ठाण्यातील शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशावर की महापौरांच्या विचारसरणीवर चालते? राष्ट्रवादीचा खोचक सवाल
ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वारंवार प्रयत्न सुरू आहेत. पण ठाण्यातील शिवसेना नेत्यांना मात्र आघाडी नको आहे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत. "एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमहाविकास आघाडी झालीच पाहिजे, असे म्हणत असतानाच ठाण्याचे विद्यमान महापौर नरेश म्हस्के हे शिवसेना-भाजप नैसर्गिक युतीचे दाखले देत आहेत. त्यामुळे ठाण्याची शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर की महापौर नरेश म्हस्के यांच्या विचाररणीवर चालते? याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा, असा खोचक टोला आनंद परांजपे यांनी लागावला आहे.
नरेश म्हस्के यांच्या महापौरपदाची अडीच वर्षांची मुदत संपत असल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली शेवटची महासभा शुक्रवारी झाली. या महासभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटे काढले आणि शिवसेना- भाजप ही नैसर्गिक युती होती, असे सांगत स्वबळाचा नारा दिला. यावरुनच आनंद परांजपे यांनी नरेश म्हस्के यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री द्धव ठाकरे हे एकीकडे म्हणतात की 30 वर्षे आम्ही युतीमध्ये सडलो. सापाला आम्ही दूध पाजले आणि ठाण्याचे महापौर हे सेना-भाजपची नैसर्गिक युती आहे अन् हे दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशा प्रकारचे भाष्य करीत आहेत. याचा खुलासा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी करायला हवाय, असे परांजपे यांनी म्हटले आहे.