#AzadiKaAmritMahotsav : Ground Report : बुलेट ट्रेनची तयारी पण आदिवासी बांधवांसाठी 'व्यवस्था' आजारी

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर आझादीचा महोत्सव साजरा होत असताना विकासाच्या नावावर बुलेट ट्रेन उभारणाऱ्या आदिवासी पालघर जिल्ह्यात रस्ते आणि पायाभुत सुविधांअभावी आदिवासींना कोसो मैलाची पाय तुडवावी लागत आहे.. प्रतिनिधी रविंद्र साळवेंचा ग्राऊंड रिपोर्ट...

Update: 2022-08-05 14:05 GMT

विकासाच्या नावावर दिवसागणिक रस्ते विकासाचे जाळे विस्तारत समृद्धीसह विविध महामार्ग प्रगतीपथावर नेण्याचे दावे केले जात आहे. आधुनेकतेकडे वाटचाल करत मोनो मेट्रो बुलेट ट्रेन चालवणाऱ्या महाराष्ट्रत आजही रस्त्या अभावी येथील आदिवासींना कोसो मैलाची डोंगर माथ्याची पाय वाट तुडवावी लागत आहे. ``माझा घरवाला 23 तारखेला रात्री आजारी झाला. पाऊस सुरू होता नदीच्या पलीकडे जाणाऱ्या बंधाऱ्यावरूनही पाणी जात होते. गावकऱ्यांनी डोली करून नदीच्या काठाला पोहचवले. नदीला पूर असल्याने नदी ओलांडता आली नाही वेळेत उपचार झाला नाही, रस्त्यातच मृत्यू झाला मला लहान लहान तीन मुलं आहेत आम्ही आता जगायचं कस हा प्रश्न आहे? असे कुर्लोद,जांभूळपाडाचे रहीवाशी जानकी जयराम कोती हिने मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगितले.




 


आजही पालघर जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतिक्षा आहे. देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी मुबंईपासून 100 किमी अंतरावर तर मोखाडा तालुक्याच्या मुख्यालयापासून 20 ते 25 किमी अंतरावर दरी डोंगरात कुर्लोद ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जव्हार मोखाडा तालुक्यांच्या सीमेवर आदिवासी बहुल लोकवस्ती असलेला जांभुळ पाडा 30 घरे 110 लोकसंख्या शेड्याचापाडा 15 घरे रायपाडा 20 घरे रायपाडा व शेड्याचा पाडा एकूण लोकसंख्या 252 आजही मूलभूत सोयीसुविधा पासून वंचित आहे.

मी सन 2001 साली उपरपंच होतो तेव्हा पासून आतापर्यंत आमच्या पाड्यावरील समस्या सोडवण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार करून पाठपुरावा करतोय. परंतु आमच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. आम्हाला नदीवर पूल बांधून द्या रस्त्याची सोय करा दवाखान्याची सोय उपलब्ध करून द्यावी. तरच आमच्या जगण्याला अर्थ आहे असे कुर्लोद,रायपाडाचे ग्रामस्थ सदू सकृ बरतंन यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगितले .





 


पावसाळ्यात तर तालुक्यांचा संपर्कच तुटतो कामानिमित्त किंवा आजारी पेशंट झाल्यास नदीतून जीवघेणी कसरत करावी लागते. 5 किलोमीटरचा भला मोठा डोंगर तुडवत केवनाळे गाठावे लागते. तिथेही गाडी भेटली तर ठीक नाही तर 20किमीचे अंतर पार करत खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागते. यामुळे पेशंटला वेळेत उपचार न मिळाल्याने मागील पाच वर्षात 9 पेशंट उपचाराविना दगवलीत आहेत ही बाब खेदाने म्हणावी लागते, असे त्यांनी पुढे सांगितले.

आमचे पाडे नदीच्या पलीकडे आहेत. यामुळे पावसाळयात अनेक मानस आमची गुर ढोर नदीत वाहून गेले आहेत. पावसाळयात नदीला पूर असल्यावर रेशन आणता येत नाही खूप अडचण असल्यास लाकडाच्या फळीवरून जीव धोक्यात घालून रेशन आणावं लागत. पावसाळयात वर्षानुवर्षे शाळा बंद रहातात यामुळे आमची मुलं शिक्षणापासून वंचित राहतात, असे शेड्याचा पाडाचे ग्रामस्थ यशवंत नवसू मोडकयांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगितले.




 


पावसाळ्यात माझा नवरा व मुलगा आजारी झाला होता. पण वेळत उपचार मिळाला नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे मंजुळी मंग्या भागडे (शेड्याचा पाडा कुर्लोद ग्रामस्थ) हिने मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना आपल्या व्यथा मांडल्या. मरणयातना भोगणाऱ्या या पाड्यावरील आदिवासींकडे कुणीही लक्ष देत नाही. निवडणुका आल्यावरच इकडे पुढारी येतात. निवडणुका झाल्या का कुणीही फिकरत नाही, असे मॅक्समहाराष्ट्राशी बोलत येथील गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

जांभूळपाडा ,रायपाडा, शेड्याचा पाडा, आंब्याचापाडा,हे पाडे राज्यापासून तुटलेले पाडे आहेत. येथे सोयीसुविधांचा अभाव आहे गावातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर लाकडाची डोली करून 5 किमीचा डोंगर पार करून त्या रुग्णाला न्यावे लागते. वेळेत उपचार न मिळल्याने येथील 1) जानू बेंडू भागडे( वय 25)सर्पदंशाने मृत्यू शेड्याचा पाडा 2) मंग्या रामा भागडे (वय 45 ) पोटाचा आजार शेड्याचापाडा 3) रुपाली केशव मोडक (वय 4 वर्ष) सर्पदंशाने मृत्यू शेड्याचा पाडा 4) जयराम नथु कोती शेड्याचा पाडा (वय 38) आकडीने मृत्यू 5) जानकी घाटाळ नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू 6) सक्री बाबू दोरे तापाने मृत्यू 7) सुनिल निखडे (वय 24 ) रायपाडा तापाने मृत्यू 8)सुंदर निखडे ताप उलटी अतिसार यामुळे मृत्यू अश्या आठ पेक्षा अधिक रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने दगावली आहेत पावसाळयात तर या पाड्याचा संपर्कच तालुक्याशी राहत नाही. केंद्र सरकार म्हणतंय मेक इन इंडिया, डिजिल इंडिया, ..पण या योजना कुठे आहेत, असा सवाल यावेळी उपस्थित होतोय.

पावसाळ्यात नांदगाव कुर्लोद रस्त्याचीही अवस्था बिकट

मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक व अतिदुर्गम भागात वसलेले कुर्लोद हे गाव या गावाकडे जाणाऱ्या नांदगाव कुर्लोद रस्त्याची अवस्था पावसाळ्यात आणखीन बिकट झाली असल्याने विविध समस्यांचा सामना कुर्लोद वाशीयना करावा लागतो आहे. आमच्या रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे पावसाळयात रस्त्याची अधिकच दुरावस्था झाली असल्याने या रस्त्यावरून येजा करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे येथील ग्रामस्थ राजेंद्र पालवे यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगितले.




 


नागमोडी वळणाचा 8 ते 9 किमी अंतराच्या असलेल्या या रस्त्याचे उन्हाळयात 4 किमीच्या आसपास रस्त्याचे सुधारीकरण करण्यात आले आहे. परंतु उर्वरित रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. हा अर्धा रस्ता जव्हार बांधकाम विभाग हद्दीत तर मोखाडा बांधकाम विभागाच्या हद्दीत अर्धा रस्ता असल्याने दोन तुकड्यात विभागाला गेला आहे. मोखाडा हद्दीतला रस्त्याचे सुधारीकरण करण्यात आले असून जव्हार बांधकाम विभागाच्या हद्दीतल्या रस्त्याची पूर्णता दुर्दशा झाली आहे.

येथील आदिवासींना बाजारहाट शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य किंवा शासकीय कामानिमित्त जव्हार किंवा मोखाडा जायचं असल्यास याच रस्त्यावरून येजा करावी लागते. यामुळे रोजच मोठ्या प्रमाणात रहदारी या रस्त्यावरून होत असल्याचे पहायला मिळते. परंतु रस्त्याची दुरावस्था असल्याने या रस्त्यावरून येजा करणाऱ्या अबाल वृद्ध शाळकरी मुलांनसह चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कुर्लोद हा अतिदुर्गम भाग डोंगराळ भाग असल्यामुळे याकडे लोकप्रतिनिधी प्रसासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे कुर्लोद गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था ही काही बिकट असल्याने आदिवासींचे जीवन दुर्धर झाले आहे.


Full View

Tags:    

Similar News