तिच्या वेदनेची वाट कोणती?

सध्या जगभरातील महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने आंतरराष्ट्रीय माध्यमं प्रश्न उपस्थित करत असताना कोव्हिड नंतर विधवा झालेल्या महिलांच्या स्थितीबाबत आपले सरकार किती गंभीर आहे? या महिलांच्या समस्या सरकारने जाणून घेतल्या आहेत का? या सर्व समस्यांचा आढावा घेणारा मयुर बाळकृष्ण बागुल यांचा लेख;

Update: 2021-08-21 06:25 GMT

कोविड महासाथ हे मानव जातीवरील सर्वात मोठे संकट असल्याचे सिद्ध झाले आहे. कोविडच्या दुसर्‍या लाटेचा सर्वाधिक परिणाम स्त्रिया आणि लहान मुलांवर झालेला दिसून येतो आहे. देशात ३० हजार बालके अनाथ झाली आहेत. अनेक स्त्रिया विधवा झाल्या असल्याचे आकडे समोर येत आहे. केंद्र सरकारकडून किती स्त्रिया विधवा झाल्या आहेत किंवा किती लोकांनी कोविड महासाथीत त्यांचे जीवनाचे जोडीदार गमावले याची संपूर्ण आकडेवारी अजून समोर आलेली नाहीये. पण आपल्या आजूबाजूला अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तिला अकाली गमावले असल्याची विदारकता दिसत आहे.

कोविडमुळे विधवा झालेल्या स्त्रियांचे प्रश्न चिंताजनक आहेत. त्यात प्रामुख्याने जाणवलेल्या समस्या म्हणजे महामारीत एखाद्या विधवा स्त्रीला आजही समाजातील पुरुषी व्यवस्थेशी द्यावा लागणारा लढा हा भयावह आहे. त्यांच्या शारीरिक-मानसिक आरोग्याची होणारी हेळसांड, त्यांच्या मुलांचे प्रश्न, त्यांची आर्थिक, सामाजिक, भावनिक, लैंगिक शोषण यामुळे होणारी कुचंबणा आणि या साऱ्याला तोंड देत त्यांच मन मारून जगणं हे वास्तव समजून घ्यावे लागेल.

स्त्रियांना सासरी आणि माहेरी मिळणारी वागणूक, घरी-दारी मारले जाणारे टोमणे, घर आणि जमिनीचा नाकारला जाणारा हक्क, कुटूंब व्यवस्थेपर्यंत सगळीकडेच नाकारलं जाणारं स्थान, मुले असूनही निराधार जिणे जगणाऱ्या, वृद्धपकाळातील असह्य वेदना सहन करत जगणार्‍या स्त्रियाचं जगणं कोविडमुळे अजूनच वेदनादायी आणि अंधकारमय होतांना दिसत आहे.

समाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी सबलीकरणाचे अभियान राबविण्यास सुरुवात करतो; पण याच वेळी या समाजाला प्रश्न विचारावासा वाटतो, खरंच भारतातील महिला अबला आहेत का? ज्यामुळे आपण तिला सबला बनविण्याचा प्रयत्न करत आहात आणि खरंच महिलांचे सबलीकरण होते आहे का?

कोरोना काळात सरकारला कराव्या लागलेल्या टाळेबंदीमुळे शाळा, कॉलेजेस बंद झाली. त्याचा परिणाम म्हणून यंदा एकंदर महाराष्ट्रातच बालविवाहाचं प्रमाण वाढलं. ही आकडेवारी जरी उपलब्ध नसली तरी परिस्थिती आणि वास्तविक घटना आपण टाळू शकत नाही.

पूर्ण जगात भारत देश आपली संस्कृती, परंपरा, अध्यात्म्य व भौगोलिक विविधता यामुळे ओळखला जातो. ही नाण्याची एक बाजू झाली; पण हाच देश जगभर पुरुषप्रधान संस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे. तसे बघितले, त्याच वेळी याच भारत देशात महिला घरात आणि समाजात बंधनामध्ये अडकून पडल्या आहेत. त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांचे अधिकार व विकास यापासून त्यांना पूर्णपणे दूर केले जाते. तरीसुद्धा येथे स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी बोलल्या जातात. महिलांच्या स्वातंत्र्य व अधिकाराविषयी कळकळ व्यक्त केली जाते. असे असतानाही निर्भया कांड किंवा कोपर्डीसारख्या अमानुष अत्याचाराच्या घटना घडतात आणि अशा वेळी आपल्यासमोर महिलांचे प्रश्न बिकट समस्या बनून उभ्या राहतात. त्यावर उपचार म्हणून समाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी सबलीकरणाचे अभियान राबविण्यास सुरवात करतो; पण याच वेळी या समाजाला प्रश्न विचारावासा वाटतो, खरंच भारतातील महिला अबला आहेत का? ज्यामुळे आपण तिला सबला बनविण्याचा प्रयत्न करत आहात आणि खरंच महिलांचे सबलीकरण होते आहे का? या लेखाच्या निमित्ताने जेव्हा अनेक महिलांशी चर्चा केली, तेव्हा कुणीही सबलीकरण होते आहे हे मान्य केले नाही. असे का?

मुळातच भारतीय महिला ही कधी अबला नव्हतीच. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सहभाग असतो, असे येथे म्हटले जाते. किंबहुना या समाजात घडलेले अनेक महापुरुष स्त्रीमुळे घडले. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, मदर टेरेसा, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, पी. टी. उषा आणि इतरही अनेक कर्तृत्ववान महिलांनी या देशाचा नावलैकिक वाढविला आहे. राजमाता जिजाऊ होत्या म्हणून संस्कारमूर्ती व कीर्तिवंत छत्रपती शिवराय घडले. सावित्रीबाई फुलेंची साथ होती म्हणून जोतिबा फुले महात्मा झाले आणि इतकेच नव्हे, तर कौसल्यानंदन श्रीराम व अंजनीपुत्र हनुमान ही आपली देवप्रतीके स्त्रीच्या संस्काराचा आणि सृजनाचा आविष्कार आहे. मुळातच महिलांमध्ये निसर्गाकडून काही देणग्या पुरुषांपेक्षा जास्त आहेत. स्त्रीमध्ये सहनशीलता, नावीन्यता, सौंदर्याची जाणीव, बचत वृत्ती, संघप्रेरणा, स्मरणशक्ती हे गुण निसर्गतःच अधिक आहेत. स्त्री सृजनशील आहे; कारण निसर्गाने निर्मितीचा अधिकार स्त्रियांना दिला आहे. स्त्री मुळातच सबला आहे. जरी संविधानाने स्त्री व पुरुष यांना समान अधिकार दिले असले तरी भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री आज समाज व कुटुंबाच्या बंधनात अडकून पडली आहे. तीन 'प' अर्थात पिता, पती आणि पुत्र यांच्या आदेशाने आणि बंधनाने ती आपले आयुष्य काढते आहे. अगदी कामकाजी, व्यवसायी, नोकरदार महिलांशी चर्चा केली असता त्यादेखील स्वतःला सक्षम मानत नाहीत. त्यांच्या दृष्टीने महिला सबलीकरण म्हणजे फक्त कार्यक्रम, व्याख्यान आहे; पण तसे न होता वास्तविकतेत महिलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून वैयक्तिक स्वातंत्र्य व निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे होय.

महिला अबला नाही हे खर आहे. सध्या कोविड मुळे अनेक महिला विधवा झाल्या त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास यंत्रणा सक्षम आहे का हा प्रश्न विचारावा वाटतो. लॉकडाऊनच्या काळात तर स्त्रियांचे प्रश्न प्राधान्यक्रमात तळाशी जातात. सगळी प्रशासकीय यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनाच्या मुख्य कामावर फोकस करते, परंतु अशा आपत्तीतून इतर अनेक प्रश्नही उद्भवतात, त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. एरव्हीही स्त्रियांना हतबल वाटेल अशाच प्रकारे व्यवस्था काम करते परंतु या काळात स्त्रियांना अधिकच हतबल वाटलं. कारण त्यांना घराबाहेर पडता आलं नाही, मदतीची यंत्रणा सुलभ नव्हती, घरात बसून घरातील पुरुषांसमोरच त्यांची उघडपणे तक्रार करता येत नाही. करोनाने २० हजारपेक्षा जास्त महिला विधवा झाल्या आहेत. कोरोनाने कधीही भरुन न निघणाऱ्या जखमा दिल्या आहेत. नागपूरच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे सव्वादोन हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. यात तरुणांचीही मोठी संख्या आहे. विशी, पंचविशीतल्या तरुणी विधवा झाल्याने त्यांच्या जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. कुणी सात महिन्यांची गरोदर आहे तर कुणावर दोन मुलांची जबाबदारी आहे. तर कुणी घरी एकटं पडलं आहे. असे उघड्यावर पडलेली संसार बघून डोळे निश्चितच पाणवताय. एकल महिलांची स्थिती तर यापेक्षा जास्त भयानक झाली." महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे आणि त्यामुळे ही शक्ती सुदृढ व सक्षम बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे.

महाराष्ट्र मध्ये कोविड १९ मुळे एकल झालेल्या महिलांच्या प्रश्नासाठी जेष्ठ अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना खाली राज्यात या प्रश्नाकडे लक्ष वेधले जावे यासाठी विविध पर्यायचा उपयोग करून प्रयत्न केले जात आहे. याबाबत महिला व बाल कल्याण विभाग अधिकारी व मंत्री यांच्या सोबत बैठक झाली पण पुढे त्यावर कुठलेही अंमलबजावणी नाही. आयुष्यात जगतांना असं काही होईल यांचा विचार देखील महिलांनी केला नसेल. आज मात्र परिस्थिती अशी उद्भवली की समाजात जीवन जगत असतांना दुःख पदरी पडले. काहीच्या जीवनात नाते वाईक यांचा देखील आधार नाही. कोविड मध्ये नेमक कस जीवन जगत असतील असे अनेक समस्या एकल महिलांच्या जीवनात आहे. आज परिस्थिती भयावह आहे. एकीकडे शिक्षणाचे दार बंद, बाल मजुरी, बाल विवाह तर दुसरीकडे एकल होऊन आयुष्याचा लढा कसा द्याचा या चिंतेत असलेली महिला अशी परिस्थिती महाराष्ट्र मध्ये आहे. अभिमानाने आम्ही महाराष्ट्र बद्दल बोलत असतांना दुसरीकडे अशी काही स्थिती आहे. हे प्रश्न सुटणार कसे असा विचार केला तर सर्व जबाबदारी सरकार टाकून चालणार नाही. समाजातील सामजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन एकल महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

येत्या २२ तारखेला रक्षा बंधन आहे. यानिमित्ताने एकल महिलांच्या सोबत आम्ही भाऊ म्हणून आहोत असा संदेश देण्यासाठी अश्या महिलांच्या घरी जाऊन रक्षा बंधन कार्यक्रम समाजातील नागरिकांनी केला तर कदाचित एकल महिलांना यानिमित्ताने विश्वास व जिद्द जगण्यासा मिळेल असा एक प्रयत्न आपण करावा अशी अपेक्षा करतो.

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९

Tags:    

Similar News