Zomato ची 10 मिनिटात डिलिव्हरी देणं शक्य आहे का?
झोमॅटो ने 10 मिनिटात ग्राहकांना खाद्य पदार्थ पोहोचू. अशी घोषणा केली आहे. मात्र, हे खरंच शक्य आहे का? यामध्ये डिलिव्हरी बॅाय वर किती ताण पडेल याचा कंपनीने विचार केला नसेल का? वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचे विश्लेषण
अबे "झोमाट्या" दीपिंदर गोयल…
जी चिकन बिर्याणी (किंवा कोणतीही डिश) तू खाण्याकडे १० मिनिटात पोचवू बघतोस ती काय कोणत्या इस्पितळात हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायचे हृदय आहे काय ?
ऑर्डर दिल्यानंतर दहा मिनिटात ग्राहकाला पदार्थ पोहोचवण्याची महत्त्वाकांक्षी (माय फूट ) योजना झोमॅटोचे प्रवर्तक दीपिंदर गोयल यांनी जाहीर केली ; बराच गदारोळ उठल्यावर आता त्यात काही बदल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुद्दा अधिक मूलभूत आहे…
जगातून वाहत येणाऱ्या शेकडो कोटी डॉलर्सच्या प्रायव्हेट इक्विटी / व्हेंचर कॅपिटल भांडवलामुळे अनेक नवउद्यमी बहकले आहेत; साऱ्या आर्थिक जगाचे नियम आपण भांडवलाच्या जोरावर बदलू शकतो ही त्यांची राजकीय / आर्थिक आकांक्षा आहे.
या लोकांनी कधी शहरी नियोजनाबद्दल ब्र काढला नाहीये. या लोकांनी एकंदरच पायाभूत सुविधा बद्दल अनभिज्ञानता दाखवली आहे. या लोकांनी कधी शहरातील वाहतूक / सतत वाढणारी वाहनांची संख्या याबद्दल विचार केलेला नाही. या लोकांनी रस्त्यावरील गंभीर आणि लाखो लोकांना जखमी करणाऱ्या अपघाताबद्दल काळजी व्यक्त केलेली नाही.
१० मिनिटात पदार्थ पोचवणार कोणाच्या जीवावर ?
इतरत्र रोजगार मिळत नाहीत म्हणून डिलिव्हरी बॉय च्या वाढत्या सैन्यात सामील होणाऱ्या तरुणांच्या जीवावर. आपली मिळालेली नोकरी जाऊ नये म्हणून, काही बोनस पॉईंट्स मिळावेत म्हणून, पगार किती डिलिव्हरी केल्या त्याप्रमाणात मिळणार असल्यामुळे दिवसभरात जास्तीतजास्त डिलिव्हरी करणार म्हणून, अनेक ठिकाणी लिफ्ट नसते, असली तरी वापरायला बंदी असते तेथे धाप लागेपर्यंत पोचायचे म्हणून…
आणि हे सगळे करतांना हे तरुण डिलिव्हरी बॉईज शहरातील आधीच अराजकवादी वाहतूकतीत आपल्या वेगाने इतरांमध्ये, रास्ता ओलांडणाऱ्या म्हाताऱ्या, लहान मुलांमध्ये, त्यांच्या नकळत, दहशत माजवणार…
झोमॅटो ने या १० मिनिटात डिलिव्हरी योजनेतील रिस्क फॅक्टर्स काढले असणार; जास्तीतजास्त काय होईल डिलिव्हरी बॉईजना अपघात होईल? एखाद्यावेळी मरण येईल, राईट? कंपनी देईल ना त्यांना नुकसानभरपाई, अशी कितीशी किंमत असते मानवी जीवाची / जायबंदी, मोडलेल्या अवयवाची ती भारतासारख्या देशात ? आम्ही देतो ना ! या व अशा प्रकारच्या विचारातून जागतिक कॉर्पोरेट भांडवलाच्या स्वस्त मजुरीवर आणि कमी किंमतीच्या मानवी आयुष्यावर आधारित फॅन्सी महत्वाकांक्षा फक्त लख्ख दिसतात.