एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलं. मात्र, हे घड्याळ हातात बांधताना जयंत पाटील यांच्या एका प्रश्नाचा दाखला देत 'तुम्हाला राष्ट्रवादीत प्रवेश दिला तर तुमच्या मागे ईडी लावली जाईल, असं जयंत पाटील मला म्हणाले. तर मी जयंत पाटील यांना म्हणालो, त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, सीडी काय प्रकरण आहे ते.' या सीडीमध्ये काय आहे हे योग्यवेळी सांगेल असंही त्यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. असं म्हणत भाजप नेत्यांना धमकी वजा इशारा दिला.
मात्र, खरंच एकनाथ खडसे यांच्याकडे सीडी आहे का? सीडी असेल तर त्या सीडी मध्ये नक्की काय आहे? ही सीडी नक्की कोणाची आहे? या सीडीत जर धक्कादायक, भ्रष्टाचाराच्या संदर्भात माहिती आहे. तर खडसे इतके दिवस गप्प का होते? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. दरम्यान खडसे यांच्या प्रवेशानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली... ते म्हणाले
"भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्या नाराजीवर मार्ग निघाला असता. पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना काय देणार हे पाहावं लागेल, राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंचं समाधान लिमलेटची गोळी देऊन करणार की चॉकलेट? नाथाभाऊंच्या नाराजीबाबत अनेकवेळा त्यांच्याशी बोलणं झालं. त्याविषयी काहीतरी मार्ग निघाला असता. खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेस काय देईल, ते बघूया. यावर खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे...
'चंद्रकांतदादा तुमचा भाजपाशी संबंध काय? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आलात" असं म्हणत चंद्रकांत पाटील य़ांना रोखठोक उत्तर दिले. एकनाथ खडसे यांच्या या रोखठोक उत्तरानंतर पाटील यांना जेव्हा त्यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा पाटील यांनी 'रात गयी, बात गयी' म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं, असलं तरी खडसेंच्या सीडी प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेला सुरुवात झाली आहे.
या संदर्भात आम्ही भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशी बातचित केली. राजकारण हे राजकीय पद्धतीने करायचं असतं, त्यांच्याकडे सीडी आहे की नाही सांगता येत नाही. मात्र, राजकारण हे मुद्द्यावर करायचं असतं. मॅक्समहाराष्ट्राचे विशेष प्रतिनिधी संतोष सोनवणे यांना संदर्भात विचारलं असता, ते सांगतात...
सी डी आहे की नाही. हे खडसेंनाच माहीत... मात्र, आपल्याकडे काही पुरावे आहेत. असं सांगून समोरच्यावर दाबाव टाकण्यासाठी त्याचा वापर करता येतो. जळगावला CD कांड नवीन नाही. या अगोदरही हे प्रकार झाले आहेत. त्याचा फायदा ही काही राजकारण्यांनी घेतलाय. मात्र, हे सर्व वैयक्तिक राजकारण खेळलं जात आहे. वास्तविक विकासाचं राजकारणाचं केलं पाहिजे. तेच चिरकाल टिकते. विकास केल्यास जनमानसांना त्याचा सार्वजनिक जीवनात फायदा होतो. CD ने नाही. असं मत सोनवणे यांनी व्यक्त केलं आहे.
तर दैनिक पुण्यनगरी चे संपादक विकास भदाने यांच्याशी बातचित केली असता... एकनाथ खडसेंनी अगोदरही CD असल्याचं बोलले होते. मात्र, कधीच CD त्यांनी लोकांसमोर आणली नाही. त्यांच्या कडे CD असेल तर त्यांनी नक्कीच लोकांसमोर आणायला हवी. CD चं राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण केलं तर अधिक चांगले राहील. असं मत भदाने व्यक्त करतात..
तर सकाळ चे (सरकारनामा) ज्येष्ठ पत्रकार कैलास शिंदे सांगतात... एकनाथ खडसेंनी CD चा उल्लेख केला. मात्र, त्यांच्या कडे अनेक गुपित आहेत. असा त्याचा अर्थ होतो. विरोधी पक्ष नेता असताना अनेक माहिती त्यांच्या कडे असेल. आता खडसे या माहितीचा कसा वापर करतात त्यांच्यावरच सगळी गणित अवलंबून आहेत.
एकंदरीत खडसेंनी सीडी चा केलेला उच्चार आणि त्यानंतर आलेल्या सर्व राजकीय वर्तुळातील प्रतिक्रिया आणि स्थानिक पत्रकारांच्या प्रतिक्रिया यांचा विचार करता सीडीचं राजकारण विकासाचा गळा घोटतं असं दिसतं. मात्र, भारतीय जनता पक्षाने जे पेरलं तेच उगवताना दिसतंय... सीडीचं राजकारण भाजपला नवीन नाही. खडसे तर भाजपच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत. त्यामुळं खडसेंची सीडी किती लोकांचं राजकीय गुपित खोलते. की झाकली मुठ सव्वा लाखाची राहते. हे पाहणं महत्त्वाचं आहे.
खडसे पक्षप्रवेशावेळी कोणी काय म्हटलं...
शरद पवार
इतिहासाचा पहिला टप्पा संपला आहे, आता दुसरा टप्पा सुरू होतोय. नाथाभाऊ पक्षात आल्यामुळे धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्य़ात पक्षवाढीला गती मिळणार आहे. अनेक नेत्यांनी आपले आयुष्य या जिल्ह्य़ासाठी दिले आहे. एका निष्ठेने काम करणारा हा जिल्हा आहे. तेथे नवी पिढी उदयाला आली, ती उभी करण्याचे काम खडसे यांनी केले. आता नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्यामुळे जळगाव जिल्ह्य़ातील नवे-जुने कार्यकर्ते एकत्र येऊन पक्षाची ताकद वाढेल.
एकनाथ खडसे...
''मी ४० वर्षे भाजपमध्ये काम केले. परंतु माझी मानहानी करण्यात आली. माझा गुन्हा काय हे वारंवार विचारले, परंतु या क्षणापर्यंत मला उत्तर मिळाले नाही. माझ्याविरोधात भूखंडाच्या चौकशा लावल्या. आता थोडे दिवस जाऊ दे, कुणी किती भूखंड घेतले हे दाखवतो, शरद पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की मी गेली ४० वर्षे ज्या निष्ठेने भाजपाचे काम केले, त्याच निष्ठेने मी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करेन. मी भाजपा पक्ष वाढवला, तसाच आता राष्ट्रवादी पक्ष दुप्पट वेगाने वाढवेन. मी पक्षाचा विस्तार करून दाखवेन. मला फक्त तुम्हा लोकांची साथ हवी आहे. माझ्या पाठीशी जर कोणी भक्कमपणे उभं राहिलं, तर मी कुणालाही घाबरत नाही!" तसेच, राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही मला तसाच सल्ला दिला असल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील...
'कटाप्पाने बाहुबली को क्यू मारा' हा प्रश्न केला होता. परंतु त्याचे उत्तर त्यांनी दिले नाही. असं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला. मात्र त्यांना आता कळेल 'टायगर अभी जिंदा है. खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश ही तर केवळ सुरुवात आहे आणि अजून बरेच रांगेत आहेत,' असे सूचित करताना जयंत पाटील यांनी 'पिक्चर अभी बाकी है' असं म्हणत फडणवीस यांना इशारा दिला आहे.