३० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर शेतकऱ्याला मिळाला न्याय

Update: 2021-09-16 08:41 GMT

सोलापूर :  साधारणपणे आपल्याकडे सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हण आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचं सरकारी काम 6 महिन्यात नाही तर तब्बल 30 वर्षानंतर झालं आहे.

३० वर्षांपूर्वी रामहिगणी तालुका मोहोळ येथील शेतकरी पांडुरंग चौगुले यांची जमीन कॅनॉलसाठी आरक्षित करण्यात आली होती. मात्र, गेल्या ३० वर्षांपासून शासन दरबारी हेलपाटे मारूनही त्यांची दखल घेतली जात नव्हती. १५ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर शासनाने त्यांची दखल घेऊन दि. २ सप्टेंबर रोजी त्यांना १२ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी शेतकऱ्याने जमिनीचा मोबदला मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

याबाबत माहिती अशी की रामहिंगणी तालुका मोहोळ येथील पांडुरंग चौगुले यांची जमीन कॅनालसाठी संपादित करण्यात आली होती. त्यांच्या गटातील गट नं २२ व इतर सर्वांना कॅनॉल मध्ये जमीन गेल्याचे व मोबदला देण्याचे पत्र आले. मात्र, फक्त पांडुरंग चौगुले यांना तुमची जमीन कॅनॉल मध्ये गेली आहे. एवढीच नोटीस देण्यात आली. मोबदला गटातील सर्वांना दिला. पण पांडुरंग चौगुले यांना दिला नाही. मोबदला मिळावा यासाठी ते गेल्या ३० वर्षांपासून शासन दरबारी हेलपाटे मारत होते.

गावातील व जिल्ह्यातील सर्व पुढारी नेते खासदार, आमदार यांनी त्यांना लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, कोणीही त्यांना न्याय मिळवून दिला नाही. त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी देखील त्यांची जमीन गेल्याचे पाहून त्यांना मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी देखील लेखी दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे त्यांनी गतवर्षी २ ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे उपोषण केले होते. त्यावेळी देखील त्यांना दोन महिन्यात आपल्याला लाभ दिला जाईल. असे लेखी आश्वासन देऊन देखील त्यांना लाभ मिळाला नव्हता.

त्यामुळे त्यांनी अत्यंत निराश होत. आत्मदहनाचा इशारा दिला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आता माझे वय झाले आहे. मला त्याचा लाभ मिळाला नाही. माझ्या मुलाला त्याचा लाभ मिळाला नाही. आता माझ्या नातवाला तरी त्याचा फायदा होईल. यासाठी प्रशासनाला जाग यावी यासाठी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती निवेदनाद्वारे त्यांनी माध्यम प्रतिनिधीला दिली होती. दि १५ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांनी स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल प्रशासनाने घेऊन तात्काळ संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार दि.२ सप्टेंबर २०२१ रोजी त्यांना प्रशासनाने १२ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश सुपुर्त केला आहे. शेतकरी पाडूरंग चौगुले यांना गट नं २२/१ चे भूसंपादन झाल्याच्या मोबदल्याचा धनादेश कार्यकारी अभियंता सोलापूर यांनी दिला आहे. सोलापूर येथील उजनी कालवा विभाग क्र. ८ यांच्याकडून खाजगी वाटाघाटीने खरेदी करुन घेतली आहे.

अन्यायग्रस्त शेतकरी भारत पांडुरंग चौगुले व त्यांचे वडील पांडूरंग चौगुले राहणार रामहिंगणी यांना तहसिलदार राजशेखर लिंबारे व मोहोळ पोलीस निरीक्षक अशोक सायकर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश वाडकर ,सहाय्यक अभियंता एफ.आर मुजावर, कनिष्ठ अभियंता पी.टी. कांबळे, गणेश गायकवाड,यां नी आज १२ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश सुर्पद केला.

यावेळी शेतकरी भारत चौगुले यांनी बोलताना सांगितले की,१९९० ते १९९२ च्या दरम्यान आमची जमीन उजनी कॅनॉल साठी संपादित करण्यात आली होती. परंतु त्याचा मोबदला अद्यापपर्यंत मिळाला नव्हता. त्याचा मोबदला दि.२ सप्टेंबर रोजी १२ लाख ७० हजार रुपये मिळाला आहे. रेल्वेच्या दुहेरीकरणात ही जमीन गेली आहे. परंतु अद्याप पर्यंत त्याचा मोबदला मिळाला नव्हता.

रामहिंगणी गावचे माजी सरपंच मधुकर पाटील यांनी बातचीत करताना सांगितले की, आमच्या गावातील शेतकरी पांडुरंग चौगुले यांची १९८८-१९९० साली उजनी कॅनॉल मध्ये २० गुंठे जमीन गेली होती. गावातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला होता. परंतु पांडुरंग चौगुले यांचे क्षेत्र नकाशात दर्शवत नसल्यामुळे त्यांना कसलाही पत्रव्यवहार झाला नव्हता. प्रशासनाच्या चुकीमुळे त्यांना कसलाही मोबदला मिळाला नव्हता.

त्यांनी व त्यांच्या मुलांनी सतत पाठपुरावा केला. पण त्यांना कोणत्याही अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. २००४ साली रेल्वेच्या दुहेरीकरणात ही त्यांची ४ गुंठे जमीन गेली आहे. त्याचाही पत्रव्यवहार या शेतकऱ्यांबरोबर झाला नाही. त्यांचा गट क्र.२२ असल्याचे कागदपत्रांवरून माझ्या लक्षात आले. त्यावेळी मी उतारा,गट क्र. फेरफार तपासला. यावेळी या शेतकऱ्यावर अन्याय झाला असल्याचे माझ्या लक्षात आले.

त्यावेळी तत्कालीन भूसंपादन अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना सत्य परिस्थिती विषद केली. भूसंपादन अधिकारी यांना नकाशा दाखवला. परंतु त्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे २ आक्टोंबर २०२० रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले.

यावेळी सोलापूर येथील सदर बझार पोलीस चौकीचे पी.आय साळुंखे यांनी दखल घेऊन संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांना शेतकऱ्याची बाजू खरी असल्याचे सांगितले. त्यावेळी शेतकऱ्यांला संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांनी बोलावून घेतले. यावेळी कृष्णा खोरे विभागाचे साळुंखे ,कांबळे,मु जावर हे अधिकारी उपस्थित होते.

त्यावेळी कृष्णा खोऱ्याच्या अधिकाऱ्यांनी गट क्र. पाहून २००८ प्रमाणे त्यांचा गट क्र. या क्षेत्रात दाखवत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला लाभ देता येतो असे सांगितले. त्यावेळी त्यांनी २० गुंठ्याचा मोबदला २ महिन्यात देतो असे सांगितले. त्यावेळी आम्ही आमचे उपोषण स्थगित केली. परंतु २ महिन्यानंतर ही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यानंतर त्यांच्या मुलाने भूसंपादन कार्यालयात तब्बल १० महिने चकरा मारूनही उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती.

अखेर पांडुरंग चौगुले यांनी वैतागून १५ ऑगस्ट २०२१ रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यावेळी मोहोळ चे पोलीस निरीक्षक अशोक सायकर व तहसिलदार राजशेखर लिंबारे यांनी बोलवून ८ दिवसात तोडगा काढू असे सांगून उचित कारवाई करीत शेतकऱ्याला १२ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करून शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला आहे.

Full View
Tags:    

Similar News