शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणजे नेमके समर्थन कशाला?
सध्या देशभरात शेतकरी कृषी आंदोलनाने वातावरण तापले आहे. पण या आंदोलनाबाबत अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टच्या आधारे शेतकरी आंदोलनाला समर्थन देणे म्हणजे नक्की काय याचे विश्लेषण केले आहे पत्रकार गणेश कनाटे यांनी....
सध्या देशभरात शेतकरी कृषी आंदोलनाने वातावरण तापले आहे. पण या आंदोलनाबाबत अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टच्या आधारे शेतकरी आंदोलनाला समर्थन देणे म्हणजे नक्की काय याचे विश्लेषण केले आहे पत्रकार गणेश कनाटे यांनी....
मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख आणि अर्थशास्त्रातील तज्ज्ञ नीरज हातेकर यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांनी आपण कोणत्या शेतकऱ्याला समर्थन देतोय याचे भान ठेवावे, या आशयाची एक सूचना फेसबुक पोस्ट लिहून केलेली आहे. त्यात मोठा शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, शेतमजुरांचे विविध समूह यांचा उल्लेख करून आपल्या मनात कोणता शेतकरी आहे, हे समर्थन देणाऱ्यांनी स्वतःच तपासून पाहावे, असे आवाहन केले आहे.
अगदी योग्य भान राखण्याचे आवाहन करणारी ही हातेकरांची सूचना आहे. मी स्वतः या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देणारा शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला सामान्य नागरिक असल्याने याबद्दल प्रतिक्रिया देणे माझे कर्तव्य समजतो. म्हणून हे स्पष्ट केले पाहिजे की शेतकऱ्यांच्या आत्ताच्या आंदोलनाला समर्थन देणे याचा अर्थ खालील गोष्टींना समर्थन देणे आहे.
१) शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे, या मागणीला समर्थन देणे.
ही अत्यंत योग्य अशी मागणी आहे. खरे तर फार फार पूर्वीपासून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, ही मागणी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी लावून धरली होती परंतु पुढे खासदारकीचा मोह आवरता आला नाही म्हणून ते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले.
आता किमान हमी भाव द्या म्हणणे, हे शेतमजुरांच्या थेट हिताचे नसले तरी त्याला काम देणाऱ्या शेतजमीन मालकाच्या हिताचे रक्षण करणारी मागणी आहे. मला यात अंतर्विरोध दिसत नाही.
२) APMC ची, आडतीयांची अस्तित्वात असलेली व्यवस्था मोडीत काढण्याला अनेक शेतकऱ्यांचेच समर्थन असेल. परंतु ही व्यवस्था मोडीत काढून हे सरकार नवी कोणती व्यवस्था अस्तित्वात आणत आहे? अंबानी, अडाणी यांच्या पथ्यावर पडणारी शेतीमालाच्या कॉर्पोरेट विपणणाची? त्या व्यवस्थेत शेतमजुरांच्या हिताचे, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण होणार आहे काय?
आत्ताच उसाच्या तोडणीसाठी यंत्रांचा वापर सुरू झाल्याने लक्षावधी कापणी करणाऱ्या शेतमजुरांच्या जगण्याचे प्रश्न बिकट झालेले आहेत. उद्या या कंपन्या शेतीचे सरसकट यांत्रिकीकरण करतील तेव्हा शेतमजुरांचे तर सोडा अल्पभूधारक शेतकऱ्यांचे हाल कुत्रे खाणार नाहीत.
भारत अन्नधान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण आहे व राहील, शेती या कंपन्यांसाठी नफा देखील निर्माण करेल पण शेतीवर अवलंबून असणारे शेतकरी आणि शेतमजूर शहरांत भीक मागताना दिसतील. मागे दोनेक वर्षांपूर्वी असे हजारो शेतकरी मुंबई-ठाण्याच्या वेशीवर पालव टाकून उघड्यावर स्वयंपाक करून ढाब्यासारख्या व्यवस्था राबवताना आपण पाहिलेले नाही काय?
३) या शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गेल्या काही दिवसांत जे-जे कुटील डाव आखले आणि अमलात आणली गेले त्यांच्या प्राणपणाने विरोध करण्यासाठी, ते आखणाऱ्या आणि अमलात आणणाऱ्या शक्तींचा विरोध करण्यासाठी या आंदोलनाचे समर्थन केले पाहिजे.
४) शेतीतले शष्प न कळणारी काही पत्रकार मंडळी आडतीयांच्या संख्यांचे त्रैराशिक मांडतात आणि किमान हमी भावाबद्दल जेव्हा व्हाट्सएप विद्यापीठात तयार होऊन उपलब्ध झालेल्या रेडिमेड पोस्ट्स फेसबुकवर आणि व्हाट्सएपच्या समूहांवर अक्कल गहाण ठेऊन फिरवत बसतात तेव्हा प्रचंड राग येतो.
नीरज भाऊंच्या या पोस्टमधली सूचना अतिशय विचारप्रवृत्त करणारी आहे पण तिचा वापर शेतकऱ्यांच्या आजच्या आंदोलनाला समर्थन देणे म्हणजे श्रीमंत शेतकऱ्यांना आणि त्यांच्या हितांना समर्थन देणे आहे, हा छुपा सूर लावला जाण्याची शक्यता आहे.
तसेही हातेकर सर्व समाजघटकांना अर्थसाक्षर करण्यासाठी झटत असतात आणि त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे पण या पोस्टचा दुरुपयोग जास्त होईल, अशी भीती वाटते म्हणून इतके लिहिले नाहीतर आजकाल कुठलीही विचार करायला लावणारी पोस्ट लिहिणे आणि त्यावर विचारपूर्वक प्रतिक्रिया देणे म्हणजे मूर्खांना आपण स्वतःच 'आनंद मस्ती' तेल विकत घेऊन देणे ठरते.