Wonder Car : भंगारातून कार बनवणारा रँचो !जिद्द आणि कल्पकता असेल तर माणूस अशक्य गोष्टही साध्य करू शकतो, हे अनेकांनी सिद्ध केले आहे. असाच एक अवलिया आहे नागपूरमध्ये, त्याने चक्क भंगारातून कार तयार केली आहे. नागपुरमधील स्वप्नील काशीनाथ चोपकर या तरुणाने वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी भंगारातील सामानातून स्वतःची कार तयार केली आहे. विशेष म्हणजे ही कार साधीसुधी नसून चक्क फॉर्म्युला वन रेसमध्ये धावणारी स्पोर्ट्स कार तयार करण्याची किमया त्याने करुन दाखवली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून स्वप्नील कार तयार करण्याचा प्रयत्न करत होताय. अनेकवेळा त्याला अपयशाचा सामना करावा लागला. मात्र न डगमगता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अखेर स्वप्नीलने फॉर्म्युला वन रेसिंग कार तयार करून दाखवली आहे. 26 जानेवारीला त्याने ही कार रस्त्यावर उतरवली तेव्हापासून त्याचा आविष्कार बघण्यासाठी परिसरातील लोकं गर्दी करू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी स्वप्नीलने स्वतःच्या कमाईने एक कार विकत घेण्याचा स्वप्न बघितलेले होत. आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होऊ शकले नाही म्हणून स्वप्नीलने स्वतःची कार तयार करण्याची तयारी सुरू केली. त्याने भंगारातून कार आणि टू व्हिलरटे पार्टस विकत आणून चक्क फॉर्म्युला वन रेसिंग कारच तयार करून दाखवली आहे.
स्वप्नील हा ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करत असताना त्याला स्वतःची कार तयार करण्याची कल्पना सुचली. नोकरी करताना जमवलेल्या पैशातून त्याने भंगाराच्या दुकानातून कारचं इंजिन, शॉकअप, चाकं, सायलेन्सर अनेक वस्तू गोळा करण्यात सुरुवात केली. कार तयार करण्याचा कोणताही अनुभव नसल्याने स्वप्नील अनेकवेळा चुकला. मात्र काही अनुभव लोकांच्या मार्गदर्शनानंतर त्याने अखेर कार तयार करून दाखवली आहे. फॉर्म्युला वन रेसिंग कार तयार करण्यासाठी स्वप्नीलला एक ते सव्वा लाख रुपये खर्च आला आहे. गाडीचा मायलेत १९ किलोमीटर आहे. या फॉर्म्युला वन रेसिंग कार मध्ये 800 सीसीचे इंजिन बसवण्यात आले आहे. सध्या ही कार 140 किलोमीटर प्रतितास धावू शकते असा दावा त्याने केला आहे. भविष्यात यामध्ये आणखी संशोधन करून स्पीड आणि मायलेज वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले आहे.