संतप्त गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पाजले गढूळ व खारे पाणी
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील महिलांनी पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना गढूळ आणि खारे पाणी पाजले. त्याबाबतचा मॅक्स महाराष्ट्रचे धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट...
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील अनेक गावे व वाड्या वस्त्यात सद्यस्थितीत पाण्याची भीषण टंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला रखरखत्या उन्हात वणवण भटकत आहेत. पेण विभाग हे भरपूर पाऊस पडणारे तसेच हेटवणे , शाहपाडा , बाळगंगा इत्यादी धरणे व जलस्त्रोत असलेले , भोगावती नदी , तलावं असे मुबलक जलसाठे असलेले आहे . परंतु तालुक्यातील पाणी प्रश्न गेली वीस - पंचवीस वर्ष हा कायमचाच बारा महिने सुरू आहे . येथील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे या मागणी साठी आज प्रांताधिकारी कार्यालय पेण येथे भारतीय महिला फेडरेशन च्या माध्यमातून मोहिनी गोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर पाण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त आंदोलक व गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना गढूळ व खारे पाणी पाजले. तुम्ही एक दिवस हे पाणी पिऊ शकत नाही आम्ही वर्षाचे 12 महिने हे पाणी पितो, आम्ही गुरे ढोरे आहोत का? असा सवाल महिलांनी उपस्थित केला. यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या.
नागरिकांच्या मागण्या-
- येथील रखडलेले पाणी प्रकल्प पूर्ण करावे . हेटवणे ते शाहपाडा वाढीव पाणी प्रकल्प , दक्षिण शाहपाडा कालवा , डावातीर कालवा , बाणगंगा पाणी प्रकल्प त्वरित पूर्ण करावे . कालवा धरणातील व इतर पाणीसाठ्यातील गाळ काढणे .
- सिडको किंवा जेएसडब्ल्यू असे पाण्याचे कंपनीकरण थांबवून महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरणांकडे सर्व पाण्याचे नियोजन द्यावे . आदि मागण्या करण्यात आल्या. पाणी प्रश्नावर यापूर्वी 2 मार्च , 2022 ला पाणी प्रश्नासंदर्भात मोठे महिला आंदोलन झाले . त्या बैठकीतील चर्चेनुसार 31 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत कामे होतील असे सांगण्यात आले . 25 मार्च रोजी 150 महिलांच्या सह्यांचे स्मरणपत्राद्वारे पाणी प्रश्न संदर्भात पाठपुरावा केलेला होता . कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या कामाची माहिती मिळावी या मागणी बरोबर सध्या जो काही अपुरा पाणी पुरवठा होत आहे तो किमान शुध्द मिळावा अशी विनंती केली होती . त्यास प्रशासनाकड़ून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही . अशी नाराजी आन्दोलकांनी व्यक्त केली. जोपर्यंत शुद्ध व मुबलक पाणी मिलत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल अशी भूमिका आन्दोलकांनी मांडली.