Ground Report : सरकारी गोंधळ संपेना, वाघाला वाघीण मिळेना !
वाघांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी विविध प्रयत्न केले जातात. पण एका वाघासाठी वाघीणच न मिळाल्याने बुलडाणा जिल्ह्यातील पर्यटन, जंगल संरक्षणासाठी कसा फटका बसला आहे, याचा शोध घेणारा आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांचा ग्राऊंड रिपोर्ट
राज्यासह देशातील वाघांची संख्या वाढवून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी नेते, अभिनेते सर्वच कॅम्पेनिंग करतात, आवाहन करतात. सरकारनेही कायद्याची कडक अंमलबजावणी करत वाघांचे संरक्षण आणखी भक्कम केले आहे. मात्र वाघांची संख्या वाढण्यासाठी सरकार किती सकारात्मक आणि कार्यशील आहे याचे उदाहरण बुलडाणा जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. सरकारी अनास्थेमुळे ज्ञानगंगा अभयारण्यात जवळपास सव्वा वर्ष स्थिरावलेला वाघ आता बेपत्ता झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या टिपेश्वर अभयारण्यातून C -1 नावाचा वाघ गेल्या दोन वर्षापूर्वी शेकडो किलोमीटर चालत वाघिणीच्या शोधात बुलडाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आला होता. हा वाघ वयात आल्याने त्याला सहचारिणीची गरज होती. त्यादृष्टीने वनविभागाने पावले उचलली खरी, मात्र या वाघाला जोडीदार मिळवून देण्यास लोकप्रतिनिधिंची आणि यंत्रणेची अनास्था पाहायला मिळाली. त्यामुळे आता हा वाघ गेल्या सहा महिन्यांपासून ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यातून बेपत्ता झाल आहे, त्याचा वन विभागाकडून शोध सुरू आहे.
*C-1 वाघ कुठून आला?*
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभारण्यातुन पायी प्रवास करून C -1 वाघ डिसेंबर 2019 मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आला होता. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वतर अभयारण्यात T - 1 वन नावाची वाघीण आहे. तिने तीन बछड्यांना जन्म दिला, त्यापैकी C 1 नावाचा वाघ टिपेश्वर अभयारण्य सोडून जवळपास दोनशे ते तीनशे किलोमीटरचा प्रवास करत बुलडाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आला होता. तर C 2 नावाचा वाघ हा पैनगंगा अभयारण्यात आहे. तर तिसरा वाघ C 3 हा टिपेश्वर अभयारण्यमध्येच असल्याची माहिती वन विभागाकडून मिळाली आहे.
वाघाचे आयुष्य जवळपास 15 वर्षांचे असते. तो साधारणपणे 3 वर्षाने वयात येतो. तेव्हा त्याला वाघिणीची गरज भासते आणि त्यामुळे वाघिणीच्या शेधात C 1 या वाघाने मोठा प्रवास केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र या वाघाला ज्ञानगंगा अभयारण्यात वाघीण मिळाली नसल्याने तो गेल्या सहा महिन्यांपासून या अभयारण्यात आढळलेला नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. त्यामुळे तो अंबाबरवा अभयारण्यात गेला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. अंबाबरवा अभयारण्यात आधीपासूनच काही वाघांचे वास्तव्य आहे.
*ज्ञानगंगा अभयारण्यात C-1ने मुक्काम का केला?*
ज्ञानगंगा अभयारण्य 20 हजार हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेले आहे. या अभयारण्यात प्राणी आणि पक्षांसाठी पूरक वातावरण आहे. त्यामुळे या अभयारण्यात विविध प्राण्यांचे वास्तव्य असून त्यामध्ये प्रामुख्याने अस्वल व बिबटे मोठ्या प्रमाणात आहेत.. हे अभयारण्य अस्वलाचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते.
वाघाच्या वास्तव्यासाठी एक स्क्वेअर किलोमीटरमध्ये 19 तृणभक्षी प्राण्यांची गरज असते. तेही अभयारण्यात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे C -1 वाघ देखील अभयारण्यात स्थिरावला होता. तीन वर्षे वयाचा असलेला हा वाघ वयात आल्याने दरम्यानच्या काळात तो मादीच्या शोधात अजिंठा पर्वत रांगेत आणि तिथून पुढे गौताळा अभयारण्यात जाऊन पुन्हा ज्ञानगंगा अभयारण्यात परतला होता. या वाघाला कॉलर आयडी लावण्यात आला होती. मात्र मध्यंतरी त्याची बॅटरी संपल्याने कॉलर आयडी काढण्यात आला होता. जानेवारी 2021 पासून C -1 वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात आढळलेला नाही... तो बेपत्ता असल्याने त्याची शोध मोहीम बुलडाणा वन्यजीव विभागाकडून सुरू आहे. परंतु अद्यापही त्याचा कुठेच पत्ता लागलेला नाही... हा वाघ वयात आलेला असून तो वाघिणीच्या शोधात अकोला, अमरावती जिल्ह्यातील अंबाबारवा अभयारण्य किंवा खानदेशातील यावल अभयारण्याकडे गेला असेल, असा अंदाज बुलडाणा वन्यजीव विभागाकडून व्यक्त केला जातोय...
*वाघासाठी वाघीण आणण्याचा प्रस्ताव का बारगळला?*
या वाघासाठी वाघीण आणल्यास हा वाघ या अभयारण्यात स्थिरावेल आणि पर्यायाने वाघांची उत्पत्ती वाढून जंगलाचे देखील संरक्षण होईल, असे मत व्यक्त करत बुलडाण्यातील वन्यजीव सोयरे ग्रुपच्या माध्यमातून वन्य जीवप्रेमींनी मागणी केली होती. मात्र वाघीण आणण्याच्या प्रक्रियेसाठी संबंधित यंत्रणेने दिरंगाई केल्याचा आरोप वन्यजीव प्रेमी गणेश श्रीवास्तव यांनी केला आहे.
यासंदर्भात आम्ही वन्यजीव विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांना संपर्क साधला तेव्हा, "वाघीण आणण्या संदर्भात एक समिती नेमण्यात आली होती. समितीमार्फ़त सर्व्हेक्षणाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने या समितीतील सदस्यांना येता आले नाही आणि हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पडून असल्याची माहिती त्यांनी दिली आहे...
एकंदरीत या C -1 वाघाला जर सहचारिणी मिळाली असती तर तो या ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला असता. याठिकाणी वाघांची संख्या वाढली असती... आणि परिणामी पर्यटन वाढले असते. तसेच जंगलातील मानवी हस्तक्षेप कमी होऊन जंगलाचे संरक्षण देखील झाले असते... मात्र याला कारणीभूत ठरली ती म्हणजे सरकारी उदासीनता...