रायगडात गुरं चोरांच्या टोळीचा सुळसुळाट
मुंबई महानगराजवळ असलेल्या रायगडमधे भरदिवसा गुरं चोरट्यांची टोळी सक्रीय झाली आहे. आतापर्यंत शेकडो गुरं गेली चोरीला गेली असून कसईशेत हातोंड येथील अनेक गुरे बेशुद्धावस्थेत सापडल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची पोलीस स्थानकात धाव घेतली तरी चोऱ्या थांबत नाहीत, गुरे चोरीच्या टोळीच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालं आहे... आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;
मुंबई महानगराजवळ असलेल्या रायगडमधे भरदिवसा गुरं चोरट्यांची टोळी सक्रीय झाली आहे. आतापर्यंत शेकडो गुरं गेली चोरीला गेली असून कसईशेत हातोंड येथील अनेक गुरे बेशुद्धावस्थेत सापडल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची पोलीस स्थानकात धाव घेतली तरी चोऱ्या थांबत नाहीत, गुरे चोरीच्या टोळीच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालं आहे... आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट....
सुधागड तालुक्यातील शेतकऱ्यांची गुरे मध्यरात्रीच्या सुमारास चोरीला जात असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाली असून आजवर शेकडो गुरे चोरीला गेल्याची तक्रार व ओरड सुधागड तालुक्यातील शेतकरी परशुराम हाशा निरगुडा व अन्य शेतकरी करीत आहेत. गुरे चोरीचे प्रमाण मागील वर्षभरात थांबले होते मात्र या गुरे चोरी प्रकाराला पुन्हा पेव फुटल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुधागड तालुक्यातील परळी जांभुळपाडा विभागात गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुध्द करून चारचाकी वाहनातून मोकाट गुरे चोरणारी टोळी सध्या कार्यरत झाली आहे.
या संदर्भात शेतकरी एकवटले असून अज्ञात टोळी गुरे चोरत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जांभूळपाडा पोलीस स्थानकात दिली असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर आता या गुरे चोरीला आळा घालण्याचे व चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. कसईशेत, पो.हातोंड येथील शेतकरी परशुराम हाशा निरगुडा यांनी दि.(03)रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझ्या मालकीच्या वाड्याच्या रिकाम्या मोकळ्या जागेत स्वतःच्या मालकीची व गावाच्या इतर शेतकऱ्यांची दिवसभर चरायला गेलेली गुरे विश्रांतीला बसतात, हा दैनंदिन उपक्रम आहे.
मात्र पहाटे च्या सुमारास गुरांचा आरडा ओरडा झाल्याची बाब एका ग्रामस्थाने घरी येऊन सांगितल्यावर शेतकरी गुरांच्या ठिकाणी धावले, मात्र गुरे बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले , काही गुरे बेशुद्धावस्थेत आढळली, गुरे चोरीला गेल्याची खात्री झाली यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेतली.
यामध्ये परशुराम निरगुडा यांची दोन गुरे, लिंबाजी निरगुडा यांची दोन गुरे, नारायण वाघमारे यांची दोन गुरे, झिमा ठोंबरे 1 गुर, व वामन वाघमारे यांचे 1 गुर चोरीला गेल्याची तक्रार शेतकऱ्यांनी पोलीस स्थानकात केली आहे. सुधागड तालुका हा आदिवासी बहुल व कष्टकरी, श्रमजीवी व शेतकरी वर्गाचा समावेश असलेला कृषिप्रधान तालुका आहे, याठिकाणी शेती व्यवसायबरोबर पशुपालन व दुग्धव्यवसाय केला जातो, अशातच गुरांच्या किमती वाढल्याने एखादे गाय अथवा बैल दगावला अथवा चोरीला गेला तर गोरगरीब सामान्य शेतकऱ्यावर आभाळ कोसळते, कर्ज काढून व्याज चक्रात फसून शेतकऱ्याला गुरे घ्यावी लागतात.
मात्र एकावेळी चार ते पाच गुरे चोरीला गेली तर त्या शेतकऱ्यावर मोठे आस्मानी संकट कोसळते, शेतकऱ्याची वाताहात होते, इतकेच नव्हे तर शेतकऱ्याच्या कुटुंबावर उपासमारी सारखे संकट देखील ओढवते, त्यामुळे गुरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दापाश करून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. यावेळी परशुराम हाशा निरगुडा, भिवा हीरु शिद, गोमा पदू ठोंबरे , उपसरपंच पंकज पाठारे, सदस्य रमेश वाघमारे ,माजी उपसरपंच रमेश पाठारे, जगन्नाथ पाठारे , रविंद्र चौधरी ,नारायण वाघमारे ,पदू वाघमारे ,सोमा शिद आदींसह शेकडो शेतकऱ्यांनी जांभुळ पाडा पोलीस दुरक्षेत्रात उपस्थित राहून तक्रार दिली.
यावेळी उपसरपंच रमेश पाठारे यांनी सांगितले की सुधागड तालुक्यातील ग्रामीण व डोंगरपट्टी भागात आता गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे, त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत, हातोंड विभागातील कसइशेत व इतर ठिकाणची शेकडो गुरे चोरीला गेली आहेत, त्यामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत. आता पहाटे आठ गुरे चोरीला गेली , तर काही गुरे बेशुद्धावस्थेत आढळली, शेतकऱ्यांपुढे हे मोठं आव्हान आहे, गुरे चोरांच्या टोळीचा पर्दापाश् करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे उपसरपंच पाठारे म्हणाले.
याच गावातील आणखी एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली, त्याने सांगितले की दिवसभर आमची गुरे रानावनात चरायला जातात व रात्री येतात, यावेळी सर्व गुरे गावाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत बसतात, सहसा याठिकाणी रात्री कुणी लक्ष ठेवायला नसत, याचाच फायदा घेऊन या गुरांना इंजेक्शन देऊन चोरून नेले जाते, हे थांबले पाहिजे, शेतकरी इतके महागडे गाय बैल कसे खरेदी करणार, पोलीस प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन उपाययोजना केली पाहिजे,
तक्रारदार परशुराम निरगुडा या शेतकऱ्याने सांगितले की हिवाळ्यात गुरे चोर सक्रिय होतात, रात्री दोन ते तीन च्या सुमारास वाहन येते व गाव झोपेत असताना गुरे पळवली जातात, पोलिसांनी पोलीस व्हँनची गस्त वाढवली पाहिजे.
शेतकऱ्यांची गुरे चोरीला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यानुसार संशयित व अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरे चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने नाकाबंदी सह आवश्यक ती उपाययोजना करण्यावर भर दिला आहे, मध्यरात्री महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे, तसेच ग्रामीण भागात पोलीस व्हॅन गस्त घालणार आहे, मध्यरात्री येणारी संशयास्पद वाहने तपासली जातील, बाहेरच्या वाहनांवर करडी नजर ठेवली जाईल, तसेच काही ग्रामपंचायतींना महत्वाच्या व मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत केल्याचे पोलिस निरीक्षक विजय तायडेंनी सांगितलं...