बेरोजगारीवर मात करत पती पत्नीने सुरू केला जैविक गांडूळ खताचा प्रकल्प...
वाशिम जिल्ह्यामधील रिसोड या तालुक्यामध्ये असणारे गोभणी हे छोटेसे खेडेगाव याच गावांमधील योगेश सुभाषराव गारडे या युवा शेतकरी तरुणाने समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. आपली परिस्थिती मध्यमवर्गीय असल्यामुळे आणि दुसरीकडे महाराष्ट्रच नव्हे तर देशात सध्या तरुणाईपुढे बेरोजगारीचं मोठं संकट उभा आहे. अशा परिस्थितीत या सुशिक्षित बेरोजगार तरूणाने आपल्या परिसरातील तरुणांसमोर शेती सोबतच जोड धंद्याचा नवीन आदर्श ठेवला आहे. 12 वी सायन्स नंतर बी.ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या योगेशने पुढे नोकरीसाठी संघर्ष केला. मात्र, नोकरी मिळाली नाही. मात्र, त्या प्रश्नावर मात करत योगेश ने आपल्या पत्नीच्या साहाय्याने जिद्दीच्या बळावर वाशिम जिल्ह्यामधील सर्वात मोठा जैविक गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. मात्र, आज शेतकरी रासायनिक शेतीला अधिक महत्त्व देताना पाहायला मिळतात. रासायनिक शेतीमुळे शेतीचा पोत कमी होत आहे आणि दुसरीकडे त्यात रासायनिक शेतीचा आपल्या जमिनीवरती देखील परिणाम होतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन योगेश ने या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले आहे.
सुरुवातीला दोन बेड पासुन सुरुवात करत त्याने जवळपास 45 बेड चा गांडुळ खत निर्मिती प्रकल्प उभा केला आहे. हा प्रकल्प उभा करायला त्यांना जवळपास 6 लाखापर्यंत खर्च आला आहे, या प्रकल्पातून दर सहा महिन्याला 1 लाख रुपये निव्वळ नफा या प्रकल्पाच्या माध्यमातून अपेक्षित आहे. .त् या प्रकल्पासंदर्भात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील जैविक शेती mission चे कृषी तज्ज्ञ प्रशिक्षक संजय मांडवगडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
योगेश चा हा प्रकल्प वाशिम जिल्ह्यामधील सर्वात मोठा जैविक गांडूळ खत प्रकल्प आहे. शेतकरी बांधवांना या प्रकल्पाचा निश्चितच फायदा होण्यासारखा हा प्रकल्प आहे. रासायनिक शेतीमुळे आपल्या जमिनीचा ऱ्हास होण्याची दाट शक्यता असते. परंतू सेंद्रिय शेतीमुळे जमीन सुपीक राहते आणि त्याचा परिणाम शेतकरी बांधवांच्या उत्पादनावर होऊन सेंद्रिय शेतीमुळे शेतकरी बांधवांना अधिक उत्पादन मिळू शकते.
अकोला कृषी विद्यापीठामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून काम पाहणारे संजय मांडवगडे सांगतात…
योगेश च्या प्रकल्पाच्या सुरुवातीपासून मी सातत्याने या प्रकल्पाची पाहणी करत आलो आहे आणि योगेश प्रकल्पातून तयार झालेले गांडूळ खत हे शेतीसाठी अतिशय पूरक आहे आणि शेतकऱ्यांनी ते वापरण्यास अजिबात हरकत नाही. असे संजय मांडवगडे यांनी Max Maharashtra शी बोलताना सांगितले.