फॅसिस्टांचे फंडे नीट समजून घ्या... तुषार गायकवाड
सन २०१४ आणि सन २०१९ सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत आपण जे पेरले आहे तेच उगवत आहे. आता फळ कडू लागतंय म्हणून नाकं मुरडून चालणार नाही. सरकार सांगेल ते ऐकण्याची गुमान तयारी ठेवा, अन्यथा तुमचे तेच हाल होणार आहेत जे आजवरच्या फॅसिस्टांनी कम्युनिस्टांचे केले सांगतातहेत लेखक तुषार गायकवाड..;
जर्मनीत फॅसिस्ट महाशक्तीचा सुर्योदय झाला तेव्हाच नाझींनी जर्मनीतील कम्युनिस्टांना संपवायला घेतले होते. केवळ जर्मनीतील कम्युनिस्टच नव्हे तर, संपूर्ण जगातील कम्युनिस्ट व सोव्हिएत युनियनला पूर्णतः संपवण्याचा हिटलरचा मानस होता. त्यासाठी जर्मनीतील कम्युनिस्टांचा खातमा करण्यासोबतच जर्मनीतील सर्व मोठ्या उद्योगपतींशी त्याच्या नाझी या फॅसिस्ट पक्षाने सोयरीक जमवली होती.
हिटलरची धोरणे व धोका कम्युनिस्टांनी जर्मन वासियांना वारंवार सांगूनही जर्मन वासियांना फॅसिस्ट नाझीवादाचा धोका लक्षात आला नाही. हिटलरच्या अगोदर इटलीच्या फॅसिस्ट बेनिटो मुसोलिनीने इटलीतील कम्युनिस्टांचा खात्मा केला होता. कम्युनिस्टांचा निपटारा करण्यासाठी जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन शहरातील संसदेला नाझींनी आग लावली आणि आळ कम्युनिस्टांवर घेतला.
पण पुढे जर्मनीतील हजारों कम्युनिस्टांचे शिरकाण झाले. कम्युनिस्टांचे शिरकाण होत असताना जर्मनीतील इतर सर्व घटक कामगार संघटना, कामगार नेते, समाजवादी, विचारवंत, लोकशाही मानणारे नागरिक आदी घटक शांत होते. नंतर एकामागून एकाचा नंबर लागतच राहिला. पण कम्युनिस्टांचा नंबर लागला तेव्हा इतर सर्व घटक 'आपण कम्युनिस्ट नाही' म्हणत दुरुन नंगानाच पहात होते.
भारतीय लोकशाहीची सामाजिक स्थिती नेमकी अश्याच धोकादायक वळणावर आहे. तीन काळे कृषी कायदे आणून केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना अदानी, अंबानी सारख्या उद्योगपतींच्या दावणीला कायदेशीर गुलाम म्हणून बांधण्याची तरतूद केली होती. तेव्हा 'आपण शेतकरी नाही' म्हणत उर्वरित सर्व घटक दुरुन मूक संमती देवून नंगानाच पहात होते. अगदी महाराष्ट्रातील मविआ मधील प्रादेशिक पक्षसुद्धा!
त्याचवेळी इथून पुढे प्रत्येक घटकाला अशाच कायदेशीर गुलामगिरीत ढकलले जाणार असल्याची खात्री झाली होती. पण शेतकरी वगळता एकाही घटकाने आरपारची लढाई करण्याची तयारी दर्शविली नाही. सत्ताधारी भाजपा पक्ष हा कायदेशीर नोंदणीनुसार जरी सेक्युलर आणि लोकशाहीवादी असला तरी त्यांची विचारधारा अनोंदणीकृत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या फॅसिस्ट विचारांवरच वाटचाल करते.
आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फॅसिस्ट आहे याचे पुरावे संघाचे बायबल लिहिणाऱ्या सरसंघचालक गोळवलकर यांच्या लिखाणातून मिळतात. गोळवलकरांनी लिहिलेल्या 'वी ऑर अवर नेशनहूड डिफाइण्ड' या पुस्तकात कम्युनिस्ट, ज्यू यांच्या हत्यांबाबत हिटलरचे कौतुक केले आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना इटलीच्या बेनिटो मुसोलिनीच्या बलिल्ला या फॅसिस्ट संघटनेच्या धर्तीवर करण्यात आल्याचे सुतोवाच संघ संस्थापकांपैकी एक डॉ. बी. एस. मुंजे यांनी केलेले आहे.
शेतकरी आंदोलना दरम्यान ज्याप्रमाणे जर्मन, इटलीच्या फॅसिस्टांनी कम्युनिस्टांना बदनाम करुन संपवले. त्याचप्रमाणे आंदोलनातील शेतकऱ्यांना संपवण्यासाठी सर्व प्रपोगंडे राबवून झाले. पण शेतकऱ्यांच्यात सहभागी 'शहिद ए आजम भगतसिंह' आणि 'महात्मा गांधी' यांच्या अहिंसक सत्याग्रहापुढे फॅसिस्टांना झुकावे लागले. तेव्हाही देशातील सर्व घटक तमाशा पाहत होते.
शेतकरी आंदोलनातून महाराष्ट्र एस.टी बस कर्मचार्यांनी अक्कल घेतली नाही. राज्यातील फॅसिस्टांना एस.टी महामंडळाच्या संभाव्य खाजगीकरणासाठी आधीच तोट्यात असलेले महामंडळ अजून तोट्यात न्यायचे होते. शिवाय प्रस्थापित कर्मचारी संघटनांचे नेतृत्व संपवायचे होते. हा उद्देश एस. टी कर्मचारी आंदोलनात सफल झाला आहे. एका भंपक वकिलाच्या नादी लागून एस. टी कर्मचाऱ्यांनी महामंडळ तोट्यात तर नेलेच, शिवाय विलीनीकरण मुद्दांवर कायदेशीर कुलूप ठोकले. आज रोजी हेच कर्मचारी पी. एफ. च्या पैशासाठी मोहताज झालेत.
असाच पॅटर्न मराठा क्रांती मोर्चात घुसून फॅसिस्टांनी राबवला. प्रस्थापित मराठा समाजाचे नेते बाजूला करुन चुकीच्या लोकांना नेतृत्व दिले. आजरोजी त्या नेतृत्व करणाऱ्यांपैकी अनेकजण संघाची उघड बाजू घेताना दिसतात. शिवाय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आरक्षण कोर्टात नेऊन आरक्षणाची शक्यताच धूसर करुन ठेवली. पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष, नितीशकुमार यांचा जनता दल, अकाली दल, शिवसेना, रासपा, मेटेंचा शिवसंग्राम, शेतकरी संघटना व अन्य शेकडो राजकीय पक्ष व संघटना भाजपसोबत गेल्या. आज त्या सर्वांची अवस्था काय आहे? ८ वर्षांपूर्वी या पक्षांच्या नेत्यांची भाषा काय होती? आज काय आहे? हे साधं राजकारण कळू शकत नसेल एवढे मूर्ख शिंदे गटाचे आमदार खासदार आणि महावितरण कंपनीचे कर्मचारी नसावेत!
तरीदेखील या कर्मचाऱ्यांनी देशात फॅसिस्टांची अनागोंदी सुरु असताना गप्प बसणे पसंद केले. आता महावितरणचा नंबर लागला आहे. आत्ता जे गप्प बसणार आहेत त्यांचाही नंबर लागणारच आहे! राजकीय पक्षांचे काही अडत नाही लोकहो, ते केव्हाही झूल बदलून फॅसिस्टांचे पायदळ होऊ शकतात. आपला विचार त्यांना नसतो. आपला विचार आपण करायचा असतो. सन २०१४ आणि सन २०१९ सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत आपण जे पेरले आहे तेच उगवत आहे. आता फळ कडू लागतंय म्हणून नाकं मुरडून चालणार नाही. सरकार सांगेल ते ऐकण्याची गुमान तयारी ठेवा, अन्यथा तुमचे तेच हाल होणार आहेत जे आजवरच्या फॅसिस्टांनी कम्युनिस्टांचे केले.
मग आजचा संप कशासाठी? तर वीज कर्मचारी संघटनांमध्ये फॅसिस्ट स्वयंसेवक घुसवून प्रस्थापित संघटनांचे नेतृत्व हायजॅक करुन महापारेषण विकणे सुलभ करण्यासाठी! हा संप खरोखरच यशस्वी करुन मागण्या मान्य करायच्या असत्या तर संपकरी शेतकऱ्यांप्रमाणेच सत्याग्रहाच्या मार्गाने गेले असते. असे आमचे प्रामाणिक मत आहे. तत्कालीन मविआ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अकार्यक्षम दाखवण्यासाठी एस.टी कर्मचारी संप जसा महत्त्वाचा होता. तसेच शिंदे गटाचा जनमताचा काटा काढण्यासाठी मार्ड, महावितरण असे संप आवश्यक आहेत. त्याआडून संघटनेतील प्रस्थापित नेतृत्व करणाऱ्यांना हटवणे वा विकत घेणे सोपे होते. 'आपण वीज कर्मचारी नाही' असा विचार करणाऱ्यांनी पुढील आपत्तीसाठी तयार रहा.
तुषार गायकवाड