GroundReport : लॉकडाऊनमधून सावरणाऱ्या शेतकऱ्यांना बर्ड फ्लूनं मारलं
लॉकडाऊनमुळे फटका बसलेले शेतकरी, पोल्ट्रीफार्म उद्योजक कसेबसे उभे राहण्याचा प्रयत्न करत होते. पण बर्ड फ्लूने त्यांच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरवले आहे. यामुळे काय परिणाम झाला आहे हे सांगणारा आमचे करस्पाँडन्ट मोसीन शेख यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;
आभाळच फाटल्यावर ठिगळ तरी कुठं-कुठं लावावं असे म्हणतात. सध्या असंच काहीसं राज्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीच घडलं आहे. शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ एक संकटं येत आहेत. आधी कोरोना मग लॉकडाऊन, त्यानंतर अतिवृष्टी आणि आता बर्ड फ्लूचं संकट शेतकऱ्यांवर आलं आहे...तसं संकट आणि शेतकरी हे समीकरण काही नवीन नाही. मात्र या बळीराजाच्या छाताडावर एका मागून एक संकट रांगेतच उभे असतील तर त्याने तरी कुठपर्यंत सहन करावं.. आधीच अतिवृष्टीने कंबर मोडलेल्या शेतकऱ्याला आता बर्ड फ्लूचाही सामना करावा लागतोय...कोंबड्या आणि त्यांची अंडी विकून ग्रामीण भागातील अनेकांचे कुटुंब चालते. मात्र राज्यातील अनेक भागात बर्ड फ्लूमुळे पक्षी आणि कोंबड्या मरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मराठवाड्यातील परभणी आणि बीडमध्ये सुद्धा मृत्यू पडलेले पक्षी पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे शेकडो कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत.
शेतकऱ्यांचे बजेट बिघडले
इतर शेतकऱ्यांप्रमाणेच औरंगाबाद जिल्ह्याच्या अमरापूर वाघुंडी येथील भाऊसाहेब शिंदे यांनाही बर्ड फ्लूसारख्या अज्ञात रोगाचा फटका बसला आहे. पावणे तीन एकर शेतात लावलेल्या पीकातून होणारे उत्पन्न दरवर्षी अपेक्षाभंग करणारे असल्याने शिंदे यांनी 2014 मध्ये पर्यायी व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी सुरुवातीला एक लाख रुपये खर्च करून शेड बांधले. उरलेल्या पैशातून 15 कोंबड्या घेतल्या. पुढे त्यांना यात चांगलं उत्पन्न येत राहिले.
बर्ड फ्लूनंतर अज्ञात रोगाचा फटका?
शिंदे यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय व्यवस्थित सुरू असतानाच अचानक बर्ड फ्लूची अफवा सुरू झाली... अफवा म्हणता म्हणता महाराष्ट्रात प्रत्यक्षात बर्ड फ्लूवर शिक्कामोर्तब झालं... एकीकडे हे सर्व सुरू असताना 5 जानेवारीला शिंदे शेतात गेले असताना त्यांना 5 कोंबड्या मरून पडल्याचं दिसून आलं... त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 तारखेला पुन्हा 100 पेक्षा अधिक कोंबड्यांचा एका मागोमाग एक मृत्यू झाला.
मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न
कोरोना काळात शिक्षणाचा बट्याबोळ झाल्याने बीएससीचे शिक्षण घेत असलेल्या भाऊसाहेब शिंदे यांचा मुलगा गणेशनेसुद्धा वडिलांना हातभार म्हणून कुक्कुटपालनात लक्ष घातले होते. नोकरी नाही मिळाली तरीही पर्याय म्हणून कुक्कुटपालन तरी करू असे त्याला वाटले होते. मात्र अचानक आलेल्या संकटाने तोही खचला आहे. तर शिंदे यांच्या शेतातील 100 पेक्षा जास्त कोंबड्या मेल्याची माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागं झालं, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली.. तसेच कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी प्रयोगशाळेत नमुने सुद्धा पाठवले. अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेल्या शेतीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन हा पर्यायी व्यवसाय आशादायक ठरत होता. लॉकडाऊनच्या संकटातून उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यावसायिकांना बर्ड फ्लूच्या संकटाने आणखीच मोठ्या संकटात ढकलले आहे.