संसाराचा थांबलेला गाडा ‘ती’ ने हातगाडा ओढून पुढे नेला
कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर पडली. ती डगमगली नाही. वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत हातागाडा ओढून हमाली केली. हातगाडा ओढुन संसार चालवणाऱ्या पारूबाई डावरे यांची संघर्षगाथा वाचा अशोक कांबळे यांच्या या रिपोर्ट मध्ये..;
भारतीय कुटुंबात पुरुषाला कर्ता मानले जाते. पुरुषच कुटुंबाचा उदनिर्वाह करू शकतो. अशी लोकांची धारणा आहे. या धारणेला छेद देत सोलापुरातील महिलांनी आयुष्याच्या तारुण्यात हमालीचे काम सुरू केले. अर्थातच त्यांच्या सोबतीला त्याचे पती देखील होते. सुरुवातीच्या काळात चार आणे - आठ आणे यावर हमाली करणाऱ्या पार्वती डावरे आणि कोंडाबाई शिंदे यांना सुरुवातीच्या काळात पन्नास ते साठ रुपये मिळत होते. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा आता यांचे वय वाढले आणि घरात कर्ता पुरुष नसल्याने वयाच्या 80 व्या वर्षी देखील त्यांना काबाडकष्ट करावे लागत असून मात्र त्यांना हमालीच्या कामातून जेमतेम दिवसाकाठी 30 रुपये मिळतात. या मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नाही. रद्दीला दिला जाणारा छापड्यांचा पुस्टा व्यापाऱ्यांकडून घेवून रद्दीच्या दुकानात विकतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. वयाच्या 80 व्या वर्षी देखील त्या हातगाड्या ओढून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
सोलापूर शहरातील फलटण गल्लीत वृध्द महिला करतात हमाली.
सोलापूर शहरातील टिळक चौकाच्या आजूबाजूला व्यापारी बाजारपेठ असून या ठिकाणी गेल्या पन्नास वर्षापासून पार्वती डावरे आणि कोंडाबाई शिंदे या हमालीचे काम करीत असून उतार वयात ही त्यांना हमलीचे काम करावे लागत आहे. उन्हा - तान्हात ही त्या गाडा ओढतात. हातगाडीवर ओझे टाकण्यासाठी त्यांना स्थानिक कामगार मदत करतात. या वृध्द महिला ज्या व्यापारी गल्लीत काम करतात तेथे लहानसा रहदारीचा रस्ता असून या वृध्द महिलांना हात गाडा ओढण्यासाठी अडचणी निर्माण होतात. परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजास्तव त्यांना हे कष्ट करावे लागत आहे. या वृध्द महिलांनी कष्ट न केल्यास त्यांच्या कुटुंबाला उपाशी झोपण्याची वेळ येते. दिवसाला मिळणाऱ्या तीस रुपयात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. त्यात वाढत्या महागाईने उचांक गाठला असल्याने त्या चिंताग्रस्त आहेत.
गाडा ओढताना हातपाय थरथरतात
हमालीचा हातगाड्या ओढताना या वृध्द महिलांचा जीव कासावीस होतो. आता तर उन्हाळ्याचे दिवस सुरू असून अंगातून घामाच्या धारा निघतात. अशाही परिस्थितीत या महिला मागे सरकत नाहीत. त्या गाडा ओढण्याचे काम करतात. त्या दमतात ही परंतु परिस्थितीच्या पुढे हतबल असल्याने त्यांना हे काम करावेच लागते.
या वृद्ध महिलांचे वय झाले असून गाडा ओढताना त्याने हातपाय थरथरतात त्यांना दम लागत असून तशाही परिस्थितीत त्या गाडा ओढण्याचे थांबवत नाहीत. हातगाड्यावरील माल ज्या दुकानात उतरवायचा आहे. त्या दुकानाच्या समोर हातगाडा उभा करतात. तेथे कामगारांच्या सहाय्याने माल उतरवतात. त्यातून त्यांना थोडेफार पैसे मिळतात. उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाहीलाही होत असताना या महिलां काबाडकष्ट करताना दिसतात.
इमानदारीने करत आहेत हमाली.
सोलापूरच्या फलटण गल्लीत हमाली करत असताना आयुष्यात लबाडी केली नाही. जे खरे आहे तेच आम्ही सांगतो. कधी चोरी केली नाही किंवा कोणाला फसवले नाही. यातील पार्वती ढावरे या वृध्द महिलेचा पती आणि मुलगा मृत असून नातवा सोबत राहत असल्याचे त्या सांगतात. त्यांचा नातू शिक्षण घेत असून सुट्टीच्या दिवशी पार्वतीच्या मदतीला तो येतो. हमालीच्या उत्पन्नावर त्याचा खर्च सुरू असून कुटुंबाची परिस्थिती नाही सांगितलेलीच बरी अशी व्यथा वृध्द महिला पार्वती ढावरे मांडतात. हमालीचे काम हाताला मिळाले नाहीतर काच - पत्रा गोळा करून तो विकला जातो. त्यातून मिळणाऱ्या पैशावर दिवस भागवला जातो.
पूर्वी चार आण्याला टाकली जायची एक गाठ
पार्वती धावरे या वृद्ध आजी सांगतात की,पूर्वी चार आण्याला एक गाठ टाकत होतो. त्यातून दिवसाला पन्नास ते साठ रुपये मिळत असायचे. आता दिवसाला तीस रुपये मिळत आहेत. वाढत्या महागाईने त्रस्त झालो असून कशातरी उलाढाली करून कुटुंब चालवावे लागत आहेत. दोन नातू असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च कर्ज काढून भागवला जात आहे.