Ground Report : जागा दाखवली एक विकली दुसरीच
पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोकणात जमिनीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
निसर्गाने भरभरुन दिलेल्या कोकणात आपली स्वत:च्या मालकीची जमीन असावी असे अनेकांना वाटते. त्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात पण अनेकवेळा जमिनीच्या व्यवहारात अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडत असतात. असाच प्रकार जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्या आणि त्यातून औषध निर्मिती करणाऱ्या डॉ. बिमल दास यांच्याबाबत घडला आहे. विविध जातींच्या वनस्पतींवर वैज्ञानिक आणि तांत्रिक पद्धतीने संशोधन करून औषध निर्मिती करणारे इकोटेक बायोफार्म कंपनीचे मालक बिमल दास यांनी आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.
सुधागड तालुक्यातील वऱ्हाड जांभूळपाडा येथील प्रसिद्ध असणाऱ्या गावंड फार्ममध्ये जमीन खरेदी विक्रीमध्ये दास यांची फार मोठी फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात फसवणूक करणारे नितीन रामचंद्र गावंड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण त्यांना पोलिसांनी अटक का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.
बिमल दास यांचा आता न्यायासाठी लढा सुरू आहे. नितीन रामचंद्र गावंड यांच्याकडून ७३ गुंठे क्षेत्र असलेली सर्व्हे क्रमांक २५/१ ही जमीन विविध जातींच्या वनस्पतींवर संशोधन करण्यासाठी रजिस्टर खरेदी खताने विकत घेण्यात आली होती. परंतू प्रत्यक्षात जमीन मात्र कोणाचीही वहिवाट नसलेली वेगळाच सर्वे क्रमांक असलेली निघाली, असा दास यांचा आरोप आहे.
दरम्यान कोर्टाने संबंधित आरोपीला अटक करण्याचे आदेश देऊनही पोलिसांनी कारवाई केलेली नाही, असा दास यांचा आरोप आहे. यावर पोलिसांनी मात्र सरकारी उत्तर देऊन हात झटकले आहेत. बिमल दास यांनी जमीन खरेदीत व्यावसायिक नितीन गावंड यांनी फसवणूक केली असल्याची तक्रार पाली पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार गावंड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात चार्जशीट देखील न्यायालयात दाखल झालेली आहे. यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी पुढील पोलीस तपास सुरू आहे, असे उत्तर पोलिसांनी दिले.
तर पाली सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सांगितले की सदर जमीन खरेदी विक्री प्रकरण हे खाजगी स्वरूपाचे असून सध्या ते न्यायप्रविष्ट आहे. यामध्ये न्यायालयाकड़ून जे आदेश येतील, तशी महसूल विभागाकड़ून योग्य ती कार्यवाही केली जाईल. पण कोकणात जागांची वाढलेली मागणी पाहता स्थानिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवणूक करण्याचे प्रकार घडले आहेत, त्यामुळे या प्रकरणातही सखोल चौकशीची मागणी होते आहे.