Ground Report : ढोबळी पिकवणाऱ्या गावाला दर घसरणीचा फटका

शेतीमध्ये प्रयोग करुन शेतकरी आदर्श निर्माण करतात. पण सरकारी धोरणाच्या अभावामुळे हे प्रयोगशील शेतकरी कसे अडचणीत येतात, हे दाखवणारा आमचे प्रतिनिधी हरीदास तावरे यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;

Update: 2021-08-22 01:30 GMT

दुष्काळी बीड जिल्ह्यात सततच्या नापिकीमुळे आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आपण पाहिल्या असतील. मात्र दुष्काळी बीड जिल्ह्यातील असं एक गाव आहे ज्या गावाने प्रयोगशील शेतीमधून परिवर्तन घडवले आहे. गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत, आधुनिक शेतीची कास धरली आहे. ही आधुनिक शेती करत असतांना या गावाला चक्क 'ढोबळी पिकवणारं गाव' म्हणूनचं ओळख मिळाली आहे.



बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील दासखेड गावात पारंपरिक शेती केली जात होती. पण या गावातील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब बाजीराव रसाळ यांनी सर्वप्रथम प्रयोग केला. त्यांच्याकडे साडेपाच एकर शेती आहे. त्यापैकी दोन महिन्यांपूर्वी 2 एकरात ढोबळी मिर्चीची लागवड केली. त्यांना आतापर्यंत 1 लाख रुपये उत्पादन खर्च आला आहे. त्यांच्या मेहनीतीला आलेले फळ देखील शेतात एक नजर फिरवली दिसते. पण आता या मिरचीचे भाव अचानक कोसळल्याने ते चिंतेत आहेत. शेतातील झाडाला आलेली मिरची त्यांनी तशीच ठेवली आहे. पण मिरची किती दिवस झाडावर ठेवणार....भाव मिळाला नाही तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असेही ते सांगतात.


अशोक आरगडे हे शेतकी सांगतात की, गेल्या 4 वर्षांपासून आपण आधुनिक शेतीची कास धरली होती. त्यावेळी केवळ 2-4 शेतकरीच असे ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत होते. मात्र त्यानंतर आम्ही इतर शेतकऱ्यांना प्रवृत्त करून आधुनिक शेती करण्यास भाग पाडलं. त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. याचा फायदा म्हणजे यंदा जवळपास 40 ते 50 शेतकऱ्यांनी आधुनिक शेती केली असून गावात जवळपास 70 एकरवर या ढोबळ्या मिरचीची लागवड केलेली आहे. ही ढोबळी आम्ही मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर, संगमनेर, लातूर या भागात पाठवतो. त्याचबरोबर अनेक व्यापारी गावात येऊन देखील ढोबळी मिर्ची घेऊन जातात, असेही त्यांनी सांगितले.


दरम्यान दुष्काळी बीड जिल्ह्यात आता शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरत आहेत. यामुळं त्यांचा उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. कोरोना काळातही मेहनत आणि जिद्दीच्या बळावर आधुनिक शेती करुन शेतकऱ्यांनी आदर्श घडवला. पण आता अचानक भाव कोसळल्याने हे गावंच संकटात सापडले आहे. सरकारने या शेतकऱ्यांना आणि अशाच इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. 

Tags:    

Similar News