प्रदुषणाचा धोका वाढला, खारघरची फुफ्फुसं झाले १० दिवसात बेजार
मुंबईसह आता नवी मुंबईतही प्रदुषणाचा धोका किती वाढला आहे याची धक्कादायक माहिती एका संस्थेच्या प्रयोगातून समोर आली आहे.
पुणे, मुंबई आणि आता प्रदुषित शहरांच्या यादीत नवी मुंबईचेही नाव पुढे आले आहे. 15 जानेवारी रोजी खारघरच्या वर्दळीच्या चौकात उभारलेल्या पाढंऱ्या शुभ्र रंगाच्या कृत्रिम फुफ्फुसांचा रंग केवळ 10 दिवसांत काळा पडला आहे. खारघर-तळोजा-पनवेल परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वायू प्रदुषणाबाबत सामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी वातावरण फाउंडेशनने आखलेल्या एका आगळ्यावेगळ्या मोहिमे अंतर्गत खारघरच्या चौकात कृत्रिम फुफ्फुस लावण्यात आली होती.
अशाच प्रकारची कृत्रिम फुफ्फुसांची जोडी जानेवारी 2020 मध्ये मुंबईच्या वांद्रे परिसरात उभारण्यात आली होती. ती फुफ्फुसंही केवळ 14 दिवसांत काळी पडली होती. तर, दिल्लीत नोव्हेंबर 2018 मध्ये तयार केलेली कृत्रिम फुफ्फुसे अवघ्या 6 दिवसांत काळी झाली होती.
द बिलबोर्ड दॅट ब्रेथ्स असे शीर्षक देऊन ही कृत्रिम फुफ्फुसं खारघर येथील सेक्टर 7 मधील बॅंक ऑफ इंडिया चौकात उभारण्यात आली होती. वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभट यांच्या मते, हवेचे प्रदुषण झाल्याचे लक्षण दाखवणारा कोणता तरी एक घटक श्वासावाटे आपल्याही शरिरात जातो आहे, हेच या फुफ्फुसांच्या बदललेल्या रंगातून आपण ओळखू शकतो. आता गेल्या काही दिवसांत लॉकडाऊन उघडल्यानंतर रस्त्यावरची रहदारी तसेच, बांधकामं अशा गोष्टी पुन्हा सुरू झाल्याने वायू प्रदुषणाची पातळीही वाढत चालली आहे.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की खारघर-तळोजा-पनवेल परिसरातल्या वायू प्रदुषणाच्या या गंभीर समस्येचे निवारण करण्यासाठी सर्वच सामान्य लोकांनी एकत्र येऊन एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. स्थानिक रहिवासी रोज श्वासावाटे प्रदुषित, विषारी हवा शरिरात घेतात, याबद्दल चिंता व्यक्त करताना महापौर डॉ. कविता चौतमाल यांनीही हवेचा पोत तपासण्यासाठी आणि यामागचे कारण समजून घेऊन त्यावर उपाययोजना राबवण्यासाठी एका विशेष समितीची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे.
वातावरण फाउंडेशनतर्फे 13 नोव्हेंबर 2020 ते 13 डिसेंबर 2020 या एक महिन्याच्या कालावधीत हवेच्या दर्जाची तपासणी करण्यात आली. यानुसार असे निदर्शनास आले की, खारघर-तळोजा-पनवेल परिसरातील लोक दिवसांतून जवळपास 17 तास प्रदुषित हवेत श्वास घेतात. या अभ्यासांती असे स्पष्ट झाले की, या भागातल्या हवेत सकाळी 6 ते 8 या वेळात पर्टिक्युलर मॅटर पोल्युटंट म्हणजेच पीएम 2.5 हा घटक सर्वाधित असतो...
तज्ञांची मते... पल्मोकेअर रिसर्च अण्ड एज्युकेशन (PURE) फाउंडचे डॉ. संदीप साळवी यांच्या मते लहान मुले असोत वा ज्येष्ठ नागरिक. या नकली फुफ्फुसांचं जे होत आहे, तेच आपल्याही फुफ्फुसांचं होत आहे. काळ्या फुफ्फुसांमुळे अशी व्यक्ती असंख्या आजारांचं माहेरघर बनू शकते. यात दमा आणि न्युमोनिटिस यांसारख्या आजारांपासून फुफ्फुसांच्या कर्करोगासारक्या गंभीर आजारांचाही समावेश असू शकतो. हवा प्रदुषणाचा गंभीर परिणाम आपले ह्रदय, मेंदू आणि मज्जासंस्थेवरही होतो. त्यामुळे, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो. या कृत्रिम फुफ्फुसांचा रंग फारच कमी काळात काळा झाला आहे. ही नक्कीच धोक्याची घंटा आहे आणि या समस्येवर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढण्याची गरज आहे, हेच यातून स्पष्ट होते.
नानावटी सूपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजी आणि ब्रॉन्कोस्कोपी सल्लागार डॉ. सलील बेंद्रे यांच्यामते खारघरमधल्या या कृत्रिम पण जीवंत फुफ्फुसांचा रंग बदलल्यामुळे आपल्या आजुबाजूच्या हवेत किती प्रदुषके आहेत आणि आपण दररोज किती धोकादायक हवा शरिरात घेतो हे स्पष्ट झाले आहे. हवेचे प्रदुषण हे फुफ्फुसांच्या आजारामागचे एक महत्वाचे कारण असून हवेतला कार्बन आणि हायड्रोकार्बन यामुळे फुफ्फुसांना मोठी हानी पोहोचते. प्रदुषण पातळी वाढेल तसा हवेतला कार्बनही वाढेल आणि अखेर, फुफ्फुसांच्या अत्यंत गंभीर अशा आजारांना आपण सर्वचजण आमंत्रण देऊ. वायू प्रदुषणावर नियंत्रण ठेवणं ही काळाची गरज का आहे, हे या प्रकल्पातून स्पष्ट झाले आहे.
लंग केअर क्लिनिकचे सल्लागार डॉ. प्रशांत छाजेड यांच्या मतानुसार मानवी फुफ्फुसांवर हवेतल्या प्रदुषकांचा किती आणि कसा गंभीर परिणाम होतो, हे दाखवणारा हा अतिशय सुंदर दृश्यात्मक प्रयोग आहे. श्वास घेण्यास त्रास होणे, क्रोनिक आणि एपिसोडिक कफ, क्रोनिक ब्रॉंकायटिस, ऑबस्ट्रक्टिव्ह एअरवेज डिसीज, ऱ्हायनिटिस, कर्करोग, कार्डिओव्हॅस्क्युलर आजार आणि उच्च रक्तदाब अशा अनेक समस्या सांगणाऱ्या लोकांची वाढती संख्या आणि वाढते वायू प्रदुषण याचा थेट संबंध आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे, वैयक्तिक शारीरिक नुकसानासोबतच एकूणच माणसांची सकारात्मक उत्पादकता कमी झाल्यामुळे याचे आर्थिक परिणामही गंभीर होऊ शकतात. आपल्या श्वास घेणाऱ्या या फुफ्फुसांना वाचवायचे असेल, तर वायू प्रदुषणावर त्वरित योग्य त्या उपाययोजना आखण्याची आता गरज आहे.