आपण कधी सावध होणार?
नाझीवाद हा जगासाठी किती धोकादायक आहे हे आपल्याला माहिती आहे, पण हा नाझीवाद भारतालाही भविष्यात धोकादायक ठरु शकतो, त्यामुळे काय खबरदारी घेतली पाहिजे याचे विश्लेषण करणारा मुग्धा कर्णिक यांचा लेख नक्की वाचा...;
पुढील चौदा मुद्दे २००४ मध्ये लॉरेन्स ब्रिटने लिहून काढले. ब्रिट यांनी हिटलरची जर्मनी, मुसोलिनीची इटली, फ्रँकोचा स्पेन, सुहार्तोचा इंडोनेशिया आणि पिनोशेचा चिली या देशांतील राजवटींचा अभ्यास केला होता. त्यातून मांडलेले हे फाशीवादी राजवटींमधले काही सामायिक अवगुण.
वाचा... नाझीवादाची प्रमुख तत्वे
१- राष्ट्रवादाबद्दल सातत्यपूर्ण आणि शक्तीशाली मांडणी करीत रहाणे
झेंडे आणि शर्टांवर खोचलेले बिल्ले यांच्या प्रदर्शनातून देशप्रेम राष्ट्रवादाचा तप्तज्वर वाढवत नेण्याचे काम शास्ते आणि त्या ज्वराच्या तडाख्यात अडकलेली सामान्य जनता करीत रहाते हे या सर्व नाझीवादी राष्ट्रांत अगदी ढोबळपणे दिसत असे. चटकदार घोषणा, लष्कराचा अभिमान आणि ऐक्याच्या हाका या गोष्टी या राष्ट्रवादात समान दिसत होत्या. विदेशी असलेल्या कोणत्याही वस्तू, व्यक्ती कल्पना साऱ्यांबद्दलचा विकृत म्हणता येईल असा द्वेष या साऱ्यांच्या हाती हात घालूनच असे.
२- मानवी हक्कांच्या महत्त्वासंबंधी तुच्छता
शासकांना मानवी हक्कांची किंमत वाटत नसे आणि मानवी हक्कांचा बडीवार माजवला तर सत्तेवरील निवडक लोकांची उद्दिष्टे पूर्ण होणार नाहीत असा दृष्टीकोन असे. प्रचारतंत्राच्या चलाख वापराच्या साहाय्याने जनतेला मानवी हक्कांची पायमल्ली मान्य करायला लावली जात असे. ज्या लोकांना लक्ष्य करायचे त्यांच्या विकृत राक्षसीकरण केलेल्या प्रतिमा सतत मांडल्या जात. जेव्हा मानवी हक्कांचे असे उल्लंघन पराकोटीचे धक्कादायक असेल तेव्हा गुप्तपणे सारे तडीस नेणे, आमचा त्यात सहभागच नाही असे सांगणे, किंवा चुकीची माहिती प्रसृत करणे असले सर्व प्रकार केले जात.
३- शत्रू किंवा बळीचे बकरे निश्चित करून आपल्यामागे लोक एकत्र येतील असे पाहाणे
या सर्व नाजीवादी सत्तांमध्ये एक गोष्ट अगदी सामायिक आढळत असे- लोकांचे लक्ष इतर समस्यांवरून हटावे, आपल्या अपयशांचे खापर भलत्याच्या माथी फोडता यावे आणि लोकमानसातील निराशेला शिस्तीत वाट काढून देता यावी म्हणून बळीचे बकरे शोधून तयार केले जात. ते निश्चित करण्यासाठी चुकीच्या माहितीचा अथक प्रचार करणे हे प्रभावी ठरत असे. अनेकदा या सत्ता आपण ठरवलेल्या लक्ष्यांवर लोकांनी उत्स्फूर्तपणे हल्ले केले आहेत अशा घटना घडवून आणत. त्यांचे लक्ष्य बरेचदा, कम्युनिस्ट, समाजवादी, उदारमतवादी, ज्यू, विशिष्ट वंशांचे अल्पसंख्य लोक, इतर धर्मांचे लोक, निधर्मी लोक, समलिंगी लोक, आणि "दहशतवादी" असत. सत्ताधाऱ्यांचा विरोध करणारे कुणीही कृतीशील लोक असोत, हे सत्ताधारी त्यांच्यावर न चुकता दहशतवादी असल्याचा शिक्का मारून अखेर त्यांच्यावर 'कारवाई' करत.
४- लष्कर किंवा लष्करवादाला सर्वाधिक महत्त्व.
सत्तारूढ पक्षाचे मोजके लोक लष्कर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या औद्योगिक साम्राज्यांबरोबर निकट-मधुर संबंध ठेवून असत. लोकांच्या दैनंदिन गरजा भागत नसल्या तरीही राष्ट्राच्या संपत्तीतला फार मोठा हिस्सा लष्करबांधणीसाठी राखून ठेवला जात असे. लष्कर हीच देशप्रेमाची अभिव्यक्ती मानली जात असे, आणि राष्ट्रापुढची उद्दिष्टे काय ते स्पष्ट करण्यासाठी लष्कराचाच वापर होत असे, बाकीच्या राष्ट्रांवर जरब बसवणे आणि सत्ताधाऱ्यांची शक्ती आणि प्रतिष्ठा वाढवणे हेच लष्कराचे प्रमुख कार्य असे.
५- अमाप लिंगभेदवाद
सत्ताधारी आणि राष्ट्रसंस्कृती ही पुरुषप्रधान असेच, पण स्त्रिया या दुय्यम दर्जाच्या नागरिक आहेत असे सर्रास मानले जात असे. गर्भपाताविरुध्द गहजब करणे, समलिंगी संबंधाबद्दल कट्टर विरोध असणे हे ठळक होते. देशातील सनातनी धर्माचा पाठिंबा घेऊन या गोष्टींना कायद्याने विरोध होईल असे ड्रॅकोनियन- सुटकाच नसलेले कायदे केले जात. सत्ताधाऱ्यांची अनेक दुष्कृत्ये या कायद्यांच्या आडोशाने झाकली जात.
६- जनसंपर्काच्या साधनांवर नियंत्रणे
काही सत्तांनी जनसंपर्काची माध्यमे आपल्या थेट कडक नियंत्रणांखाली आणली. पक्षधोरणांपासून ती जराही इकडेतिकडे जाणार नाहीत याची ती हमीच होती. काही सत्ताधीशांनी थोडे नर्म धोरण स्वीकारले पण माध्यमांवर पकड घट्टच ठेवली. त्यांच्या या नर्म साधनांमध्ये लायसेन्सेस देणे न देणे, साधने मिळू देणे न देणे, आर्थिक दबाव टाकणे, देशप्रेमाची आवाहने करणे, आणि धमक्या देणे यांचा अंतर्भाव होता. सत्तेतल्या प्रभावी वर्तुळाशी माध्यमांच्या पुढाऱ्यांचे सहमतीचे संबंध असत. यातून ही सत्ता जुलमी आहे असे चित्र लोकमानसात कधीही उभे राहणार नाही अशी काळजी आपोआप घेतली जात असे.
७- राष्ट्रीय सुरक्षेचे अतिरेकी अवडंबर
सत्ताधाऱ्यांच्या हाती राष्ट्रीय सुरक्षी यंत्रणेची सूत्रे अटळपणे असत. बहुतेकवेळा त्याचा उपयोग जुलूम-दडपशाहीसाठीच केला जात असे. ती यंत्रणा गुप्तपणे आणि कसलाही विधीनिषेध न बाळगता काम करीत असे. त्यांच्या कारवाया 'राष्ट्रीय सुरक्षेची आवश्यकता' या नावाखाली चालत असत आणि त्यांच्या कारवायांना आहान देणे म्हणजे देशप्रेमाच्या अभावाचेच नव्हे तर देशद्रोहाचे निदर्शक म्हणून रंगवले जात असे.
८- धर्म आणि सत्ताधारी वर्तुळाची घट्ट सांगड
कम्युनिस्ट राजवटी जशा ईश्वरहीन आहेत असे त्यांचे विरोधक म्हणत, तसे नाझीवादी किंवा फाशीवादी राजवटींबाबत म्हणता येत नसे. या बहुतेक राजवटींनी देशातील बहुसंख्यांचा धर्मच डोक्यावर घेतला आणि त्या धर्माचे लढाऊ योध्दे म्हणूनच ते लोकांसमोर आले. किंबहुना त्या धर्माची मूळ शिकवण विसरून हे सत्ताधारी वागत आहेत हे सत्य अडगळीखाली दडवून ठेवण्यात आले. प्रचाराची यंत्रणा हेच ते श्रध्देचे पाईक आणि ईश्वरहीनांचे संहारकर्ते असे चित्र उभे करण्यात यशस्वी ठरत होती. या सत्ताधारी वर्तुळाला विरोध करणे म्हणजे धर्मावरच हल्ला आहे अशी जनसमजूत घडवण्यात आली होती.
९- ओद्योगिक साम्राज्यांचे अधिकार अबाधित
सर्वसामान्य नागरिकांचे व्यक्तिगत जीवन कडक कायद्यांच्या नियंत्रणात असले, तरी तुलनेने औद्योगिक साम्राज्यांचे स्वातंत्र्य बऱेच सुरक्षित होते. औद्योगिक व्यवस्थांमुळे लष्करोपयोगी उत्पादने काढणे आणि समाजावरही नियंत्रण ठेवणे शक्य होते हे सत्ताधीशांच्या चांगलेच लक्षात असे. शासनातले श्रेष्ठी आर्थिक सत्ता भोगणाऱ्या श्रेष्ठींची कोडकौतुके पुरवत कारण त्यांचे हितसंबंध परस्परपूरक होते. गरीब वर्गाला दडपणे यामुळे सहजशक्य होत होते.
१०- श्रमिकांची शक्ती दडपणे किंवा नष्ट करणे
संघटित श्रमिक हे सत्ताधीश आणि आर्थिक सत्ताधीश यांच्या वर्चस्वाला आव्हान देणारे एक सत्ताकेंद्र असल्याचे या सत्ताधीशांनी लक्षात घेतले होते, त्यामुळे त्यांना ठेचणे किंवा त्यांची शक्ती नष्ट करणे हे त्यांचे अटळ असे प्राधान्य ठरले. गरीब जनतेकडे संशयाने, तुच्छतेने पाहाण्याचीच वृत्ती होती. काही सत्तांनी तर गरीब असणे हा अक्षम्य दुर्गुण मानला होता.
११- बुध्दीवादी आणि कला यांचा तिरस्कार आणि निःपात
बुध्दीवादी लोक, अभिव्यक्तीच्या, कल्पनांच्या स्वातंत्र्याचे सहजगम्य पाईक असतात त्यामुळे या राजवटींना त्यांच्याबद्दल टोकाचा तिरस्कार असे. राष्ट्रीय सुरक्षेच्या, राष्ट्रप्रेमाच्या दृष्टीने बौध्दिक, शैक्षणिक स्वातंत्र्य हे धोकादायक मानले जात असे. विद्यापीठांवर कडक नियंत्रणे आली, राजकीयदृष्ट्या अविश्वासार्ह वाटणाऱ्या प्राध्यापकांना वेचून नष्ट केले गेले. सनातनी कल्पनांच्या विरुध्द असलेली मते, संकल्पना यांवर जोरदार हल्ले केले गेले, त्यांची मुस्कटदाबी झाली, आणि त्यांचे नामोनिशाण मिटवले गेले. या राजवटींच्या दृष्टीने कला आणि साहित्य यातून केवळ राष्ट्रहेतूंचीच सेवा व्हावी, तसे नसल्यास त्यांना अस्तित्वात रहाण्याचा हक्कच नव्हता.
१२- गुन्हा आणि शिक्षा यांबद्दलची अतिरेकी मते
यातील बऱ्याचशा राजवटींमधून गुन्हेसंबंधातील कायदे ड्रॅकोनियन असतं आणि फार मोठी लोकसंख्या कारावासात ठेवलेली असे. पोलीस यंत्रणेचे उदात्तीकरण होत होते आणि त्यांच्या हाती अनियंत्रित अधिकार असत, ज्याचा दुरुपयोग सरसहा होत असे. साधेसुधे किंवा राजकीय गुन्हे केलेल्यांवर वाट्टेल ते भडक आरोप ठेवले जात. यांचा दुरुपयोग राजकीय विरोधकांना वठणीवर आणण्यासाठीच होत असे. अशा गुन्हेगार 'देशद्रोही' व्यक्तींबद्दल लोकमानसात भय आणि द्वेष निर्माण करून पोलिसांचे अधिकार वेळोवेळी वाढवून देण्यात येत असत.
१३- वशिलेबाजी आणि भ्रष्टाचाराचे राज्य
उद्योगधंद्यांत असलेले आणि सत्ताधीशांच्या निकट असलेले लोक आपापली व्यक्तिगत संपत्ती वाढवण्यासाठी या संबंधांचा उपयोग करीत. हा भ्रष्टाचार दोन्ही बाजूंनी होता. सत्तारुढांना पैशांच्या स्वरुपात धंदेवाईकांकडून भेटी मिळत, मालमत्ता मिळत. शासकीय वशिलेबाजीचा फायदा उद्योगधंद्यांतल्या लोकांना मिळत असे. सत्ताधारी श्रेष्ठींना इतरही स्रोतांतून अवाढव्य संपत्ती गोळा करणे शक्य होते. राष्ट्रीय निसर्गसंपत्तीची चोरी हे त्यातले एक. राष्ट्रीय सुरक्षेची यंत्रणा आपल्या अंगठ्याखाली, माध्यमे आपल्याच टाचेखाली असल्यानंतर या प्रकारचा भ्रष्टाचार अमर्याद होता आणि सर्वसाधारण जनतेला त्याचा वासही लागत नसे.
१४- निवडणुकांतील खोटेपणा
सार्वमत, किंवा जनमताची चाचणी या प्रकारातल्या निवडणुका बहुधा बोगस असतं. उमेदवार उभे करून खऱ्यासारख्या निवडणुका घेतल्या जात तेव्हा सत्तेच्या यंत्रणेने सारेच विकृत करून टाकलेले असे आणि त्यांना हवा तोच निकाल त्यांना सहज मिळत असे. निवडणूक यंत्रणेवर पूर्ण नियंत्रण, विरुध्द मतदान करणाऱ्या संभाव्य मतदारांना भेडसावण्याचे किंवा मते टाकण्यास मनाई करण्याचे विविध मार्ग, झालेले मतदान अयोग्य ठरवणे किंवा बेकायदेशीर ठरवणे असे अनेक मार्ग अवलंबून आपल्याला हवा तो निकाल ते मिळवत. अगदी शेवटचा उपाय म्हणून सत्तेला बांधील असलेल्या मिंध्या न्यायपालिकेचाही आधार घेतला जात असे.
यातील काहीतरी ओळखीचे वाटतेय कां? भारतही याच वेशीवर उभा आहे का? वशिलेबाजीने फुगत गेलेल्या औद्योगिक राक्षसांचे, भाईबंदीतल्या वेचक भांडवलदारांचे आणि सत्तेतल्या श्रेष्ठींचे मधुर संबंध पाहातो आहोत आपण... दडपशाहीचे राजकारण. भेडसावणीचे राजकारण, राष्ट्रवादाचे सुजवलेले राजकारण पाहातो आहोत आपण, सनातन धर्माचे डिंडिम कानठळ्या बसवू लागले आहेत ऐकतो आहोत आपण. हा देश महान रहाणार आहे कां... की या नाझीवादी क्रूर सत्ताधीशांना थारा देणाऱ्या देशांच्या यादीत बसवणार आहे आपल्याला पुढले अर्धशतक? आपल्याला स्वतंत्र रहायचे असेल तर निर्भयपणे आत्ताच बोला. विचार करा. विचार मांडा... सरकारच्या बेभान कृतींविरुद्ध केलेल्या आंदोलनांना पाठिंबा द्या. गप्प राहून आपण आपलाच पराभव करू हे निश्चित.