कंत्राटी शेतीत फसलेल्या शेतकऱ्याचा आता संघर्षाचा निर्धार !

कंत्राटी शेतीविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला असताना औरंगाबादमध्ये एका शेतकऱ्याची कंत्राटदाराने फसवणूक केल्याचे उघड झाले. मॅक्स महाराष्ट्रने हे वृत्त दाखवताच संबंधित कंपनीने शेतकऱ्याचा तो माल खरेदी केला. पण ही कथा इथे संपत नाही तर इथून पुढे नवीन संघर्ष सुरू झाला आहे.;

Update: 2021-01-27 11:52 GMT

सरकारच्या शेती सुधारणा कायद्यांवरुन देशभरात रणकंदन सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. शेतकऱ्यांचा मोठा विरोधात कंत्राटी शेतीला आहे. कंत्राटी शेतीला विरोध का होत आहे याचे उदाहरण औरंगाबाद जिल्ह्यात समोर आले आहे. वैजापूर तालुक्यातील भाऊसाहेब पवार आणि त्यांच्या दोन भावांना कंत्राटी शेतीतून मनस्ताप करणारा अनुभव आला आहे. एकीकडे शेतकरी आक्रमक झाले आहेत तर दुसरीकडे केंद्रातील सरकारकडून अजूनही हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे पटवून देण्यासाठी धडपड सुरूच आहे. खरचं हे कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे का? याचा आढावा घेणार हा रिपोर्ट..

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर-गंगापूर मुख्य रोडवरून अंदाजे पाच किलोमीटर आत असलेल्या टेंभी हे छोटेस गाव आहे. गावा जवळून पाण्याचा कालवा गेला असल्याने या गावातील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय शेतीच आहे. त्यामुळे येथील शेतकरी ऊस, मोसंबी, टरबूज, खरबूज यासारख्या पिकांवर अधिक भर देत असतात. विशेष म्हणजे यातून त्यांना चांगले उत्पन्नसुद्धा होते.

कंपनीसोबत कसा झाला करार?

याच गावातील एक शेतकरी भाऊसाहेब पवार यांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढे शेती करण्याचा निर्णय घेतला. जवळपास 9 एकर शेती असलेले पवार गेल्या 15 वर्षांपासून आपल्या शेतात राबत आहेत. दरवर्षी ते टरबूज, खरबूज, मिरची, भाजीपाल्यासह इतर पिकं लावतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या भागात काही खासगी कंपन्यांनी शेतकरी मेळावा घेत करार पद्धतीने शेती करण्याबाबत मार्गदर्शन केले. या कंपन्यांनी शेतकऱ्यांचा यात मोठा फायदा असल्याचं त्यांना पटवून दिले.

भाऊसाहेब यांनी सुद्धा मेळाव्यात उपस्थिती लावली होती. त्यामुळे त्यांनी यावेळी एक वेगळा प्रयोग म्हणून कंपनीसोबत करार पध्दतीने टरबूज लावण्याचा निर्णय घेतला. याचवेळी त्यांचे बंधू गणेश पवार आणि राहुल पवार यांनीसुद्धा करार पध्दतीने टरबूजची शेती करण्याचं ठरवलं. या तिन्ही भावांनी वेगवेगळा करार करण्यापेक्षा एकाच्याच नावाचा करार करण्याचे ठरवले. त्यामुळे भाऊसाहेब पवार यांच्या नावाने तन्वीर ए. अझीझ मर्चंट आणि त्यांचे पार्टनर मे. ए.ए.एन फ्रुटस कंपनीसोबत करार करण्यात आला. करारानुसार फळ काढण्यायोग्य झाल्यावर चार किलोपेक्षा अधिक वजनाचे टरबूज 7 रुपये किलोने घेण्याचं ठरलं होतं.




 


जेव्हा फळ काढणी योग्य झालं म्हणजेच थोडं कच्चे असतानाच शेतकऱ्यांनी कंपनीला फोन करून माहिती दिली. मात्र व्यापाऱ्यांनी आज-उद्या करत तब्बल आठ दिवस उशीर लावला. त्यानंतर टरबूज घेण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्यांनी हा माल आता पिकला असून खरेदी करू शकत नसल्याचं म्हणत फळे विकत घेण्यास नकार दिला. ऐनवेळी फळे विकत घेण्यासाठी नकार मिळाल्याने शेतकरी पवार आणि त्यांचे भाऊ हतबल झाले. त्यात हा टरबूज एक्सोर्टसाठी असल्याने स्थानिक बाजारपेठेत कुणी विकत घेत नसून योग्य भाव सुद्धा मिळत नाही. त्यामुळे अनेक फळे शेतातच सडत पडली आहेत.

केंद्र सरकारच्या शेती सुधारणा कायद्यांवरुन देशभरात रणकंदन सुरु आहे. भाजप नेते आणि केंद्रसरकारमधील मंत्री या कायद्याचे फायदे पटवून देण्यासाठी दिल्ली पासून गल्लीपर्यंत कार्यक्रम घेत आहेत. मात्र याच नेत्यांना पवारांसारखेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खऱ्या परिस्थितीचा अभ्यास करण्याची गरज आहे.

करार शेतीमध्ये फसलो- भाऊसाहेब पवार

भाऊसाहेब पवार यांचे बंधू राहुल पवार हे सुद्धा गेल्या 15 वर्षांपासून शेती करतात. 12वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या राहुल यांच्या वाट्याला 25 एकर जमीन आल्याने त्यांनी शेती हाच आपला मुख्य व्यवसाय बनवला. चांगलं पाणी असल्याने त्यांनी यावेळी शेतात कापूस, ऊस, कांद्याची लागवड केली होती. तर दोन पैसे जास्त मिळतील म्हणून त्यांनी सुद्धा भाऊसाहेब यांच्यासोबत टरबुजाची लागवड केली. एकूण जमिनीतील 1 एकरावर त्यांनी टरबूजाची शेती केली. करार केला असल्याने भाव मिळण्याची चिंता नव्हती. त्यामुळे त्यांनी यासाठी 70 हजार रुपये खर्च करत टरबुजाची शेती उत्तमपणे केली.



मात्र ऐनवेळी कंपनीने माल घेण्यासाठी नकार दिल्याने ते अडचणीत सापडले. मॅक्स महाराष्ट्राने बातमी दाखवल्यानंतर व्यापाऱ्याने त्यांच्या शेतातील माल नेला. मात्र त्याला फक्त 1 रुपये किलो भाव दिला. त्यामुळे राहुल पवार अडचणीत सापडले असून, लावेलेले पैसे सुद्धा हातात पडणार नसल्याचं ते सांगतात. त्यामुळे करार पद्धतीने केलेल्या शेतीत फसलो असल्याचंही ते म्हणतात.

कायदेतज्ज्ञ काय म्हणतात?

पवार यांच्या झालेल्या फसवणुकीप्रकरणी औरंगाबाद येथील वकील विश्वेश्वर पठाडे म्हणतात की, "अशावेळी शेतकऱ्यांनी झालेले नुकसान आणि शेतात सडत असलेल्या मालाचे तलाठी आणि कृषीअधिकारी यांना सांगून तात्काळ पंचनामे करून घ्यावे. त्यांनतर त्यांनी पोलिसात फसवणूक झाल्याची संबंधित कंपनीविरोधात तक्रार करावी. त्यामुळे त्यांना यातून नक्कीच न्याय मिळू शकतो."

मॅक्स महाराष्ट्राने दाखवली शेतकऱ्यांची व्यथा

भाऊसाहेब यांची हीच व्यथा मॅक्स महाराष्ट्राने 12 जानेवारीला महाराष्ट्रासमोर दाखवली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतात पडून असलेला माल संबंधित कंपनीने नेला असून, पवार यांना 25 हजार रुपये मोबदला सुद्धा दिला असल्याचं पवार यांनी सांगितले आहे. मात्र उशिरा फळ नेल्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झालं असून, बऱ्यापैकी टरबूज शेतात सडून पडले असल्याची माहितीही पवार यांनी दिली आहे.

पोलिसात तक्रार का केली नाही याचे कारण भाऊसाहेब पवार यांनी सांगितले तेव्हा देशातील अनेक शेतकऱ्यांची व्यथा समोर आली. भाऊसाहेब म्हटले की, "पोलिसांत तक्रार केल्यानंतर तिथे चकरा मारायचा की शेतात काम करायचे?"


आता लढण्याचा निर्धार

भाऊसाहेब पवार यांना जरी 25 हजार मिळाले असले तरीही त्यांच्या भावाच्या पिकाला मात्र किलोला फक्त 1 रुपया भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे करारात 7 रुपये किलोचा दर ठरला होता. त्यामुळे आता कायदेशीर पद्धतीने आम्ही लढणार असल्याचं पवार यांचं म्हणणं आहे. तर कृषी अधिकारी यांना तक्रार दिली असून, लवकरच पोलिसात गुन्हासुद्धा दाखल करणार असल्याचे भाऊसाहेब पवार यांनी सांगितले आहे.

मॅक्स महाराष्ट्र करणार पाठपुरावा

मॅक्सच्या बातमीनंतर कंपनीने 25 हजार देऊन पवार यांचे डोळे पुसण्याच काम केलं आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्या पिकाचे पूर्ण पैसे मिळत नाही व त्यांच्या इतर भावांनी कंपनीला दिलेल्या फळला कराराप्रमाणे मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत मॅक्स महाराष्ट्र या बातमीचा पाठपुरावा करत राहणार आहे.

Tags:    

Similar News