नरेंद्र मोदी-राहुल गांधींच्या भाषणानं मणिपूरची जखम भरेल का?

केवळ वक्तृत्वाच्या जोरावर नरेंद्र मोदींनी दोनवेळा लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवलंय, हे कुणीही नाकारणार नाही. लोकप्रिय भाषणं करून टाळ्या मिळवता येतात, मात्र, लोकांच्या मनात स्थान केवळ आणि केवळ प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविल्यानंच निर्माण करता येतं. त्यात सत्ताधाऱ्यांना ही संधी अधिक असते. वाचा मॅक्स महाराष्ट्रच्या प्रतिनिधी शिवानी पाटणे यांचा लोकसभेत भाषणाचा आढावा घेणारा लेख..........;

Update: 2023-08-12 12:34 GMT

केवळ वक्तृत्वाच्या जोरावर नरेंद्र मोदींनी दोनवेळा लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवलंय, हे कुणीही नाकारणार नाही. लोकप्रिय भाषणं करून टाळ्या मिळवता येतात, मात्र, लोकांच्या मनात स्थान केवळ आणि केवळ प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविल्यानंच निर्माण करता येतं. त्यात सत्ताधाऱ्यांना ही संधी अधिक असते. तर विरोधकांना ती संधी आक्रमक विरोधाच्या माध्यमातून सरकारला तसे निर्णय घेण्यास भाग पाडण्यातून असते. नरेंद्र मोदी यांचा सार्वजनिक जीवनातील अनुभव, अभ्यास आणि निसर्गदत्त लाभलेली वक्तृत्व शैली या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भरच घालतात. तर राहुल गांधी हे उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत आणि बऱ्यापैकी राजकारणाचा अनुभव असलेले नेते. त्यामुळं सातत्यानं या दोघांमध्ये तुलना होते.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कालच सुप वाजलं. या अधिवेशनाच मूड विरोधकांच्या I.N.D.I.A. ने आधीच स्पष्ट केला होता. त्यातच राहुल गांधी ‘मोदी’ वक्तव्यावरून दिलासा मिळाल्यानं त्यांना पुन्हा खासदारकी मिळाली आणि त्यांनी संसदीय कामकाजात सहभाग घेतला. विरोधकांनी मणिपूर हिंसाचाराच्या घटनेवर मोदींनी संसदेत भाष्य करण्याची मागणी पहिल्या दिवसापासूनच आक्रमकपणे लावून धरली होती. त्यातूनच मग सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला. आता ज्या राहुल गांधींनी मणिपूरचा मुद्दा अधिवेशनाच्या आधीपासूनच लावून धरला होता त्यामुळं त्यांचं भाषण ऐकण्याची सर्वांनाच उत्सुकता होती.

राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्ताववर ३७ मिनिटांचं भाषण केलं. या एकूण भाषणातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक वेळ हा राहुल गांधींनी मणिपूरच्या विषयालाच दिला. तर उर्वरित वेळ हा त्यांनी भारत जोडो यात्रेतील त्यांना आलेल्या अनुभवांना दिला. त्यामुळं राहुल यांच्याकडे मुद्द्यांची कमतरता होती, हे स्पष्ट आहेच. विशेष म्हणजे राहुल गांधी बोलत असतांना भाजपच्या खासदारांनी गोंधळ घालत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल गांधी हे संयमानं आपले मुद्दे सभागृहात मांडत होते. आधी मात्र असं होत नव्हतं. राहुल गांधी बोलायला लागले की भाजपचे खासदार त्यांना आक्रमकपणे विरोध करायचे, त्यामुळं राहुल गांधी अडखडत बोलायचे. अनेकदा याचा प्रत्यय आपण सोशल मीडियावर त्यांच्या अशा व्हिडिओ पाहून घेतलाय. मात्र, यावेळी राहुल गांधींना असा विरोध होईल याची कल्पना असावी त्यामुळंच त्यांनी भाजप खासदारांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करत संयमानं आपलं भाषण सुरूच ठेवलं. राहुल गांधींच्या भाषणाची सुरूवातच भारत जोडो यात्रेपासून सुरू झाली. त्यांनी जर थेट मणिपूरच्या विषयाला हात घालून त्याअनुषंगानं अन्याय-अत्याचाराच्या आकडेवारीची मांडणी करत भाषण आणखी अभ्यासपूर्ण करण्याची संधी होती. राहुल यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच अदानींच्या अनुषंगानं एक टोमणाही मारला. हा एक नवीन बदल राहुल यांच्या भाषणात बघायला मिळाला. केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली या वक्तव्यातून राहुल गांधींची आक्रमकता दिसली. राहुल गांधींच्या या भाषणाला सोशल मीडियावरही अनेकांनी पसंत केलंय. विशेष म्हणजे राहुल गांधी बोलत असतांना लोकसभेतील कॅमेरा हा त्यांच्याऐवजी अध्यक्ष आणि इतर सदस्यांवरच अधिक फिरवण्यात आल्याचं स्क्रीनवर स्पष्टपणे दिसत होतं.

दुसऱ्या दिवशी म्हणजे १० ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिलं. २ तास १३ मिनिटं मोदींनी भाषण केलं. मोदी दीर्घकाळ भाषण करू शकतात, हे पुन्हा एकदा यानिमित्तानं सिद्ध झालं. मोदींनी आपल्या या दीर्घभाषणातील सुरूवातीची ९० मिनिटं म्हणजे जवळपास अर्धातास मणिपूरच्या विषयाला हातच घातला नाही. त्यानंतर अवघी ४ मिनिटंच मोदींनी मणिपूर च्या घटनेवर वक्तव्यं केल्याचं तृणमुल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी सांगितलं. म्हणजे ज्या मुद्द्यावर हा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता, त्या मुळ विषयावर २ तास १३ मिनिटांच्या भाषणात फक्त ४ मिनिटं मोदींनी बोलावं यातच सर्वकाही आलंय. तर दुसरीकडे दीड तास झाला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरचा ‘म’ देखील बोलले नाहीत, त्यामुळं भ्रमनिरास झालेल्या विरोधकांनी सभागृहातून वॉक आऊट करण्याचा निर्णय़ घेतला. विरोधकांनी सभात्याग केल्याचं लक्षात येताच मोदींनी मग विरोधकांवर टीका केली. विरोधकांमध्ये ऐकून घेण्यासाठी संयम नाही, खोटं बोला आणि पळून जा असं विरोधकांचं झालंय, अशी टीका मोदींनी केली.

मोदींच्या एकूण भाषणात त्यांनी काँग्रेसनं भुतळाकात केलेल्या काही घटनांचा उल्लेख केला त्यात कच्चातिवू या भारत-श्रीलंका वादातील बेटाचा आणि मिझोरममधील बॉम्ब हल्ल्याच्या घटनेवर तपशीलवार पणे मुद्दे मांडले. यात त्यांनी इंदिरा गांधींनी ईशान्य-पूर्व कडील मिझोरममध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आपल्याच नागरिकांवर सैन्याकडून कसे हवाई बॉम्ब हल्ले केले होते, हे सांगण्याचा प्रयत्न केला. तर तामिळनाडूच्या ताब्यातील कच्चातिवू बेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी एका कराराद्वारे श्रीलंकेला कसं गिफ्ट केलं हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

खरं म्हणजे पंतप्रधान या नात्यानं मोदींनी ज्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्ताव आणला गेलाय त्यावरच अधिक भाषण करणं अपेक्षित होतं. मात्र, मोदींनी इतिहासाची पानं उलगडण्यातच अधिक धन्यता मानली. तर दुसरीकडे राहुल गांधींनी आपल्या ३७ मिनिटांच्या भाषणात विनाकारण भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला. एक गोष्ट तेवढीच खरी की त्यानंतर राहुल गांधींनी मणिपूरचा मुद्दा हा भाषण संपेपर्यंत सोडलाच नाही. मोदींना या अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून मणिपूरच्या मुद्द्यावर सरकारची प्रतिमा उंचावण्याची मोठी संधी चालून आली होती. मात्र, त्यांनीही ती संधी गमावली. नेहमीच्याच शैलीत त्यांनी विरोधकांवर टीका-टोमणे, टपल्या मारण्यावरच भर दिला. विरोधकांच्या आघाडीला इंडिया नाही तर घमेंडिया म्हणणं असो किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या कपड्यांचा काँग्रेसवाले कसा मजाक उडवत होते हा मुद्दा असो की विरोधक हे फेल प्रॉडक्ट बार-बार बेच रहे है, सारखे संवाद असो त्यांनीही मणिपूर सारख्या गंभीर, भावनिक, संवेदनशील विषयाचं गांभिर्यच घालवून टाकल्याचं जाणवलं.

त्यामुळं अविश्वास ठरावावर कुणाचं भाषण अधिक प्रभावी झालं याचा विचार केला तर राहुल गांधीं हे यावेळी मोदींना थोडे वरचढच ठरले यात शंका नाही. कुणाचं भाषण लांबलचक झालं, कुणाच्या भाषणावेळी टाळ्या पडल्या, सोशल मीडियावर कुणाला जास्त लाईक, शेअर, कमेंट्स मिळाल्या हा वेगळा मुद्दा आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांच्या भाषणातून मणिपूरच्या जनतेला काय मिळालं, हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण मणिपूरच्या काळजावर ‘त्या’ घटनेनं झालेली जखम जर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या भाषणानं भरून निघणार असेल तर या दोघांच्याही भाषणाला अर्थ आहे.

Tags:    

Similar News