अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु असून विदर्भातही पाऊस सुरु आहे. शुक्रवारी नागपूरची जी काही दुरावस्था झाली त्याला पूर्णपणे केंद्रात,राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता असणारे भाजपा सरकार जबाबदार आहे असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
कुणाच्या हट्टापायी पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात आले आहे. राज्यसरकार चालवतात त्यांचा तो अधिकार असतो त्याबद्दल दुमत नाही. कामकाज सल्लागार समितीमध्ये चर्चा केली जाते आणि तो निर्णय घेतला. विदर्भामध्ये हिवाळी अधिवेशन घेण्याचे सोडून पावसाळी अधिवेशन घेण्यामागचे कारण काय असा सवालही अजित पवार यांनी
केला.
विदर्भामध्ये जास्त दिवस अधिवेशन चालावे असं वाटत होतं तर पहिल्य़ा आठवडयात काहीच कामकाज का झाले नाही. शेवटी दोन आठवडे फक्त कामकाज होणार आहे. त्यापेक्षा हिवाळी अधिवेशन २-३ डिसेंबरला सुरु केले असते आणि २४ किंवा २५ डिसेंबरला संपवले असते तर तीन आठवडयामध्ये इथल्या प्रश्नांना न्याय देता आला असता असा विचारही अजित पवार यांनी यावेळी मांडला. मात्र त्याबद्दल सरकारने समाधानकारक उत्तर दिलेले नाही असेही दादा म्हणाले.
आज मुंबईमध्ये जाता येत नाही आहे कारण रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. मुंबईमध्ये असे सांगण्यात आले होते की, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की,रेल्वे रुळावर जास्त पाणी आले तरीदेखील रेल्वे धावू शकेल. अशाप्रकारची नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. मग रेल्वे का ठप्प झाली असा संतप्त सवाल अजित पवार यांनी सरकारला केला आहे.
काल रविवार सुट्टीचा दिवस होता म्हणून मुंबईकरांनी सहन केलं परंतु आज प्रत्येकाचा कामाचा दिवस आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिथेही पावसामुळे हाहाकार माजलेला आहे आणि हवामान खाते सांगते आहे आणखी तीन ते चार दिवस पाऊस असाच कोसळणार आहे. कोकणामध्ये सर्वच ठिकाणी हाहाकार माजला आहे. कोकणच्या अनेक शहरामध्ये नागरीकांना जाता येत नाहीय. गावांचा संपर्क तुटला आहे. शनिवार-रविवार पर्यटनाच्यादृष्टीने बाहेर पडले होते ते लोक पावसाच्या पाण्यामध्ये अडकून पडले अशी परिस्थिती आहे.मुंबई, नागपूरमध्ये तीच अवस्था आहे
असं म्हणत अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.