५०० रुपये कर्जामुळे शेतमजुराची आत्महत्या, वेठबिगारी कधी संपणार?

नुकताच देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा झाला...पण याच दिवशी आदिवासी समाज आजही वेठबिगारीच्या जोखडातून मुक्त झाला नसल्याचे सिद्ध करणारी घटना समोर आली. या घटनेने महाराष्ट्राच्या प्रगत राज्य असल्याच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. आमचे प्रतिनिधी रवींद्र साळवे यांचा स्पेशल रिपोर्ट....;

Update: 2021-08-27 11:36 GMT

पालघर जिल्ह्यातील मोखाडा मध्ये ५०० रूपयांच्या कर्जावरून होणाऱ्या वेठबिगारीच्या जाचाला कंटाळून काळु पवार या आदिवासी कातकरी मजुराने आत्महत्या केली होती. याप्रकरणी आरोपी रामदास कोरडे याला मोखाडा पोलीसांनी अटक केली आहे. पालघर जिल्ह्यामधील मोखाडा तालुक्यातील आसे गावात राहणारे काळु पवार या आदिवासी कातकरी मजुराने आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी गावातीलच रामदास कोरडे यांच्याकडू ५०० रूपये उसने घेतले होते. त्या ५०० रूपयांच्या मोबदल्यात रामदासने काळुला वेठबिगारासारखी वागणूक देत त्याचा छळ केल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून काळू पवार यांनी गळफास घेत आत्महत्या केली अशी तक्रार त्यांच्या कुटुंबाने दिली आहे. याबाबतीत काळु यांच्या पत्नी सावित्री पवार यांनी त्याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


 मोखाडा पोलीसांनी आरोपी रामदास कोरडे याच्यावर वेठबिगार पध्दत निर्मुलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. परंतू रामदास कोरडे हा आपल्या कुटूबांसह फरार झाला होता. मोखाडा पोलीसांची दोन पथके रामदासचा शोध घेत होती. रविवारी ( २२ ऑगस्ट) ला रामदास कोरडे याला अटक करण्यात मोखाडा पोलीसांना यश आले आहे. यानंतर आरोपी रासदासला सोमवारी (२३ ऑगस्ट) जव्हारच्या प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते. जव्हार न्यायालयाने रामदासला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कारवाई झाल्याचे वरकरणी दिसत असले तरी अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.


काळू पवार यांच्या मुलाच्या मृत्यूचे गूढ कायम

एवढ्यावर ही कारवाई न थांबता या प्रकरणाच्या तळाशी जाऊन तपास होण्याची गरज आहे, असे या प्रकरणावरुन दिसते. वेठबिगारीतून झालेल्या छळाला कंटाळून काळू पवार यांनी आत्महत्या केली, इथपर्यंत हे प्रकरण नाही. तर गेल्यावर्षी काळू पवार यांच्या लहान मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह पाण्यात आढळला होता. त्याच्याच अंत्यसंस्कारासाठी काळू पवारने ५०० रुपये उसने घेतले होते. पण या मुलाचा मृत्यू हा अपघात होता की घातपात होता, याबाबतचा कोणताही तपासच झाला नसल्याचे उघड झाले आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आत्महत्या केलेल्या काळू पवार यांच्या कुटुंबियांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी या मुलाच्या मृत्यूचे तपास लॉजिकल एंडपर्यंत का गेला नाही, असा सवाल त्यांनी तिथे उपस्थित असलेले डीवायएसपी आणि प्रांत अधिकाऱ्यांना विचारला. या अधिकाऱ्यांकडे याचे कोणतेही उत्तर नव्हते.



 


वेठबिगारी नसल्याचा पोलिसांचा दावा

पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नसल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी दिनांक २४ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. यावेळी त्यांनी बाळू पवार यांनी आत्महत्या केली त्या दिवशी (१३ जुलै) खूप पाऊस सुरू असल्याने त्यांच्या गावातच दफनविधी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली.शिवाय काळू पवार याला नेहमी दारू पिण्याची सवय होती आणि २ ऑगस्ट रोजी या आत्महत्या विषयी मोखाडा पोलिसांना प्रथम माहिती प्राप्त झाली असता मृताच्या पत्नीने कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त केला नसल्याचे पोलीस अधीक्षक यांनी म्हटले आहे.

परंतु, मृत काळू पवार याची पत्नी सावित्री पवार हिने आपल्या जबाबात सांगितले आहे की, २०२० च्या दिवाळी सणाच्या ५ दिवस अगोदर त्यांचा सर्वात छोटा मुलगा दत्तू (१२) याचा मृतदेह एका खोल दरीत आढळला होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे त्यांना काहीच कळले नाही. परंतु, दत्तूच्या अंत्यसंस्कारासाठीही पवार कुटुंबियांकडे पैसे नव्हते. शेवटी गावातील रामदास कोरडे या मालकाकडून कफन खरेदीसाठी ५०० रुपयाची उसनवारी करावी लागली, त्यावेळी हे पैसे कसे फेडायचे याबाबत विचारले असता, शेतीच्या कामावर येऊन फेडावे लागतील असे मालकाने सांगितल्याचे व त्याप्रमाणे तो गडी म्हणून काम करत होता असे मृत काळूच्या पत्नीने आपल्या तक्रारी दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

"पोलिसांवर दबाव आहे का?"

दरम्यान काळू पवार यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी केलेल्या वक्तव्यावर राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी आक्षेप घेतला आहे. हा प्रकार म्हणजे गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे आहे. असा दावा रण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी ? असा सवाल विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे. तसेच मालक वर्गाने मजुरांना आगावू रक्कम (बायाना) देऊ नये, अन्यथा वेठबिगारी विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल होतील असा इशारा देखील त्यांनी दिला.

गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे वक्तव्य करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी ? असा सवाल विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेता असून, स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय आहे. म्हणून पोलिसांवर दबाव आहे का..?असाही प्रश्न विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे.


आपल्या प्रशासनाने परिस्थिती स्वीकारायला पाहिजे. पोलिसांचा हेतू चांगला आहे. मात्र वेठबिगारी पद्धत नाही असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. ते गुन्ह्याला पाठबळ देण्यासारखे आहे. पोलिसांना कायदा मान्य पाहिजे, त्याची अंमलबजावणी करणे हे पोलिसांचे काम आहे. तसेच,

वेठबिगारी पद्धत नाही असे जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा नाय दंडाधिकाऱ्यांचा आहे, पोलिसांचा नाही. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने तटस्थपणे कायद्याची अंमलबजावणी करणे हे पोलिसांचे आणि जिल्हा प्रशासनाचे काम आहे. व्यवस्था परिवर्तनाच्या बाजूने पोलिसांची भूमिका असायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने याच्या विरोधी परिस्थिती आहे असे म्हणत पंडित यांनी खंत व्यक्त केली.

या पत्रकार परिषदेला मृत काळू पवार यांची पत्नी सावित्री काळू पवार आणि दोन मुली देखील उपस्थित होत्या. यावेळी सावित्री हिने सांगितले की, "रामदास कोरडे याने आम्हाला मुलाच्या कफनासासाठी ५०० रुपये दिले होते. नंतर आम्ही त्याला पैसे परत देत होतो, परंतु त्याने परत घेतले नाही, तू गडी म्हणून कामावर येऊन फेड असे तो म्हणाला. त्यानंतर त्याने एकही रुपया मजुरी दिली नाही. परंतु नंतर गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याने कुणा मध्यास्थाच्या मदतीने मला २० हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला, मात्र मी ते घेतले नाही" असेही त्यांना यावेळी सांगितले.

एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करत असताना, दुसरीकडे वेठबिगारीच्या पाशात अडकलेल्या कातकरी शेतमजूराला, मालकाच्या जाचाला कंटाळून अवघ्या 500 रुपयांसाठी आत्महत्या करावी लागते, ही बाब दुर्दैवी असल्याची टीका खासदार राजेंद्र गावित यांनी केली होती. तसेच पीडित कुटूंबाला 25 हजाराची रोख मदत करून, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. तसेच या कुटूंबाला कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी 2 एकर जागा स्वखर्चाने देण्याची घोषणा त्यांनी केली.

काळू पवार यांच्या कुटुंबाला मदत मिळते आहे, दबावामुळे का होईना पोलिसांनी आरोपीला अटक केली. पण या निमित्ताने आदिवासी भागात सुरू असलेल्या वेठबिगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गरीब आदिवासी शेतमजुरांच्या अज्ञानाचा आणि साधेपणाचा फायदा घेत त्यांची कशी फसवणूक होते आणि त्यांचा कसा छळ होतो हे दाखवणारे हे प्रकरण आहे. काळू पवार याच्या मुलाच्या मृत्यूचे कारण कधीतरी समोर येणार का आणि काळू पवार यांचा छळ करणाऱ्या आरोपीला खरंच शिक्षा होणार का हा प्रश्न कायम आहे. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे वेठबिगारी कधी बंद होणार हा खरा प्रश्न आहे.

Similar News