बापसत्तेच्या पोटीच बलात्कार संभवलाय: मुग्धा कर्णिक
Women rape and mans mind set analysis by Mugdha Karnik;
२०१८मध्ये बलात्कारांविषयी बोलताना भाजप खासदार किरण खेर म्हणाल्या होत्या की 'बलात्कार होणं काही नवीन नाही. हे गेली अनेक वर्षं होत आलं आहे. ही बलात्कार-संस्कृती थांबवायची असेल तर आपल्याला आपली मानसिकता बदलली पाहिजे'.का
ही मूर्ख लोकांनी हे विधान फिरवाफिरवी करून भारताची संस्कृती बलात्काराची आहे. असं त्या म्हणाल्याचं फिरवायला सुरुवात केली. किरण खेर भाजपच्या आहेत. म्हणून हा दुष्टावा कुणीतरी केला आहे. जे त्या म्हणालेल्या नाहीत ते त्यांच्या तोंडी घालून दोन वर्षांपूर्वीचं ते विधान पुन्हा फिरवायला सुरुवात केली आहे. हे निषेधार्ह आहे.
आता संस्कृती...
भारताच्या संस्कृतीत बलात्काराला मान्यता आहे असं म्हणणं चूक आहे. कारण संपूर्ण मानवी इतिहासातच स्त्रीवरील काय किंवा कुठल्याही दुर्बळ माणसांवरील बलात्कार होत आले आहेत. मान्यता ही राजमान्यता किंवा समाजमान्यता या पातळीवर वरकरणी मिळत नसेल. पण सारे अंतःप्रवाह तपासले तर अशा बलात्काराला, विशेषतः दुर्बळ स्त्रीवरील बलात्काराला सर्व अक्षांश-रेखांशाच्या जाळ्यात बापसत्तेची सौम्यशी मान्यता असते असे दिसेल.
जेत्यांच्या राजस्त्रिया अशा बलात्कारांपासून सुरक्षित होत्या. हरलेल्यांच्या राजस्त्रियाच नव्हे तर सामान्य वर्गातील स्त्रियाही त्याला बळी पडत. बलात्कार टाळण्यासाठी कधी प्रतिकार न करता स्वाधीन होणे किंवा संधी मिळाल्यास आत्महत्या करणे हेच दोन उपाय त्यांच्या हाती असत.
हरलेल्या पांडवांची स्त्री भर सभेत एकटी बलात्काऱ्यांशी झुंजत रहाते ही तर एक सर्वांना ठाऊक असलेली गोष्ट. पण ठाऊक नसलेल्या किती घटना इतिहासाच्या मातीत मिसळलेल्या असतील. त्यातूनच हे नवे विषकोंभ उगवत आले आहेत. अमेरिका खंडाला पादाक्रांत करणाऱ्या जेत्यांनी, आफ्रिका खंडाला लुटायला गेलेल्या लुटारूंनी तर तिथल्या सर्व दुर्बळांवर विविध प्रकारे बलात्कार केला.
इतर देशांत आपल्या वसाहती तयार करताना स्थानिक स्त्रियांशी जबरीने शारीरिक संबंध ठेवणे हे राजमान्य होते. पण त्यांच्याशी विवाह न करणेही राजमान्य होते. याचा इतिहास खूप मोठा आहे. फेसबुक पोस्ट मध्ये तो येणार नाही.
इथे थोडक्यात एवढंच म्हणजे बलात्काराच्या संस्कृतीला आई नाही, बाप आहे. बापसत्तेच्या पोटीच बलात्कार संभवला आहे. जेव्हा आपण आपल्या घरातील पुरुषाचा शब्द केवळ तो पुरुष लिंगधर आहे. म्हणून मान्य करत राहातो. तेव्हा आपण बापसत्तेच्या या संस्कृतीजन्य संततीला मान्यता देत असतो.
भारतातच नव्हे. जगभर. एकाच धर्मात नव्हे- सर्व धर्मांत. कारण सारे धर्म बापसत्तेचीच संतती आहेत. बलात्काराचे भावंड.
मानसिकता बदलायची असेल तर या भावंडांचा बापासह त्याग करावा लागेल.
अवघड आहे. अशक्य नाही. निदान छोट्याछोट्या कप्प्यांत तरी हा बदल होईल. आणि सर्व जगासाठी कधीतरी तीनचार शतकांनंतर होईल. पण बलात्कार भारतात होत नाहीत, इंडियात होतात म्हणणाऱ्यांच्या मठ्ठ अवलादींच्या काळात तो निश्चितच होणार नाही.