Ground Report : हरणांच्या कळपांचा शेतात विहार, पीक उध्वस्त झाल्याने शेतकरी बेजार

नांदेड जिल्ह्यातील काही भागात सध्या हरणांचे कळप फिरताना दिसत आहेत. या कळपांचे दृश्य चांगले दिसत असले तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.;

Update: 2021-07-15 12:17 GMT

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत....शेतं आणि त्याच्या आसपासचे शिवार हिरवेगार झाले आहे....अशा वातावरण हरणांचा कळप स्वच्छंदीपणे बागडताना दिसला तर? हो असे दृश्य प्रत्यक्षात अवतरले आहे नांदेड जिल्ह्यात....नांदेड जिल्ह्यातील नायगाव आणि देगलूर तालुक्यांना लागून काही एकरात जंगल पसरलेले आहे. या जंगलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हरणांचे वास्तव्य आहे. एरवी क्वचितच दिसणारे हे हरणांचे कळप आता मानवी वस्त्यांच्या जवळपास दिसू लागले आहेत. या भागातील शेतांमध्ये हे हरणांचे कळप विहार करतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

हरणांच्या कळपाचे हे दृश्य मनोहारी वाटत असले तरी इथल्या शेतकऱ्यांची मात्र या कळपांमुळे चिंता वाढली आहे. नांदेड जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये सध्या हरणांच्या कळपांचा शेतीत वावर वाढला आहे. शेतांच्या बांधावर शेकडोंनी असलेल्या हरणांचे कळप वावरताना दिसत आहेत. पण यामुळे या शेतांमधील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतातील पिकांचे कोवळे कोवळे अंकुर आणि पाने, इतर फळे ही हरणं खाऊन टाकत आहेत. यामुळे शेतांमधील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून कोरोना, अवकाळी पाऊस यामुळे त्रस्त आहे. त्यात यंगदा मराठवाड्यात वेळेवर दाखल झालेल्या पावसाने नंतर दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचेही संकट आले. या सर्व गोष्टींचा विचार करता आता या नवीन संकटामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हरणांच्या कळपांचे दृश्य विलोभनीय असते, तसेच या जंगली प्राण्यांना इजा करता येत नाही अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांपुढे आता काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील होटाळा, खंडगाव, कांडाळा, मरवाळी तांडा या भागात हरणांचे कळप फिरत असतात. या भागातील शेकडो एकर शेत जमिनीवरील कोवळी पिकं फस्त करत आहेत. तसेच देगलूर तालुक्यातील सांगवी, शहापूर, आलूर, नंदूर, शेखापूर, शेळगाव, तमलूर या परिसरात अनेक शेतातील पिके हरीण फस्त करताना दिसत आहेत.

वन विभागाने या हरणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गेल्या काही वर्षातील नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांकडे पैसी नाहीये. त्यामुळे पेरणी करायची तर शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामात पेरणी केली. बी-बियाणे घेऊन पेऱणी आणि त्यानंतर पिकांची काळजी घेण्याचे काम शेतकरी करत आहे. जीवाचे रान करुन शेतकरी राहत आहे. पण या परिस्थितीत आता या जंगली प्राण्यांचा वावर शेतात सुरू झाल्याने शेतीवर मोठा परिणाम होतोय, त्यामुळे काय करावे असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.


शेतकरी हवालदिल

"पाच- दहा एकर शेतीत पीक येईल या आशेने आम्ही पेरणी केली. पण हरणांचे कळप आमचे पीक फस्त करीत आहेत," होटाळा येथील शेतकरी गोवर्धन जाधव यांनी अशा भावना व्यक्त केल्या. तर यासंदर्भात बालाजी कोत्तेवार या शेतकऱ्याने सांगितले की, "आजकाल महागाई खूप वाढली आहे, शेतीही खूप महाग झाली आहे. अशा स्थितीत आमच्या पिकांचे हरण्यांच्या कळपामुळे भरपूर नुकसान होत आहे."

तर " वन्यजीव प्राणी आपल्या निसर्गाचे एक सुंदर रूप आहेl. त्यांची काळजी घेणे, त्यांना जपणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. पण हरिण जर पिकांची नासधूस करीत असतील तर वन विभागाने या प्राण्यांसाठी स्वतंत्र पाणवठ्याची व्यवस्था करावी. त्यामुळे हरीण व इतर वन्यजीव प्राणी शेतीकडे येणार नाहीत" असे मत प्राणीमित्र क्रांती बुद्धेवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे.

यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने देगलूर वन परिक्षेत्राचे वनाअधिकारी माधव केंद्रे यांच्याशी संपर्क साधला. हरणांचे कळप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची नासधुस करत असल्याचे त्यांना सांगितले. यावर, "वन्य प्राण्यांनी अशाप्रकारे शेतात जाऊन जर पिकांचे नुकसान केले असेल, वनविभाग शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देते. आता या भागातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतात हऱणांनी नासधुस केली आहे, अशा शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळू शकतो. त्यासाठी या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीचा मोबदला मिळवण्यासाठी वनविभागाकडे अर्ज करावा, शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.

मानव आणि वन्यप्राणी यांचा संघर्ष हा तसा जुना आहे. दिवसेंदिवस जंगलं कमी होत आहेत. वातावरणात बदल होत आहेत. तापमान वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर प्राण्यांना पाणी आणि खाद्यासाठी मानवी वस्तीकडे वळावे लागल्याचे वारंवार समोर आले आहे. या वन्यप्राण्यांचे मानवी वस्त्यांकडे होणारे स्थलांतर जर रोखायचे असेल तर त्यासाठी काही गोष्टी करता येऊ शकतात. जंगलाच्या परिसरातच कृत्रिम पाणवठे तयार करता येऊ शकतात. हे कृत्रिम पाणवठे आणि जंगलातील नैसर्गिक पाणवठे या दोन्हीमध्ये प्राण्यांकरीता पाणी राहिल याची दक्षता घेतली पाहिजे, असेही मत तज्ज्ञ व्यक्त करतात. यासाठी वन विभागाला पुढाकार घेणे आवश्यक आहे. अनेकदा पाण्याच्या शोधासाठी या प्राण्यांना मानवी वस्तीकडे यावे लागते, यात अनेक प्राण्यांचा अपघाती मृत्यूसुद्दा होतो. काही प्राण्यांचा तर रस्ते ओलांडताना मृत्यू झाल्याचे प्रकार घडले आहेत.

Full View

शिकाऱ्यांचाही धोका

हरणांसाऱखी सुंदर प्राणी जेव्हा अशाप्रकारे शेतांमध्ये फिरु लागतात तेव्हा त्यांच्या शिकारीचाही मोठा धोका असतो. अजूनही हरणांची शिकार करणारे अनेक जण असतात. त्यांना जर अशाप्रकारे मोकळेपणाने फिरणारी हरणं दिसली तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे वनविभागाने यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही आणि हरणांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकणार नाही, अशी पावले उचलण्याची गरज आहे.

वन्यप्राण्यांनी नुकसान केल्यास भरपाई मिळते याबद्दल शेतकऱ्यांना माहिती देणेसुद्धा गरजेचे आहे. वन्यप्राण्यांनी शेतातील पिकांचे नुकसान केल्यास काही अटींच्या आणि निकषांच्या आधारे कारवाई केली जाते. यामध्ये पिकांनुसार भरपाई दिली जाते, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधन मृत्यूमुखी पडले तरी भरपाई मिळते. पशुधनाच्या बाजारभावानुसार ही भरपाई ठरत असते.

Tags:    

Similar News