#AzadiKaAmritMahotsav : Ground Report : महामार्गांचा थाट पण गावच्या रस्त्यांची 'वाट'
येत्या तीन वर्षात देशातील रस्ते अमेरिकेच्या तोडीचे असतील असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करत आहेत. पण गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात धूळ आणि पावसाळ्यात चिखल यामुळे एक रस्ता गावकऱ्यांसाठी कसा धोकादायक बनला आहे याबाबत हरिदास तावरे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...;
बीड - देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ग्रामीण भागातील नागरिकांना अजूनही मुलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. महामार्ग चकाचक होत आहेत. पण ग्रामीण भागातील रस्त्यांची मात्र दूरवस्था कायम आहे. बीड जिल्ह्यातील अनेक गावांच्या बाबतीत हीच समस्या आहे. बीड ते नाळवंडी या रस्त्यावर अनेक गावे आहेत. पण या रस्त्याचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपासून अपूर्ण आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.
गेल्या सात वर्षांपासून हा रस्ता असाच आहे, अनेक लोक या रस्त्याने वाहन चालवताना पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर या रस्त्यावरून साधं चालता येत नाही, असे लोकांचे म्हणणे आहे. दरवर्षी पावसाळा आला की, रस्त्यावर फक्त मुरूम टाकला जातो, पुन्हा चिखल होतो आणि मग नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. उन्हाळ्यात धुळीमुळे या रस्त्यावरुन जाता येत नाही तर पावसाळ्यात चिखल अशा अवस्थेत लोकांना इथून प्रवास करावा लागतो आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी महामंडळाने एसटी बंद केली आहे. एसटी नसल्यामुळे मुलं मुली शाळेत जाऊन शकत नाहीत, खासगी वाहनं परवडत नाहीत, त्यामुळे मुलांच्या शाळा सुटल्याचे काही गावकऱ्यांनी सांगितले. अनेक निवेदनं दिली, उपोषण केले, आंदोलनं केली पण याचा शासनाला काही फरक पडला नाही, अशी तक्रार राजेश उत्तम चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुभाष चाटे यांना संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सांगितले की, या रस्त्यावर वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात असल्याने सतत खराब होत आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी उपविभागाने निधीसाठी मागणी केलेली आहे,. तूर्त या रस्त्यावर शासनाने विशेष रस्ता दुरुस्ती कार्यक्रम गट बमध्ये डांबरीकरण नूतनीकरण कार्यक्रमासाठी 18.30 लाखांची मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे सर्व अडचणी सोडवून लवकरात लवकर रस्त्याचे काम करु असे सरकारी उत्तर दिले.