रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?
रस्त्यावरून जात असताना रस्त्यात खड्डा आहे,की खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजत नाही. या प्रशासनाला वारंवार तक्रारी देवून देखील त्याची दखल घेतली जात नाही, सोलापूर जिल्ह्यातील अष्ठे ते खूनेशवर रस्त्याची झाली दुरावस्थेवरील प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट;
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अष्ठे ते खूनेश्र्वर या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून वर्षानुवर्षे हा रस्ता दुर्लक्षित राहिला असल्याचे सांगितले जात आहे. चार ते पाच गावांना जोडणाऱ्या या रस्त्याची चाळण झाली असून मोठ - मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारक,शेतकरी,विद्यार्थी,महिला यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजेना गेले आहे. प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरावस्थे संबंधी वारंवार निवेदने देवून ही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. प्रशासन काय भूमिका घेतेय याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
ग्रामीण भागातील रस्ते गाव खेड्यांना जोडणारे महत्वाचे साधन
रस्ते गाव खेड्यांना जोडणारे महत्वाचे साधने असून गाव खेड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावत आहेत. शेतात पिकवला जाणाऱ्या माल याच रस्त्याने शहरातील मार्केटला पाठविला जातो. जर रस्ते चांगले असतील तर दळणवळण अतिशय सुलभ होवून गावचा विकास होण्यास मदत होते. गावची पारख रस्त्यावरून केली जात असून गावाला जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसेल तर या गावाकडे वाहन धारक देखील येण्यास टाळाटाळ करतात. लहान - सहान व्यवसायिक देखील या गावाकडे फिरकत नाही. त्यामुळे गावाला अपरिमित अशा नुकसानीला सामोरे जावे लागते. असाच प्रकार अष्टे ते खुनेश्र्वर रस्त्याच्या बाबतीत घडला असून या रस्त्यावर असणाऱ्या गावांना अपरिमित नुकसान सोसावे लागत आहे.
राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरावस्था
राज्याच्या ग्रामीण भागातील गावा गावांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्या असल्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अशी स्थिती असेल तर आदिवासी भागातील रस्त्यांचा विचारच करायला नको,असे अनेकांना वाटते. या रस्त्यावरून जात असताना रस्त्यात खड्डा आहे,की खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजून येत नाही. या याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी देवून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. मध्यंतरी वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असलेला मुंबई - गोवा महामार्ग हा रस्ता कमी आणि खड्डे जास्त दिसून आला होता. याबाबत अनेकांनी आवाज उठवल्यानंतर थोडीफार डागडुजी करण्यात आली. काल परवाच धुळे शहरात पोलीस मुख्यालयाच्या समोर रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्याना वैतागून प्रशासनाचे रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यातील घाण पाण्यात आंदोलन करण्यात आले होते. रस्त्यांची अशीच परस्थिती राज्यातील अनेक रस्त्यांची आहे. रस्त्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र विभाग असून ही रस्त्याची समस्या वर्षानुवर्षे भेडसावत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे रस्ते खराब
असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर आढळून येतो. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने सर्व सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा निवेदने देवून ही दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यातून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. मध्यंतरी सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांची चाळण झाली होती. जिल्ह्यातील पेनुर - येवती - रोपळे गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले असून शासन, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अष्ठे ते खूनेशवर रस्त्याची झाली दुरावस्था
अष्ठे ते खुनेश्र्वर या रस्त्यावर सुमारे पाच गावे वसलेली असून या गावातील नागरिक मोहोळ,सोलापूर येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वर्षानुवर्षे वापर करत आहेत. हा रस्ता लोकांच्या नेहमीच्या रहदारीचा असून देखील प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिलेला आहे. जसा रस्ता तयार करण्यात आला आहे, तसा रस्ता दुरुस्त करण्यात आला नसल्याचे नागरिक सांगतात. या रस्त्यावर मोठ - मोठे खड्डे पडले असून वाहन धारकाना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर मोठ - मोठे खड्डे पडल्याने गाडी वेगाने ही चालवता येत आहे. या रस्त्यावर असणाऱ्या चार ते पाच गावांची उपजीविका शेतीवर अवलंबून असून वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. शेतकऱ्यांचा शेतातील माल विक्रीसाठी पुणे, मुंबई,सोलापूर,कोल्हापूर,कर्नाटक,आंध्र प्रदेश येथे पाठवण्यासाठी शेतकरी वाहन धारक या रस्त्याचा उपयोग असून अनेकदा माल खड्ड्यात आदळत असल्याने शेती मालाचे नुकसान होत आहेत. व्यवस्थितरीत्या माल मार्केटला गेला नसल्याने त्याला पैसे कमी मिळतात. माल घेवून मार्केटला वेगाने जाता येतही येत नाही. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मार्केटला पोहचण्यास उशीर होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. दळण - वळण सुलभ व्हावे,यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे,असे ग्रामस्थांना वाटत आहे.
आजारी रुग्णांना दवाखान्यात घेवून जाताना होतोय त्रास
या रस्त्यावर असणाऱ्या गावातील नागरिकांना आजारी असणाऱ्या लोकांना दवाखान्यात घेवून जाताना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. गरोदर महिलांना या खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या चार ते पाच गावातील नागरिक आजारी पडल्यास या रस्त्यामुळे रुग्ण वाहिका सुद्धा गावात येत नाहीत. असे नागरिक सांगतात.
शेतकरी,विद्यार्थी,वाहनधारक यांना सहन करावा लागतोय त्रास
या रस्त्यावरून शेतकरी दूध घेवून जात असताना त्यांच्या दुधाचे कॅन पलटी होवू लागले आहेत. या रस्त्यावर दोन ते तीन फुटाचे खड्डे पडल्याने त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर या गावातील विद्यार्थी शाळा,कॉलेजला जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करत असून त्यांना खड्डेमय रस्त्यामुळे वेळेवर शाळेत पोहचता येत नाही. वाहन धारकांना या रस्त्यावरून जात असताना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या वाहनाचे दररोज नुकसान होत असून रस्त्याचे काम लवकर करावे,अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
बांधकाम विभागाकडून उत्तर नाही
हा रस्ता पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे येत असल्याने त्याबाबत विचारणा करण्यासाठी फोन केला असता फोन रिसिव्ह केला नसल्याने त्यांचे उत्तर मिळू शकले नाही.