22 गावं सांभाळणारा डॉक्टर...
"डॉक्टरांना स्वतःचं वैयक्तिक आयुष्य नसतं. कोरोनाच्या या महामारीबरोबर लढताना अनेक निर्बंध आले. घरच्यांपासून दूर राहिल्याने थोडं दडपण मनावर आलं, पण आपल्या कामामुळे लोकं बरे होत आहेत. गाव कोरोनामुक्त होतंय हे पाहून काम करायला हुरूप येतो. रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांमुळे कोव्हिडशी सामना करत आयुष्यातील कसोटीचा क्षण यशस्वी झाल्यासारखं वाटतं" असं दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वैभव दळी सांगतात. डॉ. वैभव दळी गेल्या 8 महिन्यांपासून दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत आहेत.;
"डॉक्टरांना स्वतःचं वैयक्तिक आयुष्य नसतं. कोरोनाच्या या महामारीबरोबर लढताना अनेक निर्बंध आले. घरच्यांपासून दूर राहिल्याने थोडं दडपण मनावर आलं, पण आपल्या कामामुळे लोकं बरे होत आहेत. गाव कोरोनामुक्त होतंय हे पाहून काम करायला हुरूप येतो. रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांमुळे कोव्हिडशी सामना करत आयुष्यातील कसोटीचा क्षण यशस्वी झाल्यासारखं वाटतं"
असं दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वैभव दळी सांगतात. डॉ. वैभव दळी गेल्या 8 महिन्यांपासून दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत आहेत. दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या 22 गावांसाठी ते सध्या काम करत आहेत.
पहिल्या कोरोना लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची झळ ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसली. कोरोनाचे संकट आता मोठ्या शहरांपुरते मर्यादीत नसून ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात पसरले आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील राहणीमानाचा टक्का हा 60 टक्क्यांवर आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी हे आशेचे किरण बनले होते. शहराबरोबर ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. या सर्वांचा भार ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पडला. ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याचं पाऊल दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून उचललं गेलं. कोरोनासारख्या महामारीबरोबर आरोग्य व्यवस्था सक्षम नसताना गावातील आरोग्य केंद्राने मात्र हा विश्वास पुन्हा एकदा आपल्या कृतीतुन दाखवून दिला.
एकीकडे टाळेबंदीची सर्वाधिक झळ गावकऱ्यांना बसली असताना कोरोनामुळे हातात आहे ते पण जातंय की काय अशी भीती गावकऱ्यांना वाटू लागली. या सर्वांचा सामना करण्यासाठी ग्रामीण आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा तत्पर झाली. इतरवेळी आजार आल्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये जाणारे लोक पुन्हा ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वळले. ग्रामसेवक, सरपंच विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत असलेल्या कोरोना लसीकरण आणि आरटीपीसीआर तपासणी या सगळ्याची सांगड घालणं आरोग्य केंद्रांना गरजेचं होतं.
दाभोळ आरोग्य केंद्राच्या अखत्यारित एकूण 22 गावं येतात. या सर्व गावांची जबाबदारी दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वैभव दळी यांच्यावर होती. डॉ. वैभव दळी वैद्यकीय अधिकारी पदावर रुजू होण्याआधी दाभोळ गावात एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत होते. दाभोळमधील पहिल्या कोरोना रुग्णाचे उपचार याच हॉस्पिटलमध्ये झाल्याचं वैभव दळी सांगतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आधी काहीच माहीत नसल्याचं ते सांगतात. केंद्र सरकारकडून ज्याप्रकारे गाईडलाईन येत होत्या त्याप्रकारे उपचार सुरु होते. या सर्व महामारीतून बाहेर पडण्यासाठी डॉक्टरांची असलेली गरज ओळखून आपल्या गावाला वाचवण्यासाठी आपली गरज आहे हे ओळखून त्यांनी शासकीय सेवेत रुजू होण्याचं ठरवलं.
राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्याचीं कमतरता असताना डॉ. वैभव दळी याची तक्रार करत बसले नाही. तर ही वेळ रडायची नाही तर लढायची आहे असं म्हणत योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करत ते 22 गावांमध्ये आरोग्य सेवा पुरवत आहेत. दाभोळ गावामध्ये काम करणाऱ्या आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना ट्रेनिंग देऊन त्यांनी या महामारीबरोबर सामना करण्यासाठी सज्ज केले. गावामध्ये प्रत्येक नागरिकांपर्यंत कोरोनाबाबत जनजागृती करणं आणि योग्य ती माहिती कशी पोहोचवायची हा प्रश्न होता, मात्र आशा सेविका, अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन जनजागृती करण्याचं काम केलं. पहिल्या लाटेत कोरोनाबाबत अनभिज्ञत असताना "माझे कुटुंब माझी जबाबदारी" अंतर्गत सर्व लोकांचे टेस्टिंग, ज्यांना लक्षणं आहेत अशांचे विलगीकरण करणं, मुंबईवरून आलेल्या लोकांना विलगीकरणात ठेवून टेस्टिंगवर भर देऊन पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळवल्याचं डॉ वैभव दळी सांगतात.
काय आहे दाभोळ पॅटर्न (Dabhol Pattern)
पहिल्या लाटेपक्षा दुसऱ्या लाटेचा फटका ग्रामीण भागाला बसला होता. एकीकडे ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होत असताना दापोली तालुक्यामधील दाभोळ पॅटर्नची चर्चा होती. दाभोळ आरोग्य केंद्राच्या अखत्यारित एकूण 22 गावं होती. त्यामुळे या सर्व गावांमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवणं कठीण काम होतं. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण चौपटीने वाढले होते. यामुळे ग्रामीण भागांतील गावांमध्ये आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. हे धोके ओळखून डॉ. वैभव दळी यांनी "दाभोळ पॅटर्न " (Dabhol Pattern) राबवत गावातील बाधितांच्या कुटुंबियांची अँटिजेंन चाचणी, संशयित आणि लक्षणे असलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याचं काम हाती घेतलं. कोरोना होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी आपली आणि कुटुंबाची कशी काळजी घ्यावी याची जनजागृती करण्यात आली. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे, अनावश्यक फिरणे कमी करणे, वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आणि आवश्यकता भासल्यास विलगीकरण करणे.
योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करत त्यांनी "दाभोळ पॅटर्न " (Dabhol Pattern) आसपासच्या सर्व गावांमध्ये राबवला. दाभोळ गावामध्ये घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची नोंद घेण्याचं काम आशा वर्कर करत होते. "दाभोळ पॅटर्न " (Dabhol Pattern) अंतर्गत 22 गावांमध्ये लसीकरण सुरु आहे. त्याचबरोबर दाभोळ सागरी पोलिसांचं पथक दिवसातून दोन ते तीन वेळा गावांमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करून अशा नागरिकांचे अँटीजन आणि आरटीपीआर टेस्टिंग करण्यात येत होती. तसंच पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांनाही ग्रामीण जनतेनं सहकार्य केलं. कोरोनाला थोपवण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण आणि टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्यात आलं.
आशा सेविकांच्या मार्फत गावातील प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्यांचे प्रबोधन करणं, त्याचबरोबर लक्षण असलेल्या लोकांना वेगळं करण्याचं काम या उपक्रमातून करण्यात आलं. वाढत्या टेस्टिंगमुळे कोरोनाची लक्षणं असलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांची माहिती मिळण्यास मदत झाली आणि त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करता आले. त्यामुळे कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली. दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या सर्व गावांमध्ये आता लसीकरण सुरु आहे. लस सर्वसामान्यांनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या गावातील गरजू नागरिकांना प्रथम लसी देण्यात आली. जे वयोवृद्ध नागरिक आहेत ज्यांना दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत येता येत नाही अशा नागरिकांसाठी त्यांच्या गावात जाऊन कॅम्प घेऊन लसीकरण करण्यात आले. लसीकरणाची सुनियोजित अंमलबजावणी करत गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहोचवण्याचे काम आता सुरु आहे.
"दाभोळ पॅटर्न "(Dabhol Pattern) राबवत असताना तिथले स्थानिक सरपंच, आशा सेविका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मदत झाल्याचं डॉ. दळी सांगतात. एका गावात एकाचवेळी ५० जणं पॉजिटीव्ह आल्यानं खळबळ उडाली. दापोली तालुक्यातील बोरिवली या गावात तापाची साथ पसरली असे समजताच डॉ. दळी यांनी त्या गावात जाऊन १०० जणांचं टेस्टिंग केले. यामध्ये ५० लोकं पॉझिटीव्ह आले. मात्र डॉ. दळी यांनी घाबरून न जाता धैर्याने आणि हिंमतीने लढा दिला. दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, नर्स, आशा वर्कर, ग्रामपंचायत ग्रामकृतीदल यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर ५० लोकांनी कोरोनाला हरवले.
डॉ. वैभव दळी यांचा एका खासगी हॉस्पिटलमधून सुरु होणारा प्रवास आज दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी असा झाला आहे. अगदी कमी कालावधीत त्यांनी गावासाठी केलेलं काम आणि या महामारीत स्वतःची रक्ताची नाती दुरावली असताना गावातील कोरोना रुग्णांची केलेली सेवा गावकऱ्यांच्या स्मरणात राहील. आपल्या अविरत कामातून आणि सतर्कतेमुळे डॉ. वैभव दळी यांनी आपल्या गावाला कोरोनापासून दूर ठेवत गावाबरोबर महाराष्ट्रासमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे.