कावीळ झाल्यास तिचा प्रकार जाणून घेणं का गरजेचं आहे?
कावीळ म्हणजे काय,तिचे प्रकार कोणकोणते? कावीळ होण्याची लक्षणे काय आहेत? या संसर्गापासून कशी घ्यावी स्वत:ची काळजी ? कावीळचा प्रसार टाळण्यासाठी नेमकं काय करावे? जाणून घेण्यासाठी वाचा साथरोग तज्ञ डाॅ. प्रिया देशपांडे यांचा महत्त्वपूर्ण लेख;
जागतिक हिपाटायटीस दिवस आहे. यकृताचा दाह म्हणजे हिपाटायटीस. ज्याला आपण "कावीळ झालीये" असे म्हणतो . "कावीळ" हे खरे तर एक लक्षण आहे जे यकृताला कोणत्याही कारणाने सूज आली कि दिसून येते. त्यामुळे तुम्हाला कावीळ झाली असेल तर डॉक्टर तुम्हाला "लिव्हरला सूज आली आहे" असे सांगतील. पण तेवढ्यावर समाधानी न होता कावीळ होण्याचे नक्की काय कारण आहे हे जाणून घ्यायला हवे. यासाठी रक्ताच्या काही तपासण्या कराव्या लागू शकतात. पण काविळीचा प्रकार माहित असेल तर भविष्यात आपला जीव वाचू शकतो.. कसे ते जाणून घ्यायचे असेल तर पुढे वाचा!
प्रत्येक ३० सेकंदाला लिव्हर संबंधित कारणाने एक मृत्यू होतो. त्यामुळे काविळीकडे कधीही दुर्लक्ष करू नये. या वर्षीचे घोषवाक्य आहे " वेळ घालवू नये". सध्या कोविडची महामारी असल्याने इतर आजारांकडे दुर्लक्ष होऊ शकते. मात्र कावीळ शरीरातील सर्वात महत्वाच्या भागाला म्हणजे यकृताला प्रभावित करत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करू नये.
सोबतच्या फोटो मध्ये काविळीची कारणे दिली आहेत. कावीळ जंतुसंसर्गामुळे होऊ शकते किंवा विविध कारणाने (उदा. दारू , काही औषधे, कर्करोग इ.) यकृताची हानी झाली असल्यास देखील होऊ शकते. कावीळ एक असली तरी कारणे निरनिराळी असू शकतात म्हणून तज्ञांना नक्की दाखवायला हवे.
मात्र सर्वात महत्वाचे कारण आहे यकृताला होणारा विषाणूसंसर्ग. कावीळ झाल्यास Viral hepatitis हे सर्वात पहिले कारण समजले जाते. जसे करोना फुफ्फुसाच्या पेशींना संसर्ग करतो तसे काही विषाणू यकृतातील पेशींना संसर्ग करतात . त्यामुळे यकृताचा दाह होतो व सूज येते . यकृताचे काम व्यवस्थित पार न पडल्याने कावीळ होते. (डोळे व लघवी पिवळी दिसू लागते, मळमळ – उलट्या होतात, थकवा जाणवतो, कधी ताप देखील येतो )
नक्की कोणत्या विषाणूमुळे कावीळ झाली आहे हे नक्की जाणून घ्या. कारण एकूण ५ प्रकारच्या विषाणूच्या संसर्गाने कावीळ होऊ शकते. सोबतच्या फोटो मध्ये त्यांच्याबद्दल माहिती आहे. A, B, C, D, E ही त्यांची नावे. लक्षात राहायला एकदम सोपी.
यातील A आणि E प्रकारची कावीळ दुषित पाण्याद्वारे पसरते आणि म्हणून यांच्यामुळे काविळीची साथ देखील येऊ शकते. ही कावीळ काही दिवसांमध्ये पूर्णपणे बरी होते. A प्रकारच्या काविळीविरुद्ध लसदेखील उपलब्ध आहे. E प्रकारची कावीळ गरोदर स्त्रीला झाली तर जीवघेणी ठरू शकते. विशेषतः प्रवासादरम्यान जर अस्वच्छ अन्न घेतले गेले तर यांचा संसर्ग होऊ शकतो. हातांची स्वच्छता, शुद्ध पाणी व स्वच्छ अन्न यामुळे या काविळीला प्रतिबंध करता येतो.
B, C आणि D प्रकारची कावीळ मुख्यतः दुषित रक्ताद्वारे तसेच लैंगिक संबंधाद्वारे पसरते. B प्रकारचा विषाणू संसर्ग हा बाधित मातेद्वारे गर्भातील बाळाला देखील होऊ शकतो. ( मात्र जन्मतः होणारी कावीळ सामान्यतः संसर्गामुळे नसते, तिला physiological jaundice म्हणतात. बऱ्याच नवजात शिशूंना होऊ शकते. ) आणि B आणि C प्रकारचे विषाणू शरीरामध्ये शिरले कि बऱ्याच रुग्णांच्या शरीरामध्ये कायमस्वरूपी राहतात आणि हळूहळू यकृत निकामी होते. याला Chronic hepatitis असे म्हणतात. तसेच B प्रकारच्या विषाणूमुळे काही वर्षानंतर यकृताचा कर्करोग देखील होतो. म्हणून कावीळ झाली कि ती B व C प्रकारची नाही ना यासाठी रक्तांच्या तपासण्या अवश्य करून घ्या.
यांचा प्रसार रक्ताद्वारे होत असल्याने काही गट जसे आरोग्य कर्मचारी , मादक पदार्थ शिरेद्वारे घेणारे, एकाहून अधिक लैंगिक संबंध ठेवणारे यांना धोका अधिक असतो. B प्रकारच्या विषाणूची लस उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यायला हवी. बाळांचे संरक्षण व्हावे म्हणून लहान मुलांना B काविळीची लस (जन्मतः + ३ डोस ) दिले जातात.
विशेष म्हणजे शरीरामध्ये मागे राहिलेले B आणि विशेषतः C प्रकारचा विषाणू नष्ट करणारी औषधे आता उपलब्ध झाली आहेत. १२ आठवडे इंजेक्शन व गोळ्या घेऊन यातून बरे होणे आता शक्य आहे. जेवढ्या लवकर हे लक्षात येईल यकृताची होणारी हानी टाळता येऊ शकते. ही औषधे महागडी आहेत , मात्र प्राण वाचवणारी आहेत. पंजाब मध्ये सरकारकडून ही औषधे आरोग्य कार्यक्रमाद्वारे दिली जातात. यासाठी काविळीचा प्रकार माहित असणे आवश्यक आहे. कावीळ पूर्वी होऊन गेली असेल तरी आत्ताही ती B किंवा C प्रकारची होती का हे रक्ततपासणी मधून समजून येऊ शकते. कारण हे दोन प्रकार शरीरामध्ये टिकून राहतात. तसेच D प्रकार हा केवळ B प्रकारासोबतच होऊ शकत असल्याने B पासून सुरक्षा म्हणजे D पासून देखील सुरक्षा !
कावीळ झाल्यास विश्रांती घेणे, कर्बोदक-पूर्ण आहार घेणे, अन्नातील तेलाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे , पाणी योग्य प्रमाणामध्ये घेणे , प्रतिजैविके सहसा टाळणे असे साधे उपाय आहेत. काविळीचा प्रकार माहित असल्यास त्यानुसार योग्य उपचार शक्य असतात.
कावीळ झाल्यास विलंब न करता आरोग्यतज्ञांची भेट घ्या. काविळीचा प्रकार जाणून त्यानुसार प्रसार टाळण्याची काळजी घ्या. योग्य उपचार भविष्यातील गंभीर आजार टाळू शकतो.
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोग तज्ञ , मिरज.
साभार @UHCGMCMIRAJ page in FB