Ground Report : यंत्रणेने अडवली विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट

विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे येत असतात. पण सोलापूर जिल्ह्यातील एका रस्त्याच्या दुरवस्थेबाबत विविध प्रशासकीय यंत्रणांना तो रस्ता कोणाच्या अखत्यारित येतो, याची माहितीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल आहे, अशोक कांबळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...;

Update: 2022-07-23 15:03 GMT

सोलापूर : एकीकडे भारत महासत्ता होईल असा दावा केला जातो. पण दुसरीकडे प्रचंड प्रमाणात गरिबी, दारिद्रय असल्याचे चित्र आहे. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे प्राथमिक सोयी सुविधासाठी नागरिकांची वणवण सुरूच आहे. रस्ते,पाणी, गटारी, वीज या मुलभूत सुविधा देखील सगळ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यात घडला आहे.

विद्यार्थ्यांचा मार्ग चिखलातून

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ ते यावली या रस्त्याबाबतही असाच प्रकार घडला आहे. ह्या रस्त्याचे काम वर्षानुवर्षे रखडलेले आहे. या रस्त्यावरून शेतकरी,नागरिक,शाळेचे विद्यार्थी,जनावरे यांची सातत्याने रहदारी सुरू असते. याच रस्त्याच्या कडेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची वस्तीशाळा आहे. या ठिकाणी सुमारे चाळीसच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या पावसाळा सुरू असून शाळेच्या लहान विद्यार्थ्यांना चिखल आणि घाण पाण्यातून मार्ग काढत शाळेत जावे लागत आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्याने यामध्ये पाणी साठून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकरी,नागरिक,विद्यार्थ्यांचे पालक करू लागले आहेत. यावर प्रशासन काय निर्णय घेतेय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

विद्यार्थ्यांना कोण शिक्षा देत आहे?

मलिकपेठ ते यावली या रस्त्याच्या कडेला जिल्हा परिषदेची वस्ती शाळा असून या ठिकाणी अंगणवाडी व चौथी पर्यंत शाळा भरते. या शाळेच्या आजूबाजूच्या वस्त्यांवरील विद्यार्थी या शाळेत येतात. त्यांना चिखल आणि पाण्यातून मार्ग काढवा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती गेल्या अनेक दिवसांपासून झाली नसल्याने रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले असून याच पाण्यातून प्राथमिक शाळेचे विद्यार्थी रस्ता काढत शाळेत पोहचत आहेत. पाऊस पडल्याने रस्ता चिखलमय झाला असून चिखल आणि पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे कपडे खराब होऊ लागले आहेत. या रस्त्यावरील चिखल आणि पाण्यामुळे काही विद्यार्थी शाळेकडे फिरकत नाहीयेत. त्यांच्यात या चिखल आणि पाण्याबद्दल भीती निर्माण झाली आहे. रस्ता खराब असल्याने विद्यार्थी शाळेकडे येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होवू लागला आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा,अशी मागणी पालकांमध्ये जोर धरू लागली आहे.

Ground Report : यंत्रणेने अडवली विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाटमलिकपेठ ते यावली या अर्धवट राहिलेल्या रस्त्यासंबंधी माहिती घेवून सांगतो अशी माहिती गटविकास अधिकारी मिरगणे यांनी दिली. तर मलिकपेठ ते यावली रस्त्याचे काम आमच्याकडे नाही, कदाचित ते काम पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे असेल,असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यादव यांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्याचे काम कोणत्या योजनेतून झाले याची माहिती उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मलिकपेठ ते यावली रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून झाले की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून झाले याची माहिती आमच्याकडे नाही, हे काम आमच्या विभागाकडे तर नाही,असे पंचायत समिती बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर दळवी यांनी सांगितले. त्यामुळे यंत्रणांची टोलवाटोलवी सुरूच आहे.


Full View

Tags:    

Similar News