Nanded | नांदेड: रस्ता नसल्याने खाटेवरून न्यावा लागतो मृतदेह
रस्ता नसल्याने रुग्णांना खाटेवरुन दवाखान्यात नेण्याची वेळ नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील नागरिकांवर आली आहे. पहा विकासाचा बुरखा फाडणारा रिपोर्ट...;
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात व रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असते. तरी देखील आजही रस्ता नसल्याने रुग्णांना खाटेवर टाकून दवाखान्यात न्यावे लागत असल्याची परिस्थिती नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आहे. मुखेड तालुक्यातील सोसायटी तांडा, खोरी तांडा व बेंडकी तांडा येथील ग्रामस्थांवर ही परिस्थिती ओढवली आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना, ग्रामीण भागात मात्र अद्यापही भौतिक आणि आरोग्य सुविधांचा वानवा असल्याचे यावरून दिसून येते.
मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या तिन्ही तांडयातील नागरिकांवर रस्ता नसल्याने रुग्णांना,खाटेवर घेऊन जाण्याची वेळ आली आहे. २० जुलै रोजी मुखेड तालुका व उंद्री गाव परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. वाहन तर सोडाच,पण चालणेही अवघड झाले आहे.अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडली किंवा आजारपण आले तर सरळ रुग्णाला खाटेवर घेऊन जाण्या शिवाय पर्याय नाही.
खोरी तांडा येथील चंदर चव्हाण हे शेतात काम करीत असताना गायीने धडक दिली. त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर मार लागला. दवाखान्यात दाखल करण्याची धावपळ सुरू केली.पण रस्ता नसल्याने त्यांना खाटेवर घेऊन रुग्णालयात जावे लागले. खोरी तांडा येथून साधारण २ कि.मी. अंतरापर्यंत उंदरी (प.दे.) पर्यंतचा प्रवास खाटेवर टाकून करण्यात आला आणि पुढे त्यांना वाहनाने देगलूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरम्यान रुग्णांना तांड्यावर वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे रात्री-अपरात्री रुग्णांना उपचारासाठी खाटेवरच घेऊन शहर गाठावे लागत आहे.