ऑनलाईन प्रवेशाचा घोळ, ६५ विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
एकीकडे ऑनलाईन शिक्षणाचा आग्रह धरला जात असताना मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे ६५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष टांगणीला लागले आहे. पाहा आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांचा ग्राऊंड रिपोर्ट...
राज्यातील ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर अनेक ठिकाणी ते सुरू झाले. तर काही ठिकाणी पालकांनी आणि शाळा व्यवस्थापनांनी ऑनलाईनचा पर्यायही स्वीकारला. त्यातच आता अकरावीच्या ऑनलाईन एडमिशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पण चेंबूरमधील आचार्य कॉलेजमधील ६५ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऑनलाईन एडमिशनच्या गोंधळातून झाला आहे.
असाच काहीसा प्रकार हा चेंबूरच्या एन.जी. आचार्य अँड डी.के. मराठे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत घडला आहे. अकरावीला प्रवेश झाल्याचे समजून ६५ विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरूवात कली. पण कॉलेजने अचानक या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत हे विद्यार्थी समाविष्टच न झाल्याचा दावा करत कॉलेजने या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात पालकांनी कॉलेजकडे पाठपुरावा केला. पण कोणतेही ठोस उत्तर न आल्याने गुरूवारी पालकांनी महाविद्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
नेमके प्रकरण काय?
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अनेक कॉलेजेसमध्ये ऑनलाईन वर्ग सुरूही झाले. मात्र अशातच आचार्य-मराठे कॉलेजमधील ६५ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने गदारोळ निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे नाव ऑनलाइन यादीमध्ये आल्यानंतर त्यांनी ऑनलाइन पद्धतीने फी जमा केली. त्यांना फी भरल्याची पावतीही कॉलेजतर्फे देण्यात आली. यामुळे प्रवेश निश्चित झाल्याचे मानत विद्यार्थी आणि पालक निश्चिंत जाले. मात्र अचानक कॉलेजतर्फे या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने पालक आणि विद्यार्थी हादरले. कॉलेजने प्रवेश प्रक्रियेमध्ये घोळ केल्याने आपल्या मुलांचे प्रवेश रद्द झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
यासंदर्भात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, "हा एक दोन विद्यार्थांचा प्रश्न नाही आहे तर जवळपास 65 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. या सगळ्या विद्यार्थांना काढून टाकले असल्याचे मॅसेज कॉलेज प्रशासनाकडून येत आहेत. तसेच कॉलसुद्धा येत आहेत. असे अचानकपणे विद्यार्थांना कॉलेजमधून काढून टाकल्यास त्यांच्या भवितव्याचे काय याचा विचार कॉलेज प्रशासनाने करायला हवा. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही प्रशासनाला याचा जाब विचारत आहोत पण अजून सुद्धा त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यामुळे आम्ही आंदोलनाला बसलो आहोत."
आचार्य-मराठे कॉलेजचे म्हणणे काय?
विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश का रद्द केले यासंदर्भात विचारणा केली असता प्रवेशावेळी संमतीचे बटन क्लीक केले नसल्याचे कारण त्यांना देण्यात आले. याबाबत अनेक दिवसांपासून पालक कॉलेज आणि उपसंचालक कार्यालयाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अद्याप उत्तर मिळालेले नसल्याने अखेर पालकांनी आंदोलनाचा मार्ग निवडला.
यासगळ्या आंदोलनासंदर्भात आम्ही आचार्य कॉलेजच्या मुख्याध्यापिका विद्या लेले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, "आम्ही या विद्यार्थांना सप्टेंबर 2019 मधेच व्हाट्सपच्या माध्यमातून मेसेज करून सांगितलं होतं, की तुमची ऍडमिशन रद्द करण्यात आली आहे. पण त्यावेळी विद्यार्थांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि या सगळ्या संदर्भातील पुरावे कॉलेज प्रशासनाकडे आहेत. विद्यार्थांनी आपला ऑनलाईन फॉर्म भरत असताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे प्रवेश रज्ज झाले आहेत. तरी देखील आम्ही या विद्यार्थांच्या शैक्षणिक वर्षाची काळजी घेत निर्णय घेणार आहोत. पण या सगळ्या प्रकरणात निर्णय घेण्यासाठी कॉलेज प्रशासनाला विद्यार्थी आणि पालक यांनी वेळ दिला पाहिजे, ही काही गोष्ट लवकर होत नाही पण आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ."
शिक्षण विभागाचे म्हणणे काय?
या सगळ्या आंदोलना संदर्भात आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या प्रकरणाचा स्वतंत्रपणे अभ्यास सुरू आहे. सरसकट सर्वांना एकच नियम लावण्यात येणार नाही. नेमकी कोणाची चूक झाली आहे, हे जाणून घेऊनच निर्णय घेण्यात येईल. योग्य तो निर्णय घेऊन ही प्रक्रिया लवकरच संपवण्यात येईल, असे मुंबईचे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी मॅक्स महाराष्ट्रला सांगितले.
अकरावी प्रवेशाच्या अखेरच्या यादीसाठी मुंबईतील कॉलेजेसमधील सर्व शाखांच्या मिळून एकूण १ लाख ४८ हजार ३८६ जागा उपलब्ध होत्या. यासाठी एकूण ६८ हजार १७८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ५९ हजार ३२२ विद्यार्थ्यांनी विशेष फेरीमध्ये प्रवेश घेतले आहेत. पण यामध्ये सुमारे ८ हजार ८५६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. तिसऱ्या यादीत अर्ज केलेल्या एकूण ३५ हजार ३१४ विद्यार्थ्यांना आपल्या पसंती कॉलेज मिळाले. त्यामुळे तिसऱ्या फेरीनंतर एक लाख ३५ हजार ४६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही त्यांनी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे कॉलेजेसमध्ये प्रवेश दिलात जातो आहे. आधीच कोरोनामुळे अकरावीचे शैक्षणिक वर्ष जवळपास ६ ते ७ महिने उशिराने सुरू झाले आहे. त्यामुळे आता कॉलेज व्यवस्थापनांनी जास्त वेळ वाया न घालवता ऑलनलाईन पद्धतीने शिकवण्याचा वेग वाढवला आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी तीन नियमित राऊंड आणि दोन विशेष राऊंड घेण्यात आले आहेत. आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे आणखी एक राऊंड होणार आहे.
त्यातच आता चेंबूरमधील या ६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाईन गोंधळामुळे रद्द झाले असतील तर सरकारला याबाबत काही तरी धोरणात्मक निर्णय़ घ्यावा लागेल. कारण ऑनलाईन गोंधळामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून लांब राहणे योग्य नाही. कॉलेजच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे नुकसान होणे योग्य नाही यावर सरकारने तातडीच्या कारवाईची गरज आहे, अशी मागणी पालकांनी केली आहे. जोपर्यंत या ६५ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा तिढा सुट नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या पालकांनी केला आहे.
दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश रद्द केले आहेत किंवा ज्यांना आपल्या पसंतीचे कॉलेज मिळालेले नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर १२ फेब्रुवारी रोजी प्रवेशाची आणखी एक संधी असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्याता आले आहे. दहावीच्या परीक्षेत नापास झालेले जे विद्यार्थी पुनर्परिक्षेत पास जाले आहेत, त्यांनाही या राऊंडमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करण्याची सवलत देण्यात आली आहे.