Ground Report : राजकारण्यांच्या आश्वासनांचे काय होते याची साक्ष देणारे गाव !

निवडणुकांमध्ये नेते आश्वासनं देतात आणि त्यावर विश्वास ठेवून मतदार मतदान करतात...पण या नेत्यांच्या आश्वासनांचे पुढे काय होते, याची साक्ष देणाऱ्या एका गावाची कहाणी, पाहा हिरदास तावरे यांचा रिपोर्ट....

Update: 2021-09-25 14:07 GMT

"आमदार संदीप क्षीरसागर यांना माझे निमंत्रण आहे, त्यांनी या रस्त्याने यावे आणि माझ्या घरी चहा घ्यावा" असे निमंत्रण कांतीलाल गहिनीनाथ कोळेकर या शेतकऱ्याने दिले आहे. आता तुम्हाला वाटेल याच आश्चर्य ते काय.....कोणत्याही सामान्य व्यक्तीला आपल्या घरी आमदार, खासदाराने यावे असे वाटते. त्यामुळे या शेतकऱ्याच्या मागणीत वेगळे काय आहे, पण या शेतकऱ्याच्या मागणीचे वेगळेपण असे की त्यांच्या गावाला पक्का रस्ताच नाहीये. पावसाळ्यात तर त्यांच्या गावाला जाणार रस्ता चिखलात गेलेला असतो. ही कहाणी आहे बीड जिल्ह्यातील बहादरपूर या गावाची....नेत्यांचे राजकारण, स्थानिक राजकारण यामुळे एखाद्या गावाला कसा फटका बसतो याचे उहादरण येथे दिसते.

निवडणुकीच्या वेळी या गावातील गावकऱ्यांना बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी रस्ता करुन देऊ असे आश्वासन दिले होते. पण निवडणूक होऊन आता दोन वर्ष उलटून गेली आहे, पण आमदार साहेबांना या गावाचा विसर पडला आहे का, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. बीड जिल्ह्यातील बहादरपूर या गावाला गेल्या ५० वर्षांपासून रस्ता नाहीये. या गावाला रस्ता नसल्याने अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी होणारा त्रास असो, किंवा या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा प्रश्न असो....पावसाळ्यात तर हे सर्व बंद होते. त्याचबरोबर मुली, महिला, दुचाकीस्वार, चारचाकी वाहनधारकांना या रस्त्यावरुन जातांना मोठी कसरत करत बहादरपूर ते साक्षाळ पिंपरी या मुख्य रस्त्यापर्यंत येण्यास मोठे दिव्य पार पाडावे लागते.  



 


या गावात राहणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक विशाल कोळेकर सांगतात की, "देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमच्या गावाला बीडला जाण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता आहे. रस्ता बहाद्दरपुर ते मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या साक्षाळ पिंपरी फाटा असा आहे. पण पावसाळ्यात चार महिने बैलगाडी सुद्धा जाऊ शकत नाही, अशी या रस्त्याची अवस्था असते. यामध्ये मोटर सायकल, कार तर येतच नाही. अँम्ब्युलन्स जर आणायची म्हटलं तर साक्षाळपिंपरी रोडवर ती उभी करून पेशंटला आम्हाला खांद्यावर उचलून आणावा लागते. अनेक लोक गाडीवरून घसरले आणि पायाला-हाताला दुखापत झाली. एवडेच नाही तर आम्ही अनेक आमदार- खासदार आणि खासदारांना या रस्त्यानं आणले. त्यांना हा रस्ता दाखवला. दरवर्षी आम्ही त्यांवा रस्ता दाखवतो पणरू नुसते आश्वासन देतात," माहिती त्यांनी दिली. "आमच्या वडिलांचे वय गेले आम्ही आता वयात आहोत. पण हे नेते नुसतं करू सांगतात, करत नाहीत. आमदार खासदार येतात प्रत्येक निवडणुकीला येतात, पंचायत समिती, जिल्हापरिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आम्हाला बहुमत द्या, आम्ही निवडुन आल्यावर दुसऱ्या दिवशी बजेट टाकतो. त्याप्रमाणे आम्ही बहुमतही दिले, पण याकडे कोणी लक्ष देत नाहीत." अशी तक्रार त्यांनी केली आहे. पावसाळ्यात कॉलेजला जाणाऱ्या मुलांना शाळेत जाताच येत नाही. वयस्कर माणसं, आजारी माणसं या रस्त्यानं येऊ शकत नाही" असे त्यांनी सांगितले.

आणखी एक गावकरी शिवराम शिरगिरे सांगतात की, "आमच्या गावातील लोक भाजीपाला पिकवतात पण तो भाजीपाला मंडईला घेऊन जाता येत नाही. या रस्त्यामुळे भाजीपाला जरी तोडला तरी या चिखलामुळे दोन तास उशिर होतो. त्यामुळे मंडईची वेळ चुकते. मग भाजीपाला घरी ठेवावा लागतो. त्यामुळे नुकसान होते. या चिखलमय रस्त्यामुळे आमचे दळणवळण बंद झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

"स्वातंत्र्याच्या काळापासून हा रस्ता झालेला नाही, आम्ही ग्रामस्थ वारंवार रस्त्याच्या तक्रारी करूनही हा रस्ता होत नाही. तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले, पण उपयोग झाला नाही. लोकप्रतिनिधींना निवेदन देऊ आमचा रस्ता झाला नाही. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आम्हाला असं सांगतात मतदान द्या, मतदान देतो. परंतु आम्हाला फक्त कोरडी आश्वासनं देतात आतापर्यंत आमचा रस्ता झाला नाही. आमच्या आया बहिणीचं डिलेव्हरीचं पेशेंट न्यायचं म्हटलं किंवा कुणी आजारी पेशेंट न्यायचं म्हणलं तर एवढी भयानक परिस्थिती आहे की पेशंट आम्हाला खांद्यावर घेऊन जावा लागतो. एवढी भयानक परिस्थिती आमच्या बहाद्दरपुरच्या ग्रामस्थांची आहे. कोणत्याही प्रशासनानं किंवा लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतली नाही." असे कांतीलाल कोळेकर सांगतात. 



 


कोळेकर सांगतता की, काही दिवसांपूर्वी त्यांनी उपोषण देखील केले होते. पण आमदार संदीप क्षीरसागर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही लोक पाठवले पाहणीला आणि आंदोलन थांबवावे लागले. थोड्याच दिवसात या रस्त्याचा निधी देऊ व रस्त्याचे काम सुरू करू, असे आश्वासन दिले होते. पण दोन महिने झाले तरी अजून रस्त्याचे काम झालेले नाही. आमच्या गावाने आमदार संदीप क्षीरसागर यांना भरभरून मतदान दिलं आहे. आमची ग्रामपंचायतही त्यांच्या ताब्यात आहे. त्यांना वारंवार तक्रार करूनही दखल घेतली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात या भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनीअर संजय शिंदे यांना आम्ही संपर्क केला त्यावेळी सांगितले की, साक्षाळपिंप्री, बहाद्दरपुर ते सिरसमार्ग या रस्त्याची गेली अनेक दिवसांपासून नागरिक मागणी करत आहेत. या रस्त्याची एकुण लांबी 3 किमी असुन सध्या हा रस्ता कच्चा आहे. येत्या अधिवेशनात या रस्त्यासाठी निधी आम्ही प्रस्तावीत करू व रस्ता मंजुर करून घेऊ , असे आश्वासन त्यांनी दिले.

या गावचे सरपंच निलेश वाघमोडे यांना आम्ही संपर्क साधला आणि रस्त्यासाठी काय प्रयत्न केले अशी विचारणा केली, तेव्हा त्यांनी या विषयावर आपण प्रतिक्रिया देणार नाही, असे सांगितले. तर आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी यासंदर्भात आमदार संदीप क्षीरसागर यांना संपर्क साधला, पण संदीप क्षीरसागर लहे मुंबईत असल्याचे त्यांच्या पीएने सांगितले. त्यानंतर क्षीरसागर यांना फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही. यासंदर्भात संदीप क्षीरसागर जेव्हा प्रतिक्रिया देतील, ती या बातमीमध्ये अपडेट केली जाईल.

Tags:    

Similar News