाठवत आहोत.इंग्लंड देशातील लंडन शहरात गेल्या तीन वर्षांपासून सीताफळ विक्रीसाठी पाठवत आहोत.तर गल्फ या देशात गेल्या 5 ते 6 वर्षांपासून सीताफळ एक्स्पोर्ट करत आहोत.लंडन शहरात 600 रुपये दराने सीताफळ विकले गेले असून भाडे वजा करून जागेवरच 100 रुपये किलो दराने विकले गेले आहे. जून महिन्यात सिताफळाला बहार सुरू होतो.त्यावेळेस जर पाऊस व्यवस्थित असेल तर पावसाळ्यात पाणी द्यायची बागेला गरज पडत नाही.जर दोन पावसात अंतर जास्त पडले तर ड्रीपने पाणी द्यावे लागते.ऑक्टोबर ते जानेवारी या तीन महिन्यात सीताफळाच्या फळबागेला पाणी द्यावे लागत नाही.आमच्याकडे सीताफळाच्या भरपूर व्हरायटी असून आम्ही काही जाती विकसित केल्या आहेत.तर काही बाहेरून मागवून घेतल्या आहेत,असे शेतकरी रवींद्र कसपटे यांनी सांगितले.
पेटंट मिळालेल्या एनएमके गोल्डन जातीच्या सीताफळाची ही आहेत वैशिष्ट्ये
एनएमके गोल्डन या सीताफळाच्या फळात बिया कमी आणि गर 60 ते 70 टक्के असतो.फळात 15 ते 20 बिया असून फळाचे वजन 300 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत भरते.फळे मोठी देखणी,दिसायला आकर्षक व रंग सोनेरी पिवळासर गोल्डन असून डोळे मोठे असतात.या फळात साखर 24 टक्के आयर्न 1.48 तर mg-100 ग्रॅम असते.फळ दबते पण फुटत नाही व तडकत नाही.5 वर्षाच्या पुढील झाडाना 100 ते 125 फळे येतात.या झाडांचे आयुष्य सरासरी 50 वर्षे असून लागवडीच्या 2 वर्षानंतर झाडांना फळे येण्यास सुरुवात होते.दुसऱ्या जातीच्या सीताफळाच्या झाडांपेक्षा या झाडांवर किडीचा प्रादुर्भाव कमी असतो व उशिरा फळ पिकल्याने बाजारपेठेत अधिक दर मिळतो.
टिकवण क्षमता जास्त असून वाहतूक,मार्केटिंगला व निर्यातीस अडचण येत नाही.पिकलेली फळे 15 ते 20 दिवस झाडावरच ठेवता येतात.फळे झाडावरून काढल्यानंतर 7 दिवसात पिकतात.लागवडीनंतर 2 वर्षे गरजेनुसार पाणी द्यावे नंतर फेब्रुवारी ते जून महिन्यात पाणी देऊ नये.या सीताफळाची लागवड 12 महिने करता येते पण जून ते जुलै महिन्यात लागवड केलेली अधिक चांगली.लागवडीच्या पहिल्या दोन वर्षात कमी उंचीची व कमी दिवसात निघणारी आंतरपीके सीताफळाच्या बागेत घ्यावी.या फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.त्यासाठी फळ काढणीच्या काळात 8 दिवसाच्या अंतराने नुआन, क्लोरोपायरीफॉस आलटून-पालटून प्रति लिटर पाण्यात 2 मिली प्रमाणे फवारल्यास या सीताफळावर फळमाशी रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.