ग्राऊंड रिपोर्ट : मंत्र्यांनी या रस्त्यावरुन एकदा तरी नक्की जावे !

Update: 2020-11-10 15:30 GMT

अलिबाग रामराज सुडकोली या 26 किमी अंतर असलेल्या मार्गावर खड्डे, दगडगोटे, चिखल, माती खडी यामुळे या मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे व धोक्याचे झाले आहे. सदर रस्त्याची जलद करुन करुन जनतेचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा याकरिता वरंडे गावचे सरपंच सुधीर चेरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रायगडचे जिल्हाधिकारी, रायगडचे पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देखील देण्यात आले आहे. पण यावर अजूनपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही.

रायगडमधील रोहा व अलिबाग मार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी 230 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बांधा, वापरा व हस्तांतरण करा या धोरणातून हा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र सद्यस्थितीत सर्वच कामे ठप्प झाल्याने या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम देखील लालफितीत अडकून पडले आहे. मध्यंतरी रायगड व रत्नागिरीमध्ये सुमारे 850 कोटी रुपयांचे रस्ते बांधण्याचे सरकारने जाहीर केले होते. या 850 कोटींमध्ये दोन्ही जिल्ह्यातील रस्त्याचे एकत्र पॅकेज होते. त्यामुळे या कामासाठी काढलेल्या निविदेला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अलिबाग रोहा, मुरुड व पोयनाड नागोठणे असे या विकासकामांचे स्वरूप करण्यात आले. मात्र अलिबाग-रोहा मार्गासाठी सद्यस्थितीत आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने डांबरीकरण दूर पण साधे खड्डे भरणेदेखील कठीण झाले आहे.


अलिबाग हे जिल्ह्यातील एक मुख्य केंद्र असल्याने नागरिकांना हॉस्पिटल, कोर्ट, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच इतर सरकारी, निमसरकारी व खाजगी कार्यालयात सतत काही ना काही कामासाठी जावे लागते. पण अलिबाग रामराज रस्त्याची आज जी दूरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना चारचाकी तर सोडा, दुचाकी चालवणे सुद्धा कठीण झाले आहे. अलिबाग येथे नोकरीधंद्याच्या निमित्ताने रोज अपडाऊन करणाऱ्यांची स्थिती अगदी केविलवाणी झाली आहे. कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी कोणत्याही परिस्थितीत त्यांना रोज नाईलाजास्तव अलिबाग गाठावेच लागते.

बऱ्याच जणांना अत्यंत खराब रस्त्यावरून ये-जा करून मणक्यांचे विकार सुरु झाले आहेत. अलिबाग - रोहा हा रस्ता या भागाची जीवनवाहिनी आहे. नागरिकांना व्यवसाय, नोकरी, शिक्षण, कृषी, कोर्ट-कचेरी आणि सरकारी कार्यालयातील कामे इत्यादीसाठी अलिबाग व रोहा या दोन्ही शहरांचा संबंध येतो. या रस्त्यावरून दुचाकी, रिक्षा, चारचाकी खाजगी वाहनांबरोबर सरकारी वाहनांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात आहे. सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण झाल्याचे लोक सांगतात. त्यानंतर जेव्हा जेव्हा रस्ता खराब झाला तेव्हा - तेव्हा हितसंबंध जपत या कंत्राटदारांना रस्ता दुरुस्तीची कंत्राटे देऊन रस्त्याची थातूर - मातुर दुरुस्ती करण्यात आली, असा आरोप इथेल लोक करत आहेत. परंतु दुरुस्तीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असतात, त्याचा परिणाम आज दिसून येत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. पर्यायाने गेल्या तीस पस्तीस वर्षात अपेक्षित निकषाप्रमाणे रस्त्याची दुरुस्ती / डागडूजी झाली नसल्या कारणाने रस्ता कित्येक वर्षे नादुरुस्त असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांचे देखभाल, दुरुस्ती व डांबरीकरण होत असताना या मार्गाला अच्छे दिन कधी येणार असा सवाल संतप्त ग्रामस्थ व प्रवाशी वाहनचालक यांनी उपस्थित केला आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असते. जीव मुठीत धरून लोकांना प्रवास करावा लागतो. या रस्त्यांमुळे आरोग्याचे आणि वाहनांचे मोटे नुकसान होते. रस्ता दुरुस्तीसाठी राजकारण्यांनी बरेच नारळ फोडले, पण रस्त्याची दुरुस्ती करण्याची कोणाचीही मानसिकता नव्हती व नाही, असेच इथल्या परिस्थितीवरुन दिसते. आजपर्यंत येथील जनतेने रस्त्याचे नुतनीकरण होऊन प्रवास सुखकर होईल या आशेने आमदार , खासदार निवडून दिले, परंतु निवडून आल्यावर त्यांनी नारळ फोडून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याशिवाय काहीच केले नाही. सर्व आमदार, खासदार, पालकमंत्री तसेच सर्व राजकारणी आपापल्या प्रगतीच्या मागे लागले आहेत. काही राजकारणी या रस्त्यावरून सतत ये-जा करीत असून त्यांना रस्त्यावरील एकही खड्डा दिसून येत नाही का, असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडतो.

आता पाणी डोक्यावरून जाऊ लागले असून येथील नागरीकांचा संयम सुटत चाललेला आहे. संतापलेले नागरिक आपल्या संविधानिक अधिकाराचा वापर करण्याच्या तयारीत आहेत. जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्यांना आवरणे शक्य होणार नाही तसंच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे झाले तर यास जिल्हा प्रशासन व संबंधित अधिकारी जबाबदार असतील असा इशारा या बागातील लोकांनी दिला आहे. येथील नागरीकांचा उद्रेक होण्याआधी या रस्त्याचे संपूर्ण नुतनीकरण होणे गरजेचे आहे. नुतनीकरण म्हणजे खडी टाकून थातूरमातुर तात्पुरते खड्डे भरणे नव्हे याची नोंद घ्यावी, तसेच सदर रस्त्याच्या नुतनीकरणाची सुरुवात अलिबाग - बेलकडे या बाजूने न करता रामराज किंवा वावे येथून करावी व नुतनीकरणाचे काम चालू असताना कामाच्या प्रतीची चौकशी करण्याची जोरदार मागणी वरंडे ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर चेरकर यांनी केली आहे.



या भागात राहणारे एडव्होकेट राकेश पाटील म्हणाले की, "रस्त्याच्या दूरवस्थेबाबत येथील जनतेत प्रचंड चीड व असंतोष उफाळून आला आहे. रस्त्याची सुधारणा व्हावी याकरिता राजकारण विरहीत जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने याचा धसका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे, अशातच रस्त्याचे काम दर्जेदार व टिकाऊ न झाल्यास येत्या काळात अधिक उग्र आंदोलन पुकारले जाईल," असा इशारा पाटील यांनी दिला आहे. ऍड. मधुकर वाजंत्री यांच्या मते सदरच्या 26 किमी च्या रस्त्याच्या कामात कुठेही निकृष्ट दर्जाचे काम होत असलेले आढळल्यास तात्काळ काम थांबवून संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल केला पाहिजे .

दरम्यान यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल बागुल यांच्याशी संपर्क साधला तेव्हा, "अलिबाग रोहा रस्ता रामा 91 या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येईल, अलिबाग रोहा हा रस्ता हायब्रीड अन्यूइटी अंतर्गत येत असल्याने सदरच्या निविदा प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तत्पूर्वी या रस्त्यावरील खड्डे खडी-डांबराने भरण्यासाठीचा ठराव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आला आहे. सदरच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झाल्यावर लवकरात लवकर खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात येईल. वरीलप्रमाणे वेळेत मंजुरी मिळाल्यास डांबरीकरण केले जाईल असे सरकारी उत्तर त्यांनी दिली आहे.

या रस्त्यावरुन मंत्र्यांनी सामान्य नागरिकांसारखा प्रवास एकदा करुन पाहावा असे इथल्या काही नागरिकांना वाटते. रोहा आणि अलिबागला या सत्ता केंद्रांना जोडणारा हा रस्त्या दुरूस्त झाला पाहिजे, अशी मागणी इथले लोक करत आहे.



Full View
Tags:    

Similar News