सोशल मीडियावर सध्या वायरल होत असलेल्या एका सुंदर व्हिडियो क्लिप ने आपल्या सर्वांचेच लक्ष वेधले असेल.
या क्लिप मध्ये राधिका आपटे ही अभिनेत्री बुद्धिस्ट वधूच्या शुभ्र वेशात शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या वराच्या गळ्यात पुष्पमाला टाकत असून नवयान बौद्ध पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न होतांना दाखवल्या गेला आहे.
हा व्हिडिओ लोकप्रिय होण्यामागे मुख्य कारण म्हणजे अतिशय कलात्मक आणि भव्य दिव्यतेने मेंनस्ट्रिम मीडिया मध्ये चित्रित केला गेलेला हा पहिला नवयान बौद्ध विवाह सोहोळा म्हणता येईल.
हा देखणा विवाह प्रसंग नीरज घायवान या तरुण दलित दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला असून "मेड इन हेवन" (सिझन टू ) ह्या अमेझॉन प्राईमवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेबसिरीज मधल्या एपिसोड ५ मधून घेतल्या गेला आहे.
थोडक्यात कथानक
या कथेतील मुख्यपात्र पल्लवी मेनके ( राधिका आपटे) (Radhika Apte) ही एक महाराष्ट्रीयन दलित तरुणी असून सरकारी शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये लॉ शिकलेली, प्रोफेसर असलेली अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली दलित लेखिका आहे .
अमेरिकेत रहात असलेल्या उच्चशिक्षित सवर्ण भारतीय प्रियकराबरोबर लग्न करण्याकरिता ती भारतात दिल्लीत येते तेव्हा त्याच्या आईवडीलांच्या वागणुकीतून तिला जात वास्तवाचे चटके जाणवतात.
मेहतर किंवा तत्सम पददलित जातीतील सून स्वीकारण्यास ते नाखूष असतात
लग्न पत्रिकेवर ते पल्लवीचे जातीवाचक आडनाव टाकायला इच्छुक नसतात. कोर्ट मॅरेज ठरले असताना देखील त्यानंतर लग्न हिंदू पद्धतीने व्हावे असा ते आग्रह धरतात. पल्लवी ते मान्य करते मात्र विवाह सोहळा नवयान बौद्ध पद्धतीनेेदेखील व्हावा असा आग्रह करते. पल्लवीच्या घरातून तिचा भाऊ देखील बौध्द पद्धतीने लग्न करण्यास विरोध दर्शवतो कारण दलित आयडेंटिटी सर्वांसमोर उघड करण्याची त्याची इच्छा नसते.
बौध्द पद्धतीने विवाह करण्यामागची पल्लवीची भूमिका पटल्यानंतर ती दोघेही केवळ नवयान बुद्धीस्ट पद्धतीनुसार लग्न सोहळा करण्याचे ठरवतात.
पल्लवी आणि तिचा भाऊ हे आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षित आणि सधन झालेल्या दलितांमधील दोन वेगवेगळ्या वैचारिक विरोधाभासी गटांचे प्रतिनिधित्व करतात.
पल्लवी डॉ आंबेडकरांच्या विचार धारेत आपली आयडेंटिटी बघते तर आरक्षणाचा लाभ घेऊन शिकत असलेल्या तिच्या भावाला आंबेडकरी आयडेंटिटी नकोशी वाटते.
नवयान बुद्धिस्ट कोण आहेत आणि दलित कोण आहेत ?
सर्वप्रथम दलित आणि बुद्धिस्ट ह्यातील फरक समजणे महत्त्वाचे आहे.
बूद्धिस्ट किंवा नवयान बुद्धीस्ट महाराष्ट्रातील उच्चशिक्षित आणि वैचारिक परिवर्तन झालेला बुद्धीस्ट
समाज होय. हा समाज 1956 पूर्वी अस्पृश्य होता मात्र डॉ. आंबेडकरांबरोबर या जात समूहाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि गेल्या 60 वर्षात डॉ आंबेडकर, शाहू फुले ह्यांची विचारसरणी पूर्णपणे आत्मसात करून लक्षणीय सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती केली.
नवबुद्धिस्टां व्यतिरिक्त भारतातील इतर हजारो दलित आणि पददलित जातींजमातीं ज्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत त्यांना दलित असे संबोधले जाते.
नवयान बुद्धीस्ट विवाह सोहळा कसा असतो?
1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर बुद्ध धम्मावर संशोधन करून तर्कशुद्ध वस्तुनिष्ठ असा बुद्ध धम्म "बुद्ध आणि धम्मा " ह्या ग्रंथात नव्याने मांडला.
बाबासाहेबांनी पुनर्जीवित केलेल्या या बौद्ध धम्मालाच नवयान बुद्धिझम असे म्हटले जाते.
नवायान बुद्धिस्ट विवाह सोहळा अगदी साधेपणाने कुठलेही कर्मकांड न करता पार पाडला जातो. ह्यात वधूवर कुंडली किंवा लग्नमुहूर्त वगेरे सारख्या तर्कहीन बाबींना थारा नसतो.
नवयान बद्धिस्ट विवाह विधी:
शुभ्र वस्त्र परिधान करून वधू आणि वर, बौद्ध भंते किंवा बौद्धाचार्याच्या उपस्थितीत, भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमा किंवा मूर्ती समोर एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाळा टाकतात आणि पुष्प गुच्छ देतात. भगवान गौतम बुद्ध आणि बाबा साहेबांना वंदन करून
बुद्ध धम्मा तील पंचशील आणि त्रिशरणांचा उच्चार केल्या जातो. आणि बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे स्मरण करून
विवाह संपन्न होतो. उपस्थित लोक या प्रसंगी वधू वरावर पुष्प वर्षा करून त्यांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देतात. कुठल्याही कर्म कांडावीणा अगदी 10 मिनिटात हा विवाहविधी संपन्न होतो.
भारतीय दलितांमध्ये बौद्ध संस्कृतीचे आकर्षण का वाढत आहे?
भारतीय दलितांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा penetrate होत असून त्यामुळे त्यांच्यात सामाजिक, वैचारिक सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिवर्तन होत आहे.
भारतीय दलितांमधील सामाजिक परिवर्तन :
जातीय व्यवस्थेला आव्हान : भारतीय जातिव्यवस्थेतील उतरंडीमुळे ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित असलेला
दलित बहुजन समाज खोलवर रुजलेल्या जातीय विषमतेला आव्हान देऊ पहात आहे. वेगवेगळ्या स्तरावर जातीयवाद अजूनही अस्तित्वात असताना, बहुजन समाज स्वाभिमानाने , सन्मानाने जगण्यासाठी, समतावादी , सर्वसमावेशक अशी बौद्ध संस्कृती आणि आंबेडकरी मूल्ये स्वीकारू लागला आहे.
हे सामाजिक परिवर्तन आता आचार विचार आणि विवाह सोहळ्यात देखील प्रतिबिंबित होताना दिसत आहे.
बौध्द संस्कृतीप्रती दलितांना आकर्षण का वाटतय?
जातीय उतरंडीस नकार: शिक्षित होत असलेला दलित बहुजन तरुण वर्ग जो बाबासाहेबांना समजून घेतोय, तो विषमतेवर आधारित पुरुषसत्ताक मनुवादी संस्कृतीला झुगारू बघतोय त्याच बरोबर त्याला समतेवर आधारित, लिंगभेद विरहित, कर्मकांड विरहित, बौद्ध संस्कृतीचे आकर्षण वाटतंय.
धम्म परिवर्तन : जातीय विषमता, अत्याचार आणि शोषणातून मुक्त होण्याकरिता आणि स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याकरिता हिंदू धर्म त्यागून हजारो लाखोंच्या संख्येने अनेक पद दलित जातीजमाती बुद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत.
सम्यक मैत्रीवर आधारित बौद्ध वैवाहिक संस्कृती
पत्नीला दुय्यम दर्जा देणाऱ्या आणि पतीला श्रेष्ठ मानणाऱ्या पुरुसत्ताक मनुवादी संस्कृतीपेक्षा पती आणि पत्नीला समान दर्जा आणि अधिकार देणारी बौद्ध संस्कृती पुरोगामी पिढीला आपलीशी वाटतेय.
सांस्कृतिक आयडेंटिटी आणि सामाजिक परिवर्तन :
बहुसंख्य दलित स्वीकारत असलेली भारतीय बौद्ध विवाह संस्कृती ही आंबेडकरवादी विचारधारेचा प्रभाव आणि त्यामुळे होणारे सामाजिक आणि सांस्कृतिक आणि वैचारिक परिवर्तन दर्शवते. त्याचबरोबर दलित पददलित जातींना सांस्कृतिक आयडेंटिटी आणि सामाजिक प्रतिष्ठा देखील प्रदान करतें.
मेड इन हेवन विषयी थोडक्यात
पल्लवीची कथा एकाच एपिसोड पुरती मर्यादित असून अंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नीरज घायवानने हा एपिसोड अत्यंत कलात्मकतेने तितकाच परिणामकारकपणे दिग्दर्शित केला आहे. लेखक निर्मात्या झोया अख्तर, रीमा कागदी , अलंकृता श्रीवास्तव यांनी निर्माण केलेली ही वेबसिरीज 'Made in heaven' नावाच्या वेडिंग प्लॅनर कंपनी भोवती फिरते. प्रत्येक episode मध्ये एका नवीन जोडप्याचे विवाह नियोजन करताना त्यांच्या भोवतालची पात्र, आणि त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी याभोवती कथा गुंफल्या गेल्या आहेत.
ताक: लेखकांनी आणि दिग्दर्शकाने विषय अत्यंत प्रगल्भतेने हाताळला आहे . मात्र दलित आणि बद्धिस्ट आयडेंटीटीची सरमिसळ केलेली आहे.
काही ठिकाणी बुद्धिस्ट विवाहास ह्यातील पात्र दलित बुद्धिस्ट विवाह म्हणतात ते चुकीचे आहे.
आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती होत असून देखील दलितांचे प्रश्न आणि संघर्ष संपलेला नसून अनेक आघाड्यांवर तो लढला जात आहे.
नीरज घायवान, झोया अख्तर सारखे नव्या दमाचे दिग्दर्शक हा संघर्ष मेन स्ट्रिंम मध्ये आणताहेत हे निश्चितच स्वागतार्ह आहे.
- जयश्री इंगळे (मुक्त लेखिका)