गेल्या महिन्याभरापासून सोन्याच्या दरात वेगाने वाढ होत आहे. सोमवारी बाजारात सोन्याच्या दराने उच्चांकी पातळी गाठली. दहा ग्रॅम सोन्याचा दर ४० हजार रुपयांच्यावर (जीएसटीसह) पोहोचला आहे. जीएसटी वगळून सोन्याचा दर सोमवारी ३९ हजार १८० रुपये होता. पहिल्यांदाच सोन्याचा दर 39 हजारांच्या पुढे गेला आहे. एका दिवसात सोन्याच्या किंमतीत 350 रुपयांची वाढ झाली आहे. याआधी सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली होती. शुक्रवारी सोन्याचा दर 38 हजार 995 रुपयांवर पोहोचला होता. सणासुदीला सोन्याचे दर वाढल्याने आता खरेदीवर याचा परिणाम होऊ शकतो.
Full View
या सर्व सोन्याचा दर सातत्याने का वाढत आहे यावर अर्थकारणाचे अभ्यासक भूषण देशमुख यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या बदलांचा परिणाम देशातील स्थानिक बाजारात होत असतो. या आठवड्यातच सोने 40 हजारांच्या पुढे जाऊ शकते. जर आंतरराष्ट्रीय बाजारात दर आणखी बदलले तर येत्या 2 ते 3 आठवड्यात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व कच्चा तेलाचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे भाव कमी जास्त होत असतात असं भूषण देशमुख यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले.