max maharashtra impact: 'तीस-तीस' फसव्या योजनापासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
राज्यात गाजलेल्या केबीसी योजनाप्रमाणेच आतामराठवाड्यात 'तीस-तीस' या नावाने खाजगी योजनेने ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे.रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणारे अनेक लोकं यात मोठ्याप्रमाणात पैसे गुंतवणूक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ही फसवी योजना असल्याची बातमी सर्वात आधी मॅक्स महाराष्ट्राने 8 फेब्रुवारी 2021 रोजी समोर आणली होती. त्यांनतर आता पोलिसांकडून सुद्धा आशा फसव्या योजना पासून लोकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची अडीच वर्षांत तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवत 'केबीसी' कंपनीने फसवणूक केल्याचा प्रकार काही वर्षांपूर्वी समोर आला होता. तर या कंपनीचा संस्थापक भाऊसाहेब चव्हाण याने ठिकठिकाणी दलाल नेमून आणि भव्यदिव्य मेळाव्यांचे आयोजन करत 'केबीसी'ने सर्वसामान्यांना जाळ्यात ओढण्याचे काम केले होते.तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार फसवणूक झालेली रक्कम
तब्बल २१० कोटींच्या घरात होती.
आता पुन्हा अशीच एक योजना ग्रामीण भागात चर्चेचा विषय बनला आहे. कमी कालवधीत दामदुप्पट पैसे मिळण्याच्या आमिषाने यात अनेक जण पैसे गुंतवणूक करत आहे. विशेष म्हणजे ही योजना फक्त तोंडी चालत असून, याची कोणतेही अधिकृत नोंदणी नाही. त्यामुळे गुंतवणूकदार यांना कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे मिळत नसून, सुरक्षेची हामी सुद्धा मिळत नाही. तर राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा चार ते पाच पट जास्त व्याज गुंतवणूकदार यांना दिले जाते.
विशेष म्हणजे ज्या भागात सरकारी प्रकल्पाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना या योजनेत ओढण्याचा प्रयत्न केला जातो. केबीसी प्रमाणेच इथंही साखळी पद्धत आहे. तुम्ही जर लोकं जोडले तर तुम्ही गुंतवलेल्या रक्कमला मिळणाऱ्या व्याजाचा टक्का वाढत जातो. जो पुढे 10 टक्क्यांपर्यंत वाढवून दिला जातो.मात्र गेल्या सात महिन्यांपासून गुंतवणूकदारांना परतावा मिळाला नसल्याने 'तीस-तीस' योजना चालवणारे संचालक पळून गेल्याची चर्चा आहे.
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून आवाहन
औरंगाबाद ग्रामीण भागात सद्या काही फसव्या योजनांच्या नावे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहेत. बिडकीन पोलीस ठाणे अंतर्गत सुद्धा काही गावांमध्ये तीस-तीस नावाची फसवी योजना सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांनी आशा फसव्या योजनांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसेच, कोणत्याही योजनामध्ये गुंतवणूक करतांना खात्री करून पैसे गुंतवणूक करावी. तसेच आशा फसव्या योजनांबाबत कोणी लोकांची फसवणूक करत असेल तर, पोलीसांशी संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी केलं आहे.