नेत्यांची मुक्ताफळे, माध्यमांचा TRP आणि जनतेचं चांगभलं ...!

“कोथळा बाहेर काढू, खंजीर खुपसला, खळ खट्याक...!”, “मौत का सौदागर”, “मैदयाचे पोते”, “अडवाणीच्या फडातील नाच्या” अशी वक्तव्य राजकारणी सहज करतात का? ही वक्तव्य करण्यामागे नक्की कोणता उद्देश असतो? भारतात आत्तापर्यंत नेत्यांनी केलेली वक्तव्य आणि त्या मागचा उद्देश नक्की काय होता? यासह या वक्तव्यांचा जनतेला काही फायदा होतो का? हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा हेमंत पाटील यांचं विश्लेषण;

Update: 2021-10-26 10:26 GMT

शिवसेनेचे 'कोथळा बाहेर काढू', 1978 साली पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडून पुलोद्चे सरकार स्थापन केल्यावर पवारांना उद्देशून 'पाठीत खंजीर खुपसला'. हे वाक्य आणि मनसेचे नेते राज ठाकरेंचे 'खळ खट्याक'.

महाराष्ट्राच्या जनतेला ही तीन वाक्य चांगली पाठ झालीत. नेते जाहीर सभेत कार्यकर्त्यांना चेतवणारी वाक्य बरेच वेळा बोलून जातात. किंवा एखाद्यावर आरोप करताना अशी टोकाची वाक्य बोलण्याची पद्धत झाली आहे.

गुजरात दंगलीपार्श्वभूमीवर 2007 च्या निवडणुकीत सोनिया गांधींनी मोदींना "मौत का सौदागर" संबोधले होते. राजकारणात अशी विविध आरोप करणारी किंवा काहीही तथ्य नसलेली वाक्य काही नेते बोलतात. एखाद्या पक्षाला किंवा नेत्याला बदनाम करणे हा मूळ उद्देश असतो. काही वेळा विषय भरकवटण्यासाठी अशी विधाने केली जातात. जास्त करून निवडणुकीच्या प्रचार सभेत अशी विधाने होतात.

कॉंग्रेसचे अर्जुनसिंग व डॉ. सुब्रमण्यम स्वामी अशी वाक्य बोलण्यात प्रसिद्ध होते. एखाद्याने अशी वाक्य बोलली तरी नंतर विरोधकांबद्दल त्याच्या मनात द्वेष नव्हता. शक्यतो विरोधकांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल कोणतीही विधाने होत नसत. सर्वजण शब्द जपून वापरत. माणूस मेला की वैर संपते तसेच निवडणूक झाली की सर्व संपल्याची भावना नेत्यांमध्ये होती. सार्वजनिक कार्यावर त्याचा फारसा परिणाम होत नसे.

बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांची मैत्री सर्वांना माहीत आहे. निवडणुकीत बाळासाहेब शरद पवारांना अनेक वेळा "मैदयाचे पोते" म्हणायचे. पवारांनी एकदा त्यांना "अडवाणीच्या फडातील नाच्या" असे म्हणाले होते. तरी त्यांच्यात कुठलीही कटुता नव्हती. शरद पवार औरंगाबाद मध्ये सभा घ्यायचे. विरोधकांवर सडकून टीका करायचे आणि विरोधक बापूसाहेब काळदातेंच्या घरी मुक्कामाला असायचे.

भाजप देशात अटलबिहारी वाजपेयी - अडवाणी तर राज्यात महाजन – मुंडे यांची म्हणून ओळखली जायची. कॉंग्रेस इंदिरा गांधी – राजीव गांधी तर राज्यात यशवंतराव चव्हाण – वसंतराव नाईक – वसंतदादा – शंकरराव चव्हाण - शरद पवार यांच्या नावाने ओळखली जायची.

शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तर जनता दल एस एम जोशी – मधु दंडवते – भाई वैद्य – ग प्र प्रधान – ना ग गोरे यांच्या नावाने ओळखली जात होती. कम्युनिस्ट श्रीपाद डांगे यांची होती. ही सर्व मंडळी सुशिक्षित व सुसंकृत होती. त्यांनी बोलताना समोरचा दुखावला जाणार नाही. याची काळजी घेतली होती. त्या वेळेस माध्यमं मर्यादित होती.

इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांपेक्षा वर्तमान पत्र जोरात होती. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं वाढली तशी त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. दुर्दैवाने प्रत्येकाला मी इतरांच्यापेक्षा किती मोठा असे स्वत:च्याच चॅनेलवरुन सांगावे लागते. इंटरनेट आणि फेसबुक - व्हाट्स अप – ट्विटरमुळे लोकांच्या हातात जग आले. महितीचा खजिना आला.

2013 साल उजाडलं. आर एस एस व भाजपने पंतप्रधान म्हणून मोदींच्या नावाला पसंती दिली. मोदींनी अमित शहा यांच्या मदतीने रणनीती ठरवली. प्रसार माध्यमांचे महत्व त्यांनी आधीच ओळखलं होतं. त्यात सोशल मीडियाची भर पडली. त्यांनी माध्यमं हातात घेतलीच. परंतु त्याच बरोबर सोशल मीडियाचे वाढते रूप ओळखून विरोधकांना ट्रोल करायची यंत्रणा तयार केली.

भाजपचे सर्व विरोधक गफिल राहिले. राहुल गांधी किंवा शरद पवार सहित अन्य कुणाही नेत्यांना ट्रोलची ताकत कळली नाही. ह्या मुळे गेल्या दोन निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली. अनेक राज्यात सुद्धा सत्ता मिळवली.

भाजपने आखलेल्या रणनीतिनुसार विविध पद्धतीने वक्तव्य करायची पद्धत सुरू झाली. विरोधकांनी सुद्धा त्यांच्या पाउलावर पाऊल ठेवून अशी वक्तव्य करण्यास सुरवात केली. नेते कुठल्या प्रकारची वक्तव्य करतात ? त्याचा माध्यमं कसा प्रतिसाद देतात? उदाहरण बघायचे झाल्यास पुढील प्रकारची काही वक्तव्य बघू.

विचित्र वक्तव्य

जनतेचे लक्ष मुद्दे सोडून इतरत्र वळवण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. जनता याच गोष्टीवर चर्चा करीत राहते. अशी वक्तव्य सातत्याने करायला लागतात.

मोर कधीही सेक्स करत नाही. त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रु लांडोर टिपते आणि त्यातून ती गर्भवती राहते. - राजस्थान हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश महेशचंद्र शर्मा

एका धाबेवाल्याने गटारीवर पातेले ठेवले. त्याला एक भोक पाडून पाइप जोडला. त्या पाइप मधून गॅस निघाला व त्यावर स्वयंपाक केला. – नरेंद्र मोदी

ढगांमुळे रडारला विमान दिसत नाही. – नरेंद्र मोदी

इंटरनेट महाभारताच्या काळात होतं. – बिप्लव कुमार देव, त्रिपुरा मुख्यमंत्री, भाजप

महागाई राष्ट्रीय समस्या असेल तर लोकांनी खाणे पिणे सोडून द्यावे. - ब्रिज मोहन अग्रवाल, भाजप मंत्री रायपूर.

ज्यांना सर्दी जास्त वाटते त्यांची सहन क्षमता कमी झाली आहे. – नरेंद्र मोदी

जेव्हा हमायून (दुसरा मुघल सम्राट) मरत होता, तेव्हा त्याने बाबरला (पहिला मुघल सम्राट) हाक मारली आणि म्हणाला, "जर तुम्हाला हिंदुस्थानवर राज्य करायचे असेल तर तुम्ही तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत - गाय, ब्राम्हण आणि स्त्रियांचा आदर करा. - मदनलाल सैनी, भाजप नेते.

आमच्याकडे सत्ता आहेत. आपण बालविवाहात हस्तक्षेप करू नये.- भाजप खासदार शोभा

माझ्या बागेतील आंबे खाल्याने कितीतरी जणांना मुलं झाली. कोरोना षंढ लोकांना होतो. – हिंदुस्तानी लोकं बेफिकीर आहेत. – कोरोना हा रोग नाही, जे मरतायत ते जगण्याच्या लायकीचे नाहीत. - भिडे गुरुजी

आपल्या सर्वांना माहित आहे की शेण खूप उपयुक्त आहे. जेव्हा गोमूत्र फवारले जाते, तेव्हा ते एक क्षेत्र शुद्ध करते. त्याच प्रमाणे कोरोना बरा करण्यासाठी गोमूत्र व गोबरसह असेच केले जावू शकते. – भाजप आमदार सुमन हरिप्रिया

अश्लील वक्तव्य

काही वेळा नेते तोल सोडून बोलतात. अश्या लोकांना अश्लील बोलायची सवय असते.

आमचा सुद्धा देठ हिरवा आहे. आम्ही सुद्धा रात्री तसल्या सीडी बघतो. - गिरीश बापट

महिलांच्या जाहीर सभेत "गूप्तांग सरकलं." असे विधान केले. – बनसोड

हे भाजप आणि आर एस एस वाले स्वत: लग्न करीत नाही आणि दुसऱ्याची बायको किती सुंदर आहे यावर लक्ष ठेवतात. 10 मुलांना जन्माला घाला असे सल्ले देतात. नितीश राणे

खोटी व चुकीची वक्तव्य

नागरिकांना आपण कसे बरोबर आहोत. हे सांगण्यासाठी खोट्या बोलण्याचा आसरा घ्यावा लागतो. दुसऱ्याला चुकीचे ठरविण्यासाठी सुद्धा खोटे बोलावे लागते. यात सुद्धा सातत्य आवश्यक आहे.

20 लाख कोटीचे पॅकेज दिले.: निर्मला सीतारामन

जे एन यूच्या विद्यार्थ्यांच्या खोलीत दारूच्या बाटल्या व निरोध सापडतात. – भाजप आमदार

भाजप सत्तेवर आला आहे. तो घटना बदलण्यासाठीच. आम्ही ती लवकरच बदलू. सेक्युलर असणे हे मायबाप नसल्यासारखे असते. - केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे

गोमूत्राचा उपयोग अनेक प्रकारची औषधे तयार करण्यासाठी केला जातो. कर्करोगासारख्या असाध्य रोगांच्या उपचारासाठी देखील याचा वापर केला जातो. – आश्विन चौबे, केंद्रीय मंत्री

चिथावणी खोर वक्तव्य

कार्यकत्यांना चेतवण्यासाठी अशी वक्तव्य करतात. या मुळे आपल्या विचारांचे नागरिक विरोधकांवर तुटून पडतात.

देश के गद्दारोंको गोली मारों - अनुराग ठाकुर

जे बीजेपीला मतं देतील ते रामजादे, न देणारे हरामजादे. – साक्षी महाराज

आव्हानात्मक वक्तव्य

आपली ताकत खूप मोठी आहे हे दर्शवण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. त्या मुळे कार्यकर्ते पेटून उठतात.

वानखेडेंच्या केसलाही धक्का लावून दाखवा. - किरीट सोमय्या

भुंकणारे चावत नसतात. - भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख

सेना भवन फोडू. – प्रसाद लाड

मी असतो तर कानाखालीच लगावली असती. – नारायण राणे

जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य

मतदारांच्या द्रुविकरणासाठी असे वक्तव्य करतात. जात धर्म यावर मतदार विभागाला जावा हा उद्देश या मागे असतो.

बिंदी न लावलेल्या महिले कडून कोणतीही वस्तु खरेदी करू नका. शेफाली वैद्य

आरक्षणामुळे ब्राम्हण विद्यार्थ्यांना परदेशात जावे लागते. मुक्ता टिळक

द्वेषात्मक वक्तव्य

समोरच्याला अतिशय कमी लेखण्यासाठी असे बोलतात. नुसते कमी लेखले जात नाही तर आपल्या कार्यकर्त्यात विरोधकांच्या बाबत द्वेष निर्माण होऊन ते व नागरिक आपल्या बाजूने खेचण्यासाठी अश्या वक्तव्याचा फायदा होतो.

गांजा ओढला का - अतुल भातकळकर

शरद पवार म्हणजे कोरोना आहेत. - गोपीचंद पडळकर

चीनचे समर्थन करणाऱ्या सीताराम येचुरींच्या मुलाचे चीन निर्मित कोरोनामुळे निधन. - मिथिलेश कुमार तिवारी, भाजप नेते

रावणाला मदत करणाऱ्या शूर्पणखाला महिला आयोगाचे अध्यक्ष करू नका: चित्रा वाघ

रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष: प्रवीण दरेकर

पडळकरांचं मानसिक संतुलन बिघडलंय, भाजपमध्ये बांडगुळं वाढतायत: अमोल मिटकरी आमदार एनसीपी.

शाहरुख खानने नवाब मालिक व संजय राऊत यांना पे रोलवर ठेवलंय: नितेश राणे.

जनतेला उद्देशून अपमानास्पद केलेली वक्तव्य

काही वेळा सत्तेचा माज आल्यावर अशी वक्तव्य होतात. कधी चुकून सुद्धा नेते बोलून जातात.

एव्हढी तूर विकत घेतली तरी रडतात साले: रावसाहेब दानवे

आता काय धरणात मुतू का?: अजित पवार

पोरी पळवून आणतो: राम कदम

पैसे घेवून मतदान करा: रावसाहेब दानवे

आधी साताऱ्याला मतदान करा आणि नंतर मुंबईला करा: शरद पवार

दारूचा खप वाढत नसेल तर त्याला महिलांची नावे द्या, खप वाढेल: गिरीश महाजन

स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे बलात्कार होतात: मध्यप्रदेशचे भाजपचे खासदार नंदकुमार चौहान

पैशासाठी काही मुली व त्यांचे पालक बलात्काराच्या तक्रारी करतात: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे कपाळावर टिळा, भस्म लावणाऱ्यांची मला भीती वाटते: काँग्रेस नेते सिद्धरामय्या

सरकारी कर्मचाऱ्यांना उद्देशून काढलेली वक्तव्य

आम्ही कसे सरकार पेक्षा मोठे आहोत हे दाखवण्यासाठी अशी वक्तव्य करतात. सरकारी कर्मचार्यांना हे आपले नोकर समजतात. पोलिस हे सरकारी कुत्रे आहेत: अनिल बोंडे माजी मंत्री भाजप सीमेवरील जवान वर्षभर घरी येत नाही तरीही त्याला मुलगा होतो आणि तो पेढे वाटतो: प्रशांत परिचारक दहशतवाद्यांनी केलेल्या मुंबई हल्ल्याच्या वेळी शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे देशद्रोही, त्यांना ज्या दिवशी देशद्रोह्यांनी मारलं त्या दिवशी माझे सूतक संपलं: प्रज्ञासिंग

अशी बेताल वक्तव्य करणे व चर्चेत राहणे हा नेत्यांचा रोजचा उद्योग झालाय. काहीही करून लोकांचे जनमत आपल्याबाजुने खेचायचे. यात आपण द्वेष पसरवतो, सरकारी कर्मचाऱ्यांना अपमानित करतो, समाज्यात तेढ निर्माण होतेय. या कुठल्याच गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांविरूद्ध कमालीची तेढ निर्माण झालीय.

नागरिक सुद्धा दुभंगले जातायत. अपमानित होतात आणि हेच तर नेत्यांना पाहिजे असे वाटते. एखाद्या मुद्याला बगल देण्यासाठी अशी वक्तव्य होतात. परंतु खोटी माहिती जनतेसमोर मांडण्याची नवीन पद्धत सुरू झालीय. पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात हे घडतंय. यात कहर म्हणजे वक्तव्यात अश्लीलता... ही आपली संस्कृती नव्हती आणि कधीच नसावी.

माध्यमं टी आर पी आणि जाहिरातींच्यासाठी कुठल्याही फुटकळ नेत्याचे वक्तव्य दाखवतात. एव्हढं कमी झालं की काय? त्याच्या विरोधी नेत्याला त्या वक्तव्यावर बोलण्याचा आग्रह करतात. परत परत एकमेकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आणि त्याला

"सणसणीत, खरमरीत, खोचक टोला लगावला, सवाल उपस्थित केला, जोरदार प्रतिउत्तर दिले, टोमणा मारला, थेट इशारा दिला, खळबळजनक दावा केला, थेट आव्हान दिले. अशी द्वेषात्मक भाषा वापरुन बातमी द्यायची.

टॉक शो मध्ये तर ठरवून कोंबड्यासारखी झुंज लावतात. मुद्दा बाजूला राहतो आणि 'याचं उत्तर द्या' असे त्याच्या विरोधकाला अॅन्कऱ विचारतो. वारंवार अश्या बातम्या दाखवल्याने यांचे खिसे भरतात. पण लोकांवर किती वाईट परिणाम होतो? हे यांच्या लक्षात येत नाही. आले तरी त्यांना पैसे आणि राजकीय दबावापोटी काहीही वाटत नाही.

मागे राणेंचे मोठे पुत्र माजी खासदार निलेश राणे म्हणाले की "अर्धी राष्ट्रवादी जेल मध्ये असेल." दुसऱ्या दिवशी पुण्यात अजित पवारांना त्याबद्दल प्रतिक्रिया विचारली. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिले. "आता याच्यावर सुद्धा मी बोलू का...? डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या."

यात जनतेचे काय...?

या वक्तव्यावरून त्यांची काही वेळा करमणूक होते. परंतु हातात काय पडते...? काहीही नाही. फक्त खोटी व चुकीची माहिती, द्वेष, समाजात तेढ आणि अपमान..! आजच्या तारखेला नागरिकांना वेळ नाही. ही परिस्थिती बदलायची इच्छा तर अजिबात नाही. नेते आणि माध्यमातून जे आदळत ते निमूटपणे सहन करणे. असो. जाता जाता एक आठवण सांगावीशी वाटते. पाच वर्षापूर्वी गुजरातच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान मणिशंकर अय्यरांनी मोदींना उद्देशून "नीच" हा शब्द वापरला होता.

राहुल गांधींनी ताबोडतोब त्यांना समज दिली. पक्षातून बडतर्फ केलं. परंतु मोदींनी आपला करिश्मा दाखवलाच. त्यांना वापरलेले हे विशेषण आपल्या ओबीसी समाजाला वापरलयं असा प्रचार केला. मला वाटतं इथून पुढे नेत्यांची मुक्ताफळे देशाला तोडतील. वेळीच सर्वांनी सावध झाले पाहिजे. आताच विचार केला पाहिजे. नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.

धन्यवाद ...!

हेमंत पाटील

निवडणूक सल्लागार व राजकीय विश्लेषक

Tags:    

Similar News