Ground Report : रस्ता नसलेले गाव, गावकऱ्यांचा जीवघेणा जलप्रवास
रस्ता नसलेली अनेक गावं राज्यात असतील...पण बीड जिल्ह्यातील एका वस्तीवरील लोकांना रस्ता नसल्याने चक्क नदीमधून जीवघेणा जलप्रवास करावा लागतो आहे. आमचे प्रतिनिधी हरीदास तावरे यांचा विशेष रिपोर्ट....;
आतापर्यंत आपण रस्ता नसल्याने, खड्डेयुक्त, पांदण, डोंगराळ भागात नागरिक करत असलेला जीवघेणा प्रवास पाहिला असेल ! मात्र गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, नागरिकांना चक्क जीवघेणा जलप्रवास करावा लागतोय..हा जल प्रवास नक्षलग्रस्त, आदिवासी किंवा कोकणपट्ट्यातील नसून ही कहाणी आहे मराठवाड्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या बीडच्या शिंदेवस्तीची.... स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही या शिंदेवस्तीकरांचा रस्त्यासाठीचा संघर्ष कायम आहे.
बीडच्या पाटोदा तालुक्यातील शिंदेवस्ती.... या शिंदेवस्तीवर 40 ते 50 घरं असून 230 लोकसंख्या व 130 मतदार वास्तव्या करतात. या वस्तीवरील ग्रामस्थ अत्यंत वेदनादायक परिस्थितीला सामोरे जात आहेत. गेल्या 21 वर्षांपासून वस्तीवर जाण्यासाठी नदीवर पूल नसल्याने, वर्षातून आठ महिने या गावकऱ्यांना, धोकादायक जीवघेणा जलप्रवास करावा लागतो. या लोकांना चप्पूवर बसून जलप्रवास करावा लागतोय. ही जल प्रवासाची अत्यंत धोकादायक परिस्थिती शिंदेवस्ती येथील, लहानमुलांसह वृद्धांना आणि महिला भगिनींवर आली आहे. हा प्रवास करताना अनेक वेळा यात बुडून मरण्याचा धोका असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात शाळा, हॉस्पिटल नसल्याने, ग्रामस्थांना याचं चप्पूवर बसून, तिथं जावं लागते..विशेष म्हणजे येथील तरुणांना मुली देण्यास टाळाटाळ केली जात असून रस्ता नसल्याने लग्न होत नसल्याची खंत इथले लोक व्यक्त करतात. .या भागातील लोकप्रतिनिधींचे या लोकांच्या त्रासाकडे दुर्लक्ष होत आहे.
याविषयी अश्विनी शिंदे सांगतात , की याच चप्पूवरून आम्हाला रोज येणं-जाणं करावं लागतं. आम्ही आमच्या लेकरांना इंग्लिश मिडीयमला शिकवू शकत नाहीत. इथंच प्राथमिक शाळा आहे तिथं पाठवतो. कारण घरची माणसे कामाला गेली तर सोडणार कोण ? असा प्रश्न असतो. लोकप्रतिनिधी निवडणूक आली की येतात आणि ताई आम्हाला मतदान करा, आम्ही रस्ता देऊ म्हणतात. मात्र पुन्हा येत नाहीत. केवळ आम्हाला रस्ता द्यावा हीच आमची मागणी आहे....
रस्ता नसल्यामुळं चिमुकली जान्हवी म्हणते की माझी खूप इच्छा आहे इंग्लिश स्कुलला जायची. मात्र माझे पप्पा हॉटेलवर कामाला जातात. त्यामुळं मला सोडवायला कुणीच नसतं. त्यामुळं आम्ही घरीच राहतो.
"गेल्या अनेक वर्षांपासून आमचा हा प्रवास सुरु आहे. या अगोदर आम्ही ट्यूबच्या माध्यमातून जात होतो. त्यानंतर थर्माकॉलवर आणि आता या चप्पूवरून जात आहोत. 2010 साली माझ्या बायकोला विषबाधा झाली होती. तिला हॉस्पिटला घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्यानं आम्हाला खूप वेळ लागला. कसंतरी करून हॉस्पिलला गेलो. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. जर रस्ता असता तर वेळेत हॉस्पिटलला गेलो असतो आणि माझी पत्नी वाचली असती. किमान आता तरी आम्हाला रस्ता करून घ्यावा ज्यामुळे करून इतर कुणाचे जीव जाणार नाहीत, असे इथले ग्रामस्थ बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.
तर येथीलच शिवाजी शिंदे सांगतात ती जनावरे सांभाळण्याचे काम करणारे त्यांचे भाऊ अचानक पाण्यात पडले. मात्र ते वृध्द असल्याने त्यांना काहीच करता आलं नाही. आरडाओरडा केल्यामुळं शेजारच्या शेतातील मुलं पळत आले आणि त्यांना काढलं म्हणून त्यांचा जीव वाचला.
हा रस्ता करून देऊन असे गेल्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब अजबे म्हणाले होते. "मला सहकार्य करा, मी निवडून आलो की तुमचे सर्व प्रश्न सोडवीन. मात्र ते निवडून आल्यानंतर एकदाही आले नाही. त्याचबरोबर आमदार सुरेश धस देखील 15 वर्ष आमदार होते. त्यांनी देखील काहीच केलं नाही. आमची एकच मागणी आहे की आम्हाला चालण्यापुरता रस्ता करून द्यावा. अन्यथा येणाऱ्या 15 तारखेला स्वातंत्र्यदिनी आमचा त्रास आंदोलनातून दाखवू. अशा इशारा भागवत शिंदे या संतप्त झालेल्या ग्रामस्थानी दिलाय.
आता लोकप्रतिनिधी याची दखल गेऊन प्रत्यक्ष रस्ता करुन देणार की फक्त पाहणी करुन आणखी एक आश्वासन देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.