ज्यांनी प्रेम केले त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे!

पुरस्कार वापसीची सुरुवात करणारे प्रसिद्ध लेखक उदय प्रकाश यांनी राम मंदिराला देणगी दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना सवाल केले जात आहेत. त्यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न...;

Update: 2021-02-05 15:59 GMT

प्रसिद्ध लेखक उदय प्रकाश यांनी राम मंदिरासाठी देणगी दिल्यामुळे सर्वत्र चर्चा होते आहे. त्यांना विरोध करणाऱ्या व्यक्तींना प्रतिगामी, एककल्ली वृत्तीचे ठरवले जात आहे व उदय प्रकाश यांचे व्यक्तीस्वातंत्र्य मान्य करा. राम मंदिराला देणगी देणे गुन्हा आहे का? असे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. परंतू या निमित्ताने उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी.

१) उदय प्रकाश यांनी माणूस बदलू शकतो. त्याप्रमाणे माझी भूमिका बदलली आहे. असे तर्कशुद्ध स्पष्टीकरण दिले असते तर आक्षेप घेण्याचे कोणतेच कारण नव्हते. परंतू केवळ हे दान आहे. अशा दोन ओळी लिहून ती पावती टाकली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद वाटते आहे.

२) उदय प्रकाश यांनी 6 डिसेंबर 1992 ला झालेल्या हिंसाचारानंतर व्यथित होऊन कविता लिहिली होती ती अशी

6 दिसंबर 1992....

स्मृति के घने, गाढ़े धुएं

और सालों से गर्म राख में

लगातार सुलगता कोई अंगार है

घुटने की असहय गांठ है

या रीढ़ में रेंगता धीरे-धीरे कोई दर्द

जाड़े के दिनों में जो और जाग जाता है

अपनी हजार सुइयों के डंक के साथ

दिसंबर का छठवां दिन"

केवळ ही कविता लिहून ते थाम्बले नाहीत तर

6 दिसंबर की घटना से काफी आहत हुआ था. राम किसी लेखन और धर्म से पहले के हैं और उन्हें किसी कस्बे या जिले तक सीमित नहीं किया जा सकता. रामायण को कई लोगों ने और कई तरह से लिखा है जिनके अलग-अलग दृष्टिकोन रहे हैं. राम को किसी एक दृष्टिकोन से नहीं देखा जा सकता और न ही किसी एक जगह के वो हो सकते हैं

अशी प्रतिक्रिया दिली होती. अशी समाजाच्या भूमिकेचे वेदनेचे प्रातिनिधिक रूप घेणारा लेखक जेव्हा उलट्या दिशेने क्षणात प्रवास सुरू करतो. तेव्हा ते नक्कीच धक्कादायक असते.

३) राम मंदिराला देणगी देणे हे केवळ धार्मिक देणगी देणे इतकेच नाही. तर राम मंदिर उभारण्याचा आग्रह ज्या आक्रमक हिंदुत्वाच्या भावनेतून येतो आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या कडे बघितले पाहिजे. गावातील एखादे मंदिर उभारणे आणि बाबरी मशीद पाडणे, त्यानंतरच्या दंगलीत दोन हजार व्यक्तींचा मृत्यू, त्यानंतर सरकार पाडणे आणि देशातील सर्व जगण्याचे प्रश्न दूर सारून केवळ धार्मिक ध्रुवीकरण यावर देशाची १० वर्षे वाया जाणे आणि आता पुन्हा तोच धार्मिक केंद्रीकरण करण्याचा प्रयोग सुरू करणे. अशा पार्श्वभूमीवर मंदिर निर्माण आणि देणगी संकलन याकडे बघायला हवे.

४) तेव्हा देणगी देणे याचा अर्थ ६ डिसेंबर पूर्वीचा उन्माद आणि नंतरचे राजकारण याची तुम्ही समर्थक आहात असा होतो आणि उदय प्रकाश यांनी अखलाख याची समूहाने हत्या केल्यानंतर पुरस्कार वापसी ची सुरुवात केली होती.

५) अखलाक याची हत्या करणारी आणि बाबरी पाडून नंतर दंगलीतील मानसिकता एकच होती. उदय प्रकाश दोन्हीमध्ये नेमका कसा फरक करतात ते त्यांनी स्पष्ट करायला हवे. हा खरा मुद्दा आहे.

६) विज्ञानाचे पदवीधर असलेले उदय प्रकाश यांनी 5400 अशी odd रक्कम का दिली यावर स्पष्टीकरण देताना पंडितजींनी त्यांना 9 अंक शुभ सांगितला आहे आणि पाच आणि चार ची बेरीज 9 होते असे हास्यास्पद आणि संतापजनक स्पष्टीकरण दिले आहे. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या एका बुद्धिवादी व्यक्तीने असे बोलणे कितपत योग्य आहे?

७) जेव्हा तुम्ही एखाद्या विचारसरणीच्या आधारे तुम्ही काही लेखन करता, कृती करता व त्या आधारित समाज तुम्हाला प्रेम देतो. तेव्हा तुमच्यावर ती विचारसरणी सोडताना तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना विश्वासात घेऊन स्पष्टीकरण देणे अपेक्षित असते. ते काहीही न करता केवळ तुम्ही एक पावती फेसबुक वर टाकून दानधर्म केला असे लिहणार असाल तर तुमच्यावर प्रेम करणारे लोक नक्कीच व्यथित होणार, तुमच्यावर संशय घेणार यामध्ये काहीही गैर नाही.

तेव्हा उदय प्रकाश यांनी त्यांच्या दृष्टिकोनात हा बदल का झाला? हे तार्किक पातळीवर स्पष्ट करायला हवे समाजाचा आदर घेतलेल्या व्यक्तीने किंवा मनात आले म्हणून भूमिका बदलायची आणि आपण मात्र, त्या व्यक्तीवर टीका न करता त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर टीका करायची हे योग्य नाही ज्यांनी प्रेम केले त्यांना जाब विचारण्याचा नक्कीच अधिकार आहे.

- हेरंब कुलकर्णी

Tags:    

Similar News