शिंदेंच्या जाहिरातीमुळे सरकारमधील गोंधळ चव्हाट्यावर

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच मुख्यमंत्री तीन दिवसांच्या सुट्टीवर असतानाच त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला. त्यासाठी कारण ठरले ते म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपने सांगितलेला दावा. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीत मिठाचा खडा पडला तो इथेच. पण त्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवरून प्रकरण आणखी तापलं आहे. त्याचाच वेध घेणारा रिपोर्ट....;

Update: 2023-06-13 15:30 GMT

एकीकडे भाजपने मिशन 45 चे ध्येय ठेऊन राज्यातील 48 जागांवर आपले निवडणूक प्रमुख नेमले आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेल्या जागांवरही भाजपने आपले निवडणूक प्रमुख नेमले आहेत. एवढंच नाही तर कल्याण लोकसभा मतदार संघ भाजपकडे पुन्हा खेचण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत आणि त्याला वरिष्ठांचा पाठींबा असल्याचे म्हटले जात आहे. हे सगळं एका बाजूला घडत असतानाच शिवसेनेने राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे असं म्हणत वर्तमानपत्रांमध्ये एक जाहिरात प्रसिध्द केलीय. या जाहिरातीत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. मात्र जाहिरातीतून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच बायपास करण्यात आलंय.

शिवसेनेने प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या कल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या सर्व्हेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अव्वल स्थान मिळवल्याचे म्हटले जात आहे. यामध्येही देवेंद्र फडणवीस यांचे नाव टाळण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

या सर्व्हेसाठी 30.2 टक्के लोकांनी भाजप तर 16.2 टक्के लोकांनी शिवसेनेला कौल दिलाय. तर एकनाथ शिंदे यांना 26.1 तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे शिवसेनेने जाहिरात दिलेल्या सर्व्हेत देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हेच जास्त पॉप्युलर असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत.

आधीच मंत्रीमंडळाचा विस्तार होत नसल्याने एकनाथ शिंदे यांच्या गोटात वाढलेली धुसफूस असो वा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बदल्यांमधील वाढता हस्तक्षेप ही शिवसेना आणि भाजपमधील नाराजी वाढवण्यास कारणीभूत ठरताना दिसत आहे. मात्र नव्याने मंत्रीमंडळ विस्तार होण्याऐवजी शिवसेनेच्या पाच मंत्र्यांची गच्छंती करण्याचा डाव भाजपचा असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगलीय.

या पाच मंत्र्यांमध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांची नावं असल्याचं म्हटलं जातंय.

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेलं वक्तव्य आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यात आलेलं अपयश, संदीपान भुमरे यांना बदल्यातच रस असल्याने, संजय राठोड यांच्याविरोधात राज्यातील मेडिकल असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केलेली तक्रार, गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच पाणीपुरवठ्याची न झालेली कामं आणि तानाजी सावंत आणि प्रत्येक जिल्ह्यात खासगी सचिव नेमूण व्यवहार सुरु केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मंत्र्यांना डच्चू देण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत असल्याची चर्चा रंगलीय. त्यापार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्यालाच लोकांची पसंती असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भाजप- शिवसेनेतील संबंध ताणले जाण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यातच या सर्व्हेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलंय.

एकनाथ शिंदे यांनी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब असल्याने छगन भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना या सर्व्हेच्या माध्यमातून चॅलेंज दिल्याचं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

कुणामुळे कुणाचं महत्व कमी होत नसतो. लोकप्रियता ही जनता ठरवत असते. त्यामुळे कुठल्या जाहिरातीवर, कुठल्या सर्व्हेक्षणाला काहीही अर्थ नसतो, असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे.

मात्र नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रीया देतांना हा झी टीव्हीचा सर्व्हे आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्यासंदर्भात पसरवण्यात येत असलेल्या माहितीला काहीही अर्थ नाही, असंही नरेश म्हस्के यांनी सांगितले.

एकीकडे मंत्रीमंडळ विस्तारावरून धुसफूस सुरू असतानाच शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त असल्याची दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या सर्व्हेक्षणाला अर्थ नसतो, असं भाजपने म्हटलंय. त्यामुळे लोकप्रियतेच्या मुद्द्यावरून आता शिंदे-फडणवीस सरकारमधील गोंधळ चव्हाट्यावर आलाय.


Full View

Similar News