झोमॅटोची जाहिरात आणि नवहिंदूत्ववाद्यांच्या भावना
झोमॅटोच्या जाहिरातीवरून निर्माण झालेला वाद काय आहे? तसेच यातून महाकालचा अपमान झाला आहे का? याविषयीचे विश्लेषण केले आहे सामाजिक कार्यकर्ते राज असरोंडकर यांनी...;
झोमॅटोच्या एका जाहिरातीवरून विवाद सुरू आहे. नेहमीप्रमाणे झोमॅटोवर हिंदुत्ववाद्यांनी बहिष्काराचं हत्यारही उपसलं आहे. सोबतच अभिनेता ऋतिक रोशन यालाही लक्ष्य करण्यात आलं आहे.
जाहिरातीत ऋतिक रोशनने उज्जैनमधील महाकाल हॉटेलातून थाळी मागवलेली आहे. त्याच्या साथीदारांना हे माहीत नसतं. झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय पुढ्यात येऊन उभा राहतो, तेव्हा ऋतिक रोशन सांगतो की भूक लागली होती, आपण उज्जैनमध्ये आहोत, मी महाकालकडून थाळी मागवून घेतलीय.
उज्जैनमधलं महाकाल हॉटेल झोमॅटोच्या यादीत आहे. तिथल्या जेवणाची मोठी मागणी आहे आणि तिथली थाळीही लोकांच्या सर्वाधिक पसंतीवर आहे.
झोमॅटो भारतातील वेगवेगळ्या भागातील अशी चर्चेतील हॉटेलं आणि तिथले खाद्यपदार्थ यांची जाहिरात करत आहे. त्यात स्थानिक महत्वाचे संदर्भ येणं स्वाभाविक आहे. या जाहिराती आणि त्यातून व्यवसाय वाढवणं एकप्रकारे अर्थव्यवस्थेला चालना देणारं असतं. पण हे धर्मांधांना कोण सांगणार?
झोमॅटोने जाहिरातीत उज्जैनमध्ये महाकाल हॉटेल आता संदर्भ घेतला. मात्र उज्जैनमध्येच महाकालेश्वर मंदिर आहे. मंदिराने ती जाहिरात स्वतःवर ओढवून घेतली. तिथल्या पुजाऱ्यांनी संताप व्यक्त केला. झोमॅटोला माफी मागायला सांगितली. झोमॅटोने आम्ही हॉटेलबद्दल बोलतोय, असं सांगून माफी मागितलीही. नेहमीप्रमाणे जाहिरातही मागे घेतली. तोवर देशभरात कित्येक हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.
उज्जैनमधील अनेक हॉटेलांची किंवा आस्थापनांची नावं महाकालवरून असू शकतात. बोलीभाषेत त्यांचा उल्लेख येऊ शकतो. तो प्रत्येक उल्लेख मंदिराने ओढवून घेतला तर स्थानिक व्यावसायिकांची मोठी मुश्कील होऊन शकते.
केवळ उज्जैनच नाही तर देशभरात देवादिकांची नावं दिलेली अनेक हॉटेलं, ढाबे, व्यवसाय आहेत. शत्रुत्व काढण्यासाठी कोणालाही कोणीही भावना दुखावल्या म्हणून संकटात आणू शकतं. कुठे श्रीकृष्ण बटाटावडा आहे, कुठे स्वामी समर्थ भोजनालय आहे. लोक बोलताना सहज बोलतात, आज स्वामीत करूया पार्टी ! यानेही पुढे कोणाच्याही सोयिस्कररित्या भावना दुखावू शकतात.
महाकाल ही देवता असल्याने ऐनवेळी आपण संकटात कोणाला हाक मारू शकतो. भूक लागल्यावर अन्नासाठी कोणाला साकडं घालू शकतो तर परमेश्वरालाच. जाहिरातीत तोही संदर्भ घेतलेला असावा. खऱ्या श्रद्धाळूंना तो जाणवला असता, परंतु नवहिंदुत्ववाद्यांना त्यात महाकालचा अपमानच दिसला.
२०१४ नंतर केंद्रात भाजपाचं सरकार आल्यापासून भारतातले हिंदू हे कधी नाही इतके मानसिकदृष्ट्या असुरक्षित झालेले आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीत स्वतःवरच संकट, अपमान, दुय्यम वागणूक, घातपात वगैरे वगैरे गोष्टी दिसतात.
लोकांची ही भयभीत मानसिकता बनवण्यात भाजपासारख्या संघटनांचं राजकारण भलतंच सफल झालेलं दिसतं. या राजकारणाचा फटका कलासाहित्यचित्रपटच नव्हे तर एकूणच जनजीवनाला पडलेला आहे. झोमॅटोची ताजी जाहिरात हे आणखी एक नवं उदाहरण आहे. भारताचा हा प्रवास नेमका कुठे जाणार आहे हे आज सांगता येत नसलं तरी तो घसरणीवर लागलेला आहे एवढा मात्र नक्की.