भारतीयांना नोबेल का मिळत नाही? डॉ. आर.जी.सोनकवडे
भारतीयांना नोबेल का मिळत नाही? आपण डॉक्टर्स, इंजीनियर बनण्यापेक्षा नोबेल पारितोषक मिळवं असं कोणता पालक आपल्या मुलांना सांगतो? भारतीयांचा नोबेल पुरस्कार मिळवण्याकडे कमी कल का? जाणून घ्या डॉ. आर. जी. सोनकवडे यांचा बुद्धीला नवीन खाद्य देणारा विचार
नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या किमयागारांना नोबेल पारितोषिकाने पुरस्कृत केले जाते. काळाच्या किनाऱ्यावर तुमची पावले ठसवायची असतील तर तुमचे पाय फरपटून देऊन कसे चालेल? हे वाक्य आपल्या भारतीय तरुणांना उद्देशून वापरावेसे वाटते कारण, नोबेल पारितोषिकाची सुरुवात झाल्यापासून ते आजतागायत आपल्या देशाच्या वाट्याला हातावर मोजता येतील एवढेच नोबेल पारितोषके मिळालेली आहेत, यामध्ये रविंद्रनाथ टागोर, सी. व्ही. रमण, अमर्त्य सेन, कैलाश सत्यार्थी, हरगोविंद सिंग खुराणा, सुब्रमण्यम चंद्रशेखर, व्यंकटरमण रामकृष्णन, अभिजीत बॅनर्जी या व्यक्तींचा समावेश होतो.
या व्यक्तींनी आपल्या जीवनातील आंतरिक ऊर्जेचा जादुभरा स्रोत वापरून जी भरीव कामगिरी केली तिला व्यवसाय कधीच बनू दिले नाही. त्यास ध्यास, ध्येय व धर्म बनवले व पूर्ण कार्यक्षमतेने कार्य केले. आजही पालक आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनण्याची स्वप्ने पाहतात. यामध्ये किती पालक आहेत जे आपल्या पाल्यांना तू नोबेल मिळवशील असा आत्मविश्वास देतात, याही पलिकडे विचार करावयाचा झाल्यास 'नोबेल' शब्दाचा अर्थ तरी किती लोकांना माहित आहे? यावर संशोधन करावे लागेल. क्रांती घडवणाऱ्यांबद्दल त्यांच्या जन्मदिनी आपण भरभरून बोलतो पण चाकोरीबद्ध जीवन जगण्यातच आपण धन्यता मानतो. मग यात पैसे मिळवण्यासाठी अगणित स्वप्न, छंद, ध्येयं, आकांक्षा धुळीस मिळतात.
आपले स्वप्न साकार करण्यासाठी आपण तितकं आर्थिक बळ उभं करण्याचं धाडस का करू नये? प्रत्येक पालकास आपल्या पाल्याने अमाफ, अफाट पैसे मिळवून देणारे कार्य करावे असे वाटते. जगभरात अजरामर होणारी कामगिरी मुलांनी करावी असे कोणालाच वाटत नाही.
'लाथ मारीन तिथे पाणी काढीन' असं व्यक्तिमत्त्व आपल्या भारतीय युवा चेहऱ्यांमध्येही दिसू शकते पण मार्गदर्शनाअभावी आम्हा भारतीयांचं तारुण्य घोडचुका करण्यात, प्रौढत्व आळसात, तर म्हातारपण पश्चाताप करण्यात संपून जाते. यशाच्या गुलाल खोबऱ्याची चव चाखायची सोडून "पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी "असेच म्हणताना आजचा भारतीय दिसतो. कुवतीपेक्षा कमी कार्यक्षमता वापरल्यामुळे आपण सामान्य म्हणून संबोधले जातो हे मर्म न जाणताच, माझ्या नशिबात नव्हतं असं म्हणून मोकळं होतो.
नोबेल पारितोषिक विजेत्या पहिल्या पाच देशांमध्ये अमेरिका, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जर्मनी व स्वीडन यांचा क्रमांक लागतो दुर्दैवाची बाब म्हणजे आपण शेवटून दुसऱ्या क्रमांकास आहोत. गलती किसकी? असा सवाल खडा करण्याऐवजी गलती कौन सी ? असा अगदी रास्त प्रश्न विचारावासा वाटतो.
१. निधीची कमतरता:
एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या केवळ ०.८ टक्के भाग आपण संशोधनावर खर्च करतो. यामध्ये दोन तृतीयांश खर्च सरकारी आहे, तर खासगी उद्योगाचं योगदान फक्त एक तृतीयांश इतकंच आहे. या तुलनेत अमेरिकेत उद्योगांचा भाग निम्म्यापेक्षा जास्त आहे.
२. संशोधन संस्थांमधील कारभारावर नोकरशाहीचा वरचष्मा:
काहीही घ्यावयाचे असू दे मग सरकारी कार्यालयातील फर्निचर असो किंवा प्रयोगशाळेतील उच्च दर्जाची उपकरणे सगळी त्याच वेळखाऊ प्रक्रियेने खरेदी केली जातात. बरीच उपकरणे किंवा प्रगतशील तंत्रज्ञानामुळे आपल्याकडे नसणाऱ्या विविध गोष्टी आपण परदेशातून आयात करतो, यामध्येही वेळेचे मूल्य धुळीत मिळते.
३. शास्त्रज्ञापेक्षा नोकरशहा वरचढ:
क्लिष्ट गुंतागुंतीची प्रक्रिया, किचकट नियम, यामुळे कोणताही अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शास्त्रज्ञांच्या हातात नसतो आणि जगात चालणाऱ्या राजकारणाशी शास्त्रज्ञाला काही घेणे-देणे नसते नोकरशाही वरचढ ठरवून नको त्या गोष्टींची खरेदी केली जाते. कोणी याला विरोध दर्शवला तर ऑडिट ऑब्जेक्शनचा बागुलबुवा दाखवला जातो व त्यांच्या कुळाचा उद्धार होतो. याउलट परदेशात तज्ञ व्यक्तींनी कशाची मागणी करण्याचा अवकाश की घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ त्यांची पूर्तता करण्याकडे कल असतो. मग आता आपले संशोधन व विकसित देशांमधील संशोधन म्हणजे तूर्तास तरी पृथ्वीचे दोन ध्रुव म्हणावे लागतील.
४. आपली मानसिकता:
आपल्या पूर्वजांनी शास्त्राला अनेक गोष्टी दिल्या. आपण अजूनही त्याच यशाचे 'सेलिब्रेशन' करण्यात गुंतलेले आहोत. परदेशातून शिकून पैशांच्या मोहापायी आपले सुपीक मेंदू तिथेच विकले जातात. रिस्क से बनते है नाम, कम्फर्ट झोन छोडने से बनते हे काम हा मूलमंत्र परदेशात वास्तव्य करणाऱ्या युवा पिढीला द्यावासा वाटतो.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, जरी आपल्याकडे सोयीसुविधा नसतीलही पण आपल्यातूनच परदेशात गेलेल्यांपैकी खूपच थोडे जण नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. कठोर परिश्रम, जिद्द, सातत्य, सहनशीलता कमालीचा संयम, यांचाही थोडासा अभाव कुठेतरी जाणवतो असे नक्कीच म्हणावे लागेल. शाळेपासूनच विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करायला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्या स्वातंत्र्याचा वापर व्यवसाय क्षेत्र निवडीसाठी करण्यास शिकवावे. गोष्टी अर्ध्यावर सोडून सामान्यत्वाचे भूषण माथी मारून घेण्यापेक्षा अखेरच्या श्वासापर्यंत मला माझ्या विश्वातील बांधवांसाठी समाज जीवनासाठी काहीतरी करता येईल, जितके कष्ट मी अधिकाधिक घेईन तितका मी खऱ्या अर्थाने जगेन, असा विचार पालकांनी भावी पिढीमध्ये जागृत करावयास हवा.
फक्त स्वार्थ साधण्यासाठी छोटी मोठी चिरीमिरी देऊन कृष्णकर्तृत्व करण्यापेक्षा गरुड भरारी घेण्यास शिकवावे. 'स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पुज्यते' या सुभाषिताचा अर्थ बालकांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो आणि आपण भारताला नोबेल पुरस्कार मिळविण्याची आशा नक्कीच करू शकतो. अन्यथा, आपल्या पूर्वजांच्या ऐतिहासिक विजयश्रींचे कौतुक सोहळे गाण्यातच आपण आपली ऊर्जा संपवून टाकू असं खिन्नतेने म्हणावं लागेल.
-प्रा. डॉ. आर.जी. सोनकवडे (प्राध्यापक, भौतिकशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, माजी वरिष्ठ वैज्ञानिक, आय.यु.ए.सी. यु.जी.सी., नवी दिल्ली)
भ्रमणध्वनी:८३२९३७५२४८
(लेखक उच्च शिक्षण क्षेत्रात २५वर्षांपासून कार्यरत आहेत.)