बलाढ्य सत्ताधीशांना पराभूत करण्यासाठी…!

यशवतंराव चव्हाण यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या आईने काय उद्गार काढले? वाचा इंग्रजांसमोर नतमस्तक न झालेले यशवंतराव... ज्येष्ठ पत्रकार Sanjay Awate यांचा लेख;

Update: 2020-10-27 04:48 GMT

यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा तुरूंगात गेले, तेव्हा ते उण्यापु-या अठरा वर्षांचे होते. झेंडावंदन केले आणि 'वंदे मातरम्' म्हटल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यासाठी त्यांना दीड वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली.

येरवडा तुरुंग हे विद्यापीठच होते.

त्यातील एक प्रसंग फार बोलका आहे.

आचार्य भागवत हे विद्वान गृहस्थ. तेही तुरूंगात होते. या नव्या मुलांना ते नवे काही दररोज शिकवत.

एकदा बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकरांचा उल्लेख झाला. त्यावर भागवतांनी सावरकरांच्या वैचारिक भूमिकेवर सडकून टीका केली. त्यांच्या हिंदुत्वावर देश उभा करणे म्हणजे विनाशाला आमंत्रण असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुत्वाचा सावरकरांचा विचार किती प्रतिगामी आहे आणि त्यामुळे देश कसा दुभंगेल, हे सांगत भागवतांनी सावरकरांवर हल्ला चढवला.

त्याचवेळी कोणीतरी सावरकरांच्या साहित्याचा विषय काढला. मग मात्र, भागवत हळवे झाले. 'कवी सावरकर मला अत्यंत प्रिय आहेत', एवढं सांगून ते गप्प बसले नाहीत. तर, 'गोमंतक' आणि 'कमला' या काव्यांचे त्यांनी प्रकट वाचन सुरू केले. पुढे काही दिवस आचार्य या मुलांना सावरकरांच्या कवितेचा आस्वाद घ्यायला शिकवत होते.

मुद्दा असा की, कोणालाही व्यक्तिगत विरोध वा विखार याला स्वातंत्र्य चळवळीत थारा नव्हता. अगदी इंग्रजांनाही व्यक्तिगत अंगाने विरोध नव्हता. एखाद्या जुलमी इंग्रज अधिका-यावर सुद्धा केली जाणारी व्यक्तिगत विखारी टीका गांधीजींना मान्य नसे.

लढाई मूल्यांची होते, तेव्हा ती अशी थोर होते!


आणखी मजा पाहा.

यशवंतरावांची आई तशी साधी बाई. नव-याच्या मागं पोरांना एकटीनं वाढवलेली. पोरांनी शिकावं, आपले पांग फेडावेत, असं वाटणारी.

मॅट्रिकला असतानाच यशवंतरावांना अटक झाल्यावर ती त्यांना भेटायला पोलिस कोठडीत गेली, तेव्हा कोणीतरी सुचवलं, माफी मागा. म्हणजे शिक्षा रद्द होईल.'

त्यावर ती खेडूत बाई म्हणाली, "छे! माफी कशासाठी? चूक काय केली त्यानं? देव त्याच्या पाठीशी आहे."

त्या माऊलीला राजकारण काही कळत नव्हतं. पण, गांधीजींसारख्या माणसासोबत पोरगा काम करतोय, म्हणजे काहीतरी चांगलंच काम करतोय, तिच्या भाषेत पुण्याचं काम करतोय, याची तिला खात्री होती. दूर कशाला, यशवंतरावांचे भाऊ इंग्रज दरबारी नोकरी करत होते. पण, तेही गांधींसोबतच होते.

राजा बदलतो. राज्य बदलतं. नव्या राजाशी जुळवून घेत आपला रोजचा दिवस साजरा करायचा, अशी इथल्या समाजाची तोवरची स्थितिशील सवय.

तिथल्या सामान्य माणसाला, माय-माऊलींना गांधींनी सत्य, अहिंसा आणि प्रेमाचा धर्म सांगत, अंगभूत सामर्थ्यानिशी असे उभे केले की, बलाढ्य इंग्रजांनाही पळता भुई थोडी झाली.

व्यवस्थेच्या विरोधात लढताना हे सूत्र आपण लक्षात घ्यायला हवे.

(संदर्भ : 'कृष्णाकाठ': यशवंतराव चव्हाण)

- संजय आवटे

Tags:    

Similar News