पतीच्या निधनानंतर तिने रापी उचलली आणि फाटलेला संसार सांधला...
पतीचे निधन झाले. सुरळीत सुरु असलेला संसार कोलमडला. ती डगमगली नाही. समोरची रापी उचलली आणि पतीच्या व्यवसायाची जबाबदारी स्वतः पेलली. पहा तिची प्रेरणादायी कहाणी…
सुंदर मंगरुमखाने यांचे पती चपला शिवणे, बुट पॉलिश करण्याचा व्यवसाय करत होते. उन्हातान्हात हातातल्या रापीने चपला शिऊन मिळालेल्या पैशातून त्यांचा संसार चालत होता.
पतीचे निधन झाले आणि सुरळीत सुरू असलेला संसारच मोडून पडला. पती हयात असताना त्यांचे काम त्यांनी पाहिलेले होते. त्याच अनुभवातून सुंदर यांनी समोर पडलेली रापी उचलली आणि फाटलेल्या संसाराला याच रापीने सांधायला सुरवात केली. या व्यवसायातून त्यांना फारसा अर्थिक फायदा होत नाही. परंतु उन्हात बसून कष्टाने मिळालेल्या पैशातून किमान घर चालण्यापुरते पैसे मिळतात.
सुंदर मंगरुमखाने यांचे पती याच ठिकाणी उन्हात बसून चपला सांधायचे. त्याच तळपत्या उन्हात त्या स्वतः चपला शिवत आहेत. गटई काम करणाऱ्या कामगारांकरीता गटई स्टॉल वाटप करण्याची योजना आहे. अनेकदा अर्ज करून देखील त्यांना अद्याप पर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही. सरकारने स्टॉल देऊन तळपत्या उन्हाच्या वणव्यातून त्यांचा बचाव करावा अशी मागणी त्या करत आहेत..