मुक्तपणे कामक्रीडा चितारलेले मिथुनशिल्पे संस्कृतीरक्षकांना का टोचतात?

संस्कृतीरक्षकांना खजुराओची मिथूनशिल्पे अश्लील का वाटली? आपल्या अनेक मंदिरात मुक्तपणे कामक्रीडा, मिथुनशिल्पे चितारलेली आहेत? पूर्वीच्या काळी मदनोत्सव/वसंतोत्सव का साजरा केला जात होता? भारतीय संस्कृतीची खरी ओळख नक्की काय आहे? जाणून घेण्यासाठी वाचा संजय सोनवणी यांचा लेख;

Update: 2021-10-25 05:15 GMT

भारतात एके काळी मुक्त समाज राहत होता. हे संस्कृतीरक्षक म्हणवणारे टोळभैरव सांगत नाहीत. भारतात एके काळी तरुण तरुणी स्वतंत्र होते. व आपले वर/वधू स्वत:च निवडत. ती संधी मिळावी म्हणून मदनोत्सव/वसंतोत्सव साजरे करत. आगमिक शास्त्रांचा लोकांवर पगडा असल्याने मंदिरांत मुक्तपणे कामक्रीडा चितारायला वा मिथुनशिल्पे बनवण्यात कोणाला लाज वाटायचे कारण नव्हते. कारण ते काहीतरी अश्लील आहे असे कोणी मानत नव्हते.

उलट शृंगार आणि अध्यात्म याचा सुरेख मेळ घातला गेला होता. त्यामुळेच कालीदासाला "कुमारसंभव" या अद्वितीय महाकाव्यामध्ये साक्षात शिव-पार्वतीच्या दैवी शृंगाराचे चित्रण करतांना आपण परमदैवतांचा अवमान करीत आहोत असे वाटले नाही. कालीदासालाही नाही की, त्याच्या समकालीन लोकांनाही नाही.

गणिकांना एवढा सन्मान होता की, चक्क नव-गणिकेला शृंगारशास्त्राचे धडे देण्यासाठी "कुट्टनीमत" नावाचा ग्रंथही लिहिला गेला होता. शुद्रकाच्या "मृच्छकटीक" नाटकाची नायिका तर साक्षात एक गणिका होती. त्यातही कोणाला वावगे वाटले नाही.

परंतु आजचे असंस्कृत संस्कृतीरक्षकांना खजुराओची मिथूनशिल्पे अश्लील वाटली आणि ती तोडायची भाषा झाली. स्त्रीयांनी कोणती वस्त्रे घालावी व कोणती घालु नयेत. यावर नुसते फतवेच निघाले नाहीत. तर मारहानीही झाल्या. प्रेमात बुडालेल्या व आडोसा शोधणा-या जोडप्यांना रक्षाबंधन करुन भाऊ-बहीण बनवायचेही उद्योग झाले. या मंडळीने कधी अजंठामधील चित्रे पाहिली होती काय?

त्या काळात स्त्रियांची जी वस्त्र पद्धत होती. ती संस्कृतीच्याच नावाखाली आजच्या तरुणींनी पुन्हा वापरायची ठरवली. तर या विकृतबुद्धींना आत्महत्याच करावी लागेल.

समाज माध्यमांमुळे समाज अधिक जवळ यायला आणि एकमेकांना नव्याने समजावून घ्यायला मदत करतील. अशीही एक भाबडी आशा होती. समाजमाध्यमांनी काही प्रमाणात जनमताचा एक दबाव निर्माण केलाही हे सत्य असले तरी समाजमाध्यमांमुळे सामाजिक विकृतींचा केवढा उद्रेक उडाला. हे पाहिले तर भयभीत झाल्यासारखे वाटल्याखेरीज राहणार नाही. त्याहुन मोठी बाब म्हणजे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ट्रोल्स बनत विरोधी पक्षांच्या नेत्यांची खिल्ली नव्हे तर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन चरित्रहनन करण्याची पद्धतच रुढ केली आणि ती उठवळ समाजमाध्यमांत चवीने चघळलीही गेली.

नेहरुंचेच एक उदाहरण. नेहरु जयंतीलाच त्यांचा त्यांचीच भगिनी विजयालक्ष्मी पंडिता्बरोबरील वत्सल आलिंगनाचा फोटो नेहरु कसे लफडेबाज होते व हार्दिक पटेलांचे ते कसे पुर्वज शोभतात. अशी टिप्पनी करणारी एका जबाबदार माणसाची पोस्ट जबरी फिरत राहिली. फोटोतील ती महिला पं. नेहरुंची भगिनी आहे हेही माहित नसलेल्या उठवळांचा हा उपद्व्याप होता हे उघडच आहे.

कोणतीही बातमी आजकाल समाजमाध्यमांमुळे पसरते. आजकाल त्याला "व्हायरल होणे" असे म्हणतात. प्रत्येक गोष्टीवर आणि तीही लगेचच प्रतिक्रिया दिली पाहिजे म्हणजे आपण जागृत वगैरे सिद्ध होतो, या अहमाहिकेमुळे कोणत्याही बातमीची शहानिशा न करता, आपल्याला त्या विषयाचे जरा तरी ज्ञान आहे की नाही हे तपासण्याच्या फंदात न पडता प्रतिक्रिया पोस्टण्याची जी कीव वाटावी .अशी स्पर्धा सुरु होते की त्या वेगाने प्रकाशही प्रवास करणार नाही त्या वेगात प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागतो. ती बातमी खोटी निघाली तरी पोस्ट हटवण्यापलीकडे काही होत नाही. नेत्यांच्या भाषण्णांतील वाक्ये अर्धवट स्वरुपात एडिटिंग करुन घेऊन सर्वत्र ती हुंदवडण्याचे प्रमाणही थक्क करणारे आहे.

झुंडशाहीसमोर नांग्या टाकणे हे आजच्या विचारी लोकांचे विशेष लक्षण बनले आहे की काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

संजय सोनवणी

Tags:    

Similar News